ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

  देवाने सर्व प्राणीमात्रांना ज्ञानेंद्रिये दिले आहेत. या ज्ञानेंद्रियांपैकी काही प्राण्यांमध्ये नाकाने वास घेण्याची क्षमता सर्वात उत्तम असते. तर काही प्राण्यांमध्ये कानाने ऐकण्याची क्षमता सर्वात उत्तम असते. आज आपण ज्ञानेंद्रियांपैकी कानाची ऐकण्याची क्षमता का कमी होते याची माहिती घेणार आहोत.

डोळ्याने दिसण्याचे थोडे जरी कमी झाले तरी पेशंटच्या लगेच लक्षात येते. पण कानाने ऐकण्याची क्षमता थोड्या प्रमाणात कमी झाली असेल तर ते पेशंटच्या लक्षात देखील येत नाही. बहिरेपणा कधी क्रमशः येतो तर कधी अचानक येतो, कधी मानसिक असतो तर कधी कानाच्या रचनेत किंवा कार्यात बिघाड झाल्याने येतो. बहिरेपणा काही पेशंटमध्ये जन्मत:च असतो तर काही पेशंटमध्ये जन्मानंतर आलेला असतो किंवा म्हातारपणामुळे / उतार वयामुळे आलेला असतो. कानामध्ये मळ, फंगल इन्फेक्शन, गाठ असेल तर ऐकू कमी येते किंवा ऐकू येत नाही, कानात एखादी वस्तू (दगड, बिया, किडे) अडकल्यास किंवा कानाची पोकळी बारीक झाल्यास ध्वनीलहरींच्या वहनात अडथळा आल्याने ऐकू कमी येते. कानाच्या आत तीन छोटी-छोटी हाडे आहेत त्यांच्यात किंवा कानाच्या पडद्यात जर जन्मतः दोष असला किंवा कानाच्या पडद्याला छिद्र असल्यास ऐकू येण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. कानाच्या आतील हवेचा दाब एक सारखा न राहता कमी जास्त होत असेल किंवा कानाच्या आतील हाडांच्या साखळीत एकसंधपणा राहत नसेल तरी ऐकण्याची क्षमता कमी होते. कान वाहत असून कानात सूज आल्यास किंवा डोक्याच्या कवटीच्या खालच्या भागात फ्रॅक्चर झाल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आपल्या कानाच्या आणि नाकाच्या दरम्यान एक नळी असते. नाक, नाकाभोवतीच्या पोकळ्या (सायनस), स्वरयंत्र यांच्या आजारामुळे या नळीच्या कार्यात बिघाड होतो. या नळीच्या कार्यातील बिघाडामुळे किंवा एकूणच मिळून या नळीत चिकट स्त्राव अतिप्रमाणात जमल्यास कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. बोली भाषेत याला कानाचे दडे बसले असे म्हणतात. जर चेहऱ्यावर नागीण झाली असेल तर त्यामुळे वातनाड्यांचा दाह होतो. कानाच्या वातनाडीचा जर दाह झाला तर त्याचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होतो. क्षयरोग म्हणजे टीबी झालेल्या पेशंटमध्ये टीबीच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या काही औषधांच्या दुष्परिणामामुळे नाड्यांचा दाह होतो. त्यांचा दाह झाला की चालताना तोल जातो किंवा एका रेषेत चालता न येणे, कानात आवाज येणे, मुंग्या येणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे टीबीच्या काही औषधांच्या दुष्परिणामामुळे कानात आवाज येतात आणि ऐकू  येणे कमी होते. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जीवनसत्त्वांची नितांत आवश्यकता असते. जर दीर्घकाळ शरीरात जीवनसत्वे मिळाली नाहीत तर इतर आजारांना सोबत बहिरेपणा किंवा श्रवण क्षमता कमी होते. डायबिटीस, वाढलेला बीपी यासारखे आजार तसेच दारू, धूम्रपान, तंबाखू यासारखी व्यसने यामुळे रक्तवाहिन्यांमधील लवचिकपणा कमी होऊन त्या ठिसूळ बनतात. रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्य येते. अशा ठिसूळ काठिण्य आलेल्या रक्तवाहिन्यांमधून कानाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे कानाला पोषण न मिळाल्यामुळे ऐकू येण्याची क्षमता कमी होते. अत्यंत मोठे आवाज जसे की बॉम्बस्फोट, मोठ्या फटाक्यांचा आवाज, डॉल्बी सिस्टीमचा आवाज यामुळे कानठिळ्या बसतात. अशा अत्यंत मोठ्या आवाजामुळे बहिरेपणा येतो. सतत गोंगाटाच्या ठिकाणी जसे की विमानतळाच्या परिसरात राहणारे, कारखान्यात मोठा आवाज असणाऱ्या मशीनच्या संपर्कात असणारे, गाड्यांचे हाॅर्नचे आवाज सतत असणाऱ्या गजबजलेल्या रस्त्यालगत राहणारे रहिवासी यांच्यात कालांतराने बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. डोक्याला मार लागणे, डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर होणे, मेंदूला मार लागणे, मेंदूमध्ये पाणी होणे यामुळे देखील बहिरेपणा येतो.

 लहान मुलांमध्ये देखील बहिरेपणा दिसून येतो. त्यापैकी बरीच मुले मूक-बधिर असतात. ही मूक-बधिर मुले लहानपणापासूनच ऐकू न  आल्यामुळे बोलू शकत नाहीत. मूक-बधिर मुलांपैकी बऱ्याच मुलांच्या आई-वडिलांचे जवळच्या नात्यात लग्न झालेले आढळून आले आहे. त्यामुळे जवळच्या नात्यातील लग्न टाळलेले केव्हाही चांगलेच.  लहान मुलांमध्ये बहिरेपणा येण्याची कारणे १) प्रसुतीच्या आधी २) प्रसूतीदरम्यान ३)  प्रसुतीपश्चात अशी विभागलेली आहेत‌

१)  प्रसुतीच्या आधी :- आईला जर गरोदरपणात मधुमेह, उच्चरक्तदाब, गोवर, कांजिण्या असे आजार झाले असल्यास होणाऱ्या बाळाच्या श्रवण शक्तीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. गरोदरपणात न चालणारी औषधे जर गरोदर स्त्रीला दिली तर त्या औषधांच्या परिणामामुळे बाळास बहिरेपणा येऊ शकतो. जर गरोदरपणात संपूर्ण भुलेखाली काही मोठ्या शस्त्रक्रिया / ऑपरेशन झाले असले तर बाळाला बहिरेपणाचा दोष येण्याची शक्यता असते. आईचा रक्तगट निगेटिव्ह आणि बाळाचा पॉझिटिव्ह असेल आणि त्यावर जर उपचार झाले नसतील तर बाळास बहिरेपणा येऊ शकतो. एखाद्या कुटुंबामध्ये बहिरेपणाचा दोष अनुवंशिक असतो. जर हा अनुवंशिक दोष बाळात मध्ये आला तर बाळास ऐकू येत नाही.

२)  प्रसूतीदरम्यान :- जर बाळ कमी दिवसाचे जन्मले तर बाळाच्या अवयवांची वाढ पूर्णपणे झालेली नसते. नॉर्मली नऊ महिन्यानंतर प्रसुती होते. या नऊ महिन्यात बाळाचे सर्व अवयव व्यवस्थित विकसित होऊन योग्य प्रमाणात वजन देखील वाढलेले असते. सातव्या महिन्यानंतर देखील बाळाच्या अवयवांची वाढ झालेली असते. परंतु वजन मात्र वाढलेली नसते. म्हणजे सातव्या महिन्यात जन्मलेली बाळे कमी वजनाची परंतु पूर्ण वाढ झालेली असतात. पण सातव्या महिन्याच्या आधी जन्म झालेल्या बाळांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसते. अशा बाळांमध्ये जर कानाचा किंवा श्रवणसंस्थेचा विकास पूर्ण झालेला नसल्यास त्या बाळास ऐकू येत नाही. अवघड आणि लांबलेले बाळांतपण असेल किंवा बाळाच्या डोक्याला चिमटा लावून केलेली प्रसूती की ज्यामध्ये बाळाच्या डोक्याला इजा झालेली आहे अशा बाळात देखील बहिरेपणा येण्याची शक्यता असते. बाळंतपणात बाळाचा श्वास गुदमरला असेल तरीदेखील बहिरेपणा येण्याची शक्यता असते.

३) प्रसूतीनंतर:-

  जन्मानंतर जवळपास सर्वच बाळांना थोड्याफार प्रमाणात कावीळ होत असते. आणि थोड्याफार प्रमाणात होणारी कावीळ तीन ते पाच दिवसांत आपोआप बरी सुद्धा होते. परंतु जन्मानंतर जर नवजात शिशुला अतिप्रमाणात काविळ झाली आणि ही काविळ जास्त दिवस टिकून राहिली तर बाळांमध्ये बहिरेपणा येण्याची शक्यता असते. तसेच या नवजात शिशूच्या किंवा छोट्या बाळाच्या डोक्याला मार लागल्यास किंवा मेंदूमध्ये पाणी झाल्यास किंवा मेंदूच्या आवरणांना सूज आल्यास बहिरेपणा येण्याची शक्यता असते.

लेखन डॉ. वैशाली माने, सातारा | संपर्क 9423826921



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२