सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी ६३ पासून ७५ पर्यंत
हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां॥६३॥
✏ प्रभू आपले ह्रदय सखोल आहे म्हणून आपल्या चरणापाशी ही लडिवाळपणे विनंती केली आहे. हा माझा उन्मत्तपणा नाही.
🔰जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी॥ ६४॥
✏ ज्याप्रमाणे लहान मूल बोबडे बोल बोलते तरी आईवडिलांना त्याचे ही कौतुकच असते. तसा त्यांचा स्वभावच असतो .
🔰तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी॥६५॥
✏ ज्याअर्थी आपण संत मायबापांनी माझा अंगीकार केला आहे त्याअर्थी आपण माझे काही उणे बोल आपण सहज सहन करालच.
🔰परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें । ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥६६॥
✏ पण तरीही मी विनंती करतो कारण मी प्रत्यक्ष गीतेचा अनुवाद करतो आहे म्हणून माझ्याकडे लक्ष द्यावे ही विनंती 🙏 (माऊलींची लीनता लक्षात घ्या )
🔰हे अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येर्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी॥ ६७॥
✏ हे गीतार्थ सांगण्याचे काम मला न पेलणारे आहे. सूर्याच्या तेजापुढे काजव्याच्या तेजाची काय शोभा आहे?
🔰का टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरी । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ६८॥
✏ ज्याप्रमाणे समूद्र कोरडा करण्यासाठी टिटवीने आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला (तिची पिल्ले समुद्राने बुडविली म्हणून ) त्याप्रमाणे माझा अधिकार न जाणता मी गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो.
🔰आइका आकाश गिंवसावे । तरी त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारिता ॥६९॥
✏ आकाशास जर कवळावे असे वाटले तर आपण त्यापेक्षा मोठे झाले पाहिजे तसे गीतार्थ सांगायला माझ्यापेक्षा अधिक योग्य पुरूष पाहिजे होता. हे माझ्या शक्तीच्या बाहेर आहे.
🔰या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी॥ ७०॥
✏ या गीतार्थाची थोरी एवढी आहे की स्वत: शंभू महादेव त्याची चर्चा करतात आणि पार्वती माता प्रश्न करतात.
🔰तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें । तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व॥ ७१॥
✏ महादेव म्हणतात की पार्वती ज्याप्रमाणे तुझे स्वरूप (सौंदर्य ) नित्य नवीन असल्यामुळे त्याचा पार लागत नाही त्याप्रमाणे गीतातत्व पहावे तेव्हा नवीनच जाणवते. म्हणून तेही जाणण्यासाठी कठीणच आहे.
🔰हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू । तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादित ॥ ७२॥
✏ हा वेदार्थसागरू म्हणजे वेदरूपी समुद्र हा निद्रिस्त असलेल्या सर्वव्यापक परमेश्वराचे घोरणे आहे. आणि त्याच श्रीकृष्णाने स्वमुखाने हे गीता शास्त्र अर्जुनास सांगितले.
🔰ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ७३॥
✏ त्या गीता शास्त्राचे वर्णन करण्यासाठी वेदांचीही मती कुंठित होते तिथे मी काय वर्णन करणार?
🔰हें अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे । गगन मुठीं सुवावे । मशके केवीं॥ ७४॥
✏ हे अगाध ज्ञान कसे समजून घ्यावे ? सूर्याच्या तेजाला कोणी उजाळा द्यावा ? किंवा चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे ?
🔰परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५॥
✏ इतके हे अवघड गीता शास्त्र आहे तर माऊली आपण का तयार झालात मग अर्थ सांगण्यास ? असे आपण विचारलेत तर माऊली उत्तर देतात की माझे गूरू निवृत्तीनाथ हे माझा आधार आहेत. त्यामुळेच मी हा निर्धार केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा