सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२

 

ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे।।५१॥

✏ माऊली  म्हणतात की अशी कल्पना  करा की व्यास ऋषींनी (चार  वेद) ज्ञानरूपी शब्दांचा समुद्र बूद्धीरूपी रवीने घुसळून महाभारत रूपी लोणी बाहेर  काढले  आहे.

🌷मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके । पद आले परिपाकें । आनंदाची॥५२॥

✏ नंतर त्या   लोण्याला   ज्ञानरूपी  अग्नीच्या  आचेवर  विचाररूप कढ आला आणि पद्यरूपी साजूक  तूप  तयार  झाले तीच  ही गीता.

🌷जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ॥ ५३॥

✏  ज्या  गीतेची विरक्त  लोक, इच्छा  धरतात,  संत तिचा अनुभव  घेतात आणि ब्रह्मनिष्ठ जन तिचे ठिकाणी  रममाण होतात.  

🌷जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल॥ ५४॥

✏ ही कथा त्रिजगती  ऐकण्यास योग्य परमपूज्य  आहे.

🌷जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे। जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं॥५५॥

✏ या कथेला भगवतगीता म्हणतात  आणि ब्रह्म  व शंकर  तिची स्तुती करतात. सनकादिक संत अतीव आदराने  तिचे श्रवण पठण करतात.  

🌷जैसे शारदियेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे । तें वेंचती मवाळें । चकोरतलगें॥५६॥

✏ ज्याप्रमाणे शरदऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यातील अमृत कण चकोर पक्ष्यांची पिले हळुवार  मनाने प्राशन  करतात. 

🌷तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।अति हळुवारपणे चित्ता|आणूनियां५७॥

✏  त्या  पक्ष्यांप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा (वाचावी असे नाही तर) अनुभवावी. मनातील चंचलता काढून, मन विक्षेपरहित करून कुशाग्रबुद्धीने या भगवद् गीतेचा अनुभव घ्या.

🌷हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८॥

✏  गीतेचे केवळ शब्दोच्चार न करता, मनन करावे. इंद्रियांना   न कळता अनुभव घ्या आणि  प्रतिपाद्य विषय समजून घ्या आणि मगच त्या  विषयावर व्याख्यान  अगर चर्चा  करा. 

🌷जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥५९॥

✏ भ्रमर कमळातील पराग (मध) हळूवारपणे  नेतात. पाकळ्यांना ते समजत ही नाही  त्याप्रमाणे  ग्रंथ  श्रवणाची पद्धती आहे .

🌷का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥६०॥

✏ किंवा  चंद्र  प्रगटण्यापूर्वीच चंद्रविकासिनी कमलिनी उमलून आपले स्थान न सोडता चंद्राला प्रीतीने आलिंगन देण्याचे प्रेमसौख्य तिचे तीच जाणते.

🌷ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंत:करणे । आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥ ६१॥

✏ अशा प्रकारे शम दम शुद्ध अंतकरणाने  संपन्न असेल तोच गीतेतील विषयाचे रहस्य  जाणून घेवू शकतो.  

🌷अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करून संतीं । अवधान द्यावे ॥ ६२॥

✏  अर्जुना  सारखी  श्रवण क्षमता असलेल्या  संतांनी  कृपा करून लक्ष देऊन ऐकावे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness