भज गोविंदम् व गुरुपादुकाष्टक
नमस्कार 🙏🏼
भज गोविंदम् ।
॥ प्रथम श्लोक ॥
🪔💐🙏🏼🪷
श्री आदि शंकराचार्य यांनी रचिलेले हे भजन सूक्त स्तोत्र फटका अतिशय गेय श्रवणीय मननीय व अनुनेय आहे
गो म्हणजे गाय
गो म्हणजे पृथ्वी
गो म्हणजे इंद्रिये
विंद म्हणजे लाभ प्राप्त करणारा, पालनकर्ता
लौकिक अर्थाने गोपाळ
पारमार्थिक अर्थाने जगत्पालक
तसेच इंद्रियांचा स्वामी
अशा त्या गोविंद भगवान श्रीकृष्ण यांचे भजन कर 🙏🏼
सु म्हणजे चांगले, उक्त म्हणजे म्हटलेले उच्चारलेले लिहिलेले गायलेले. भज गोविंदम् हे म्हणून सूक्त आहे
पिण्याचे साधन पात्र, नेण्याचे साधन नेत्र तसे स्तुति करण्याचे साधन म्हणजे स्तोत्र, यात भगवान श्रीकृष्ण यांची स्तुति आहे म्हणून भज गोविंदम् हे स्तोत्र होय
आणि हे नेहमीसारखे गोड मृदु शांत शब्दात गुंफलेले नसून;
थोडं कठोर स्पष्ट व कानउघाडणी स्वरूपात प्रस्तुत केले आहे म्हणून भज गोविंदम् हा फटका आहे, असं माझं वैयक्तिक मत 🙂
प्रत्यक्षात श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला खडसावूनच भगवान श्रीकृष्ण पुढील संवाद उपदेश प्रारंभ करतात
👇🏼
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरम् अर्जुन।।
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप।
स्थळकाळाचे भान न ठेवता अयोग्य कृती करणाराला खडसावणारे हे भज गोविंदम् भजन सूक्त स्तोत्र ; खरंतर फटका आहे
योग्य वेळी प्रयत्न न करता , ती वेळ निघून गेल्यावर ते प्रयत्न व्यर्थ असतात
म्हणूनच
👇🏼
भज गोविंदम्
यातील प्रथम श्लोक
👇🏼
भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढमते ।
संप्राप्ते सन्निहिते काले,
न हि न हि रक्षति डुकृञ् करणे
॥ १॥
👆🏼
प्रस्तुत भज गोविंदम् सूक्त यातील हा प्रारंभीचा श्लोक आहे
हा उपदेश खडसावणी कानउघाडणी या स्वरूपात आहे
संप्राप्ते (प्राप्त झालेला असताना)
सन्निहिते (जवळ, समीप)
काले (मृत्युसमय)
म्हणजे अंतकाल , मृत्यूसमय, जीवनाचा शेवट हा समीप अगदी जवळ आला असताना म्हणजे आयुष्य सरून वृद्धापकाळ आल्यावर
आता ईश्वर/मोक्ष प्राप्तीसाठी वेदांत शिकावा या उद्देशाने आधी संस्कृत भाषा शिकावी म्हणून डुकृञ् करणे या पाणिनीय व्याकरण सूत्राचे अध्ययन करत असलेल्या एका साधकाला आदि शंकराचार्य करुणेने त्या वयात हितकर होईल असा सरल सुखाने आचरण करण्याजोगा उपदेश करतात कि हे बुद्धि कुंठित झालेल्या (मूढमति) माणसा, अंतकाल इतका जवळ आला असताना तुझे रक्षण हे कृ म्हणजे करणे असले व्याकरण सूत्र करणार नाही, निश्चितच करणार नाही (दोनदा 'न हि, न हि' असं म्हटलंय) त्यापेक्षा आता तू श्रीकृष्णाचे भजन कर, श्रीकृष्णाचे भजन कर, श्रीकृष्णाचे भजन कर ; असं त्रिवार सांगतात
म्हातारपणी व्याकरण शिकून मग वेदांत शिकून नन्तर मोक्ष साधना करतो असा विचार म्हणजे बैल गेला अन् झोपा केला असे आहे
त्यापेक्षा जेव्हा जाणीव जागृत होईल तेव्हापासूनच नामस्मरण रूप साधना करत रहावे हे हितकर होय
हे असे का?
या बाबत वास्तवाचे भान देणारे व खडबडून जागे करणारे हे भज गोविंदम् सूक्त आपण पुढील सम्पूर्ण मासभर पाहू या
श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा हरिपाठ हेच सांगतो
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
म्हणजेच भज गोविंदम्
श्री समर्थ रामदास स्वामी हेच सांगतात मना सज्जना भक्ति पंथेचि जावे
भक्ती या शब्दातील क्रियापद भज हेच आहे
संत तुकाराम हेच सांगतात
हेचि दान देगा देवा , तुझा विसर न व्हावा म्हणजेच सतत नामस्मरण म्हणजेच भज गोविंदम्
🙏🏼
वैद्य हृषीकेश म्हेत्रे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा