॥卐 भज गोविंदम् 卐॥

॥ श्लोक ८ ॥


आज थोडे बंडखोर हटके पचायला अवघड विचार !!!


का ते कान्ता कस्ते पुत्रः

संसारोऽयमतीव विचित्रः |

कस्य त्वं वा कुत आयातः

तत्वं चिन्तय तदिह भ्रातः ‖ ८ ‖


का : कोण

ते : तुझी

कान्ता : पत्नी

कस्ते पुत्रः : कोण तुझा पुत्र

संसारो अयम् : हा संसार हे जग 

अतीव विचित्रः : अत्यंत विचित्र विलक्षण

कस्य त्वं : तू कुणाचा

वा : किंवा

कुत आयातः : कुठून आला आहेस

तत्वं चिन्तय तद् : या मूलभूत गोष्टींचा विचार कर

इह : येथे आतातरी

भ्रातः बंधो भावा भावड्या भैय्या


कोण तुझी पत्नी?

कोण तुझा पुत्र?

हा संसार प्रपंच अत्यन्त विचित्र विलक्षण अनाकलनीय आहे!

तू (स्वतः; खरंतर) कुणाचा आहेस?

तू (मुळात) कुठून आला आहेस?

या मूलभूत गोष्टींचा येथे आतातरी , या वयात तरी विचार कर!!


आपले लग्न झाल्यापासून

आपला जोडीदार व त्याच्यापासून उत्पन्न होणारी संतती

यांनाच केंद्रस्थानी ठेवूनच प्रत्येक स्त्रीपुरुषाचे जीवन सुरू असते


आपल्या लग्नापूर्वी हीच भूमिका

आपले आईवडील निभावत असतात


पिढ्यानुपिढ्या शतकानुशतके हेच सुरू आहे


यात काही चुकीचं नाहीये, 

समाजधारणेसाठी ही गृहस्थाश्रम नावाची उत्तरदायित्व स्वीकारणारी ही व्यवस्था पायाभूत आहे


आपण जिचा/ज्याचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला, त्याचे भरणपोषण संरक्षण सेवा करणं, हे प्राप्त/स्वीकृत कर्तव्य होय.


आणि निसर्गनियमानुसार तज्जन्य/उभयजन्य संततीचे लालन पालन करणे हेही ओघानेच आले


निर्वाह: प्रतिपन्न वस्तुषु । 

हाती घ्याल ते तडीस न्याल । 

स्वीकारलेले उत्तरदायित्व अंतिम क्षणापर्यंत निभावणं , हे उचित आहेच


पण जीवनभर हे करत असतानाच, सर्व कर्तव्ये यथासांग पार पडल्यावर तरी, कृतकृत्यता आल्यावर तरी ... 'माझ्या' जीवनाचं/अस्तित्वाचं प्रयोजन ध्येय लक्ष्य उद्देश प्राप्तव्य 'काय' , याचा विचार करावा


मुळात साधारणपणे जीवनातील पहिली 25-27-30 वर्षे जिचा/ज्याचा आपल्याशी काडीमात्र परिचय ओळख संबंध नाही, अशा अनोळखी व्यक्तीसाठी आणि तोपर्यंत अस्तित्वातही नाहीत , अशा तज्जन्य संततीसाठी ; आपल्या पुढील जीवनातील "सर्व वेळ पैसे क्षमता संसाधने (time money energy resources)" समर्पित/खर्च/व्यय करायची ?? (कि व्यर्थ दवडायची? / वाया घालवायची?)


या अशा "अनोळखी असंबंधित (नवरा/बायको व तज्जन्य संतती या) लोकांसाठी" म्हणून का मी बालपणापासून लग्न होईपर्यंत सर्व क्षमता (skill set) मिळवण्यासाठी खटपट केली ???


तसं 'प्राधान्याने' नसेल तर ; 

मग मी या 'वैयक्तिक' देहधारक जीवाचं चैतन्याचं जन्म घेण्याचं या जगात अस्तित्वात येण्याचं नेमकं प्रयोजन काय? what is the PURPOSE of life???


स्वीकृत स्त्री/पती व तज्जन्य संतती विषयक कर्तव्यपूर्ती , हे जीवनाचे प्रयोजन असू शकत नाही


ते या जीवनप्रवास नामक काळातील सहप्रवासी मात्र आहेत


मग माझं नियत कर्म काय?

यतते च ततो भूय: संसिद्धौ । यातील कोणत्या संसिद्धी साठी माझं अस्तित्व आहे?


भगवंताने कोणतं असं कार्य करण्यासाठी मला इथं पाठवलं निर्मिले आहे?


स्त्री/पती पुत्र लौकिक प्रपंच ज्यांना नसतोच, त्यांच्या जगण्याचं प्रयोजन काय?


म्हणजेच व्यशेम देवहित हे आम्हाला कधी सापडणार?


लौकिक व्यावहारिक प्रापंचिक कर्तव्यांच्या पलिकडे जन्माचं जगण्याचं अस्तित्वाचं देहधारणेचं प्रयोजन काय , हे कळलं नाही तर ... ते प्रयोजन , ते देवदत्त कार्य, ते भगवंताचे काम, that very Godly alloted job , जोपर्यंत आपल्याकडून पूर्ण सिद्ध होत नाही , तोपर्यंत या संसारात प्रपंचात पुन्हा पुन्हा येत राहणं आणि तेच तेच आहार निद्रा मैथुन यातच आयुष्य सरून जाणं असं होत राहिलं, तर यातून सुटका मुक्ती मोक्ष कैवल्य नाही ...


मुळात हे असं असू शकते हेच समजायची जाणीव जागृती कुवत क्षमता बुद्धि आवश्यकता नसते ...


तिथं ते समजल्यावर त्यासाठी यत्न करणे हे होऊ शकते


म्हणून तर भगवन्त म्हणतात

यततामपि सिद्धानां कश्चितमांवेत्ति तत्वतः ।

आणि

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। 


याचाच अर्थ वरती विचारलेला प्रश्न कि अनोळखी लोकांच्या सेवेतच आयुष्य सरतं आणि जगण्याचं प्रयोजन काय हे चिंतनीय आहे ... अगदी तारुण्यातच नाही तरी किमान 50-60-70 या वयात तरी ही जाणीव झाली पाहिजे ... 

जहाँ जागे, वहाँ सबेरा ।


अर्थात हे 'जगण्याचं प्रयोजन म्हणजे देवदत्त कार्य' शोधावं असं जितक्या लवकर उमजेल तितक्या लवकर दिशा व तत्संबंधी साधने गवसू शकतात


म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली आणि भावंडे तसेच समर्थ रामदास स्वामी, श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती ही प्रपंचात अडकली नाहीत, त्यांनी जगाचा प्रपंच करून दाखवला ... 

आणि लौकिक प्रपंचात राहूनही हे 'भगवंतकार्य स्वरूप जीवन प्रयोजन' साध्य करता येते हे सर्व सांसारिक प्रापंचिक संतमंडळींनी दाखवून दिले जसे कि एकनाथ महाराज, गोरोबा, नामदेव, चोखोबा, पांडुरंग शास्त्री आठवले आणि छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ...🙏

यांना भगवन्तांनी कोणते कार्य आपल्याला दिलं आहे हे कळलं होतं ... ही तर 'श्रींची इच्छा' म्हणून ते कार्यरत राहिले


Who is your wife? 

Who is your son? 

Supremely wonderful is saṁsāra, the circle of birth and death. 

Of whom are you? 

From where have you come? 

Brother, ponder over these concepts


का ते — who, your; 

कांता — beloved, wife; 

क: ते — who, your; 

पुत्र — son; 

संसार: — circle of birth and death; 

अयं — this; 

अतीव — great, excessively; 

विचित्रम् — strange, mysterious, wonderful; 

कस्य — whose; 

त्वं — you; 

वा — who; 

कुत: — from where; 

आयात: — arrived, have come from; 

तत्त्वं — truth, essence; 

चिंतय — think well, consider; 

तदिह — that; here; 

भ्रात: — brother.



त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु  ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२