॥ भज गोविंदम् ॥

श्लोक 6


यावत्-पवनो निवसति देहे

तावत्-पृच्छति कुशलं गेहे |

गतवति वायौ देहापाये

भार्या बिभ्यति तस्मिन् काये ‖6‖


यावत् = जोपर्यंत

पवनो = श्वास (वायु)

निवसति = निवास करत आहे

देहे = शरीरात

तावत् = तोपर्यंत

पृच्छति = विचारपूस केली जाते

कुशलं = क्षेमकुशल

गेहे = घरात

गतवति = निघून गेल्यानंतर

वायौ = श्वास वायु

देहापाये = देह पडल्यावर, मरण पावल्यावर

भार्या = स्वतःची पत्नी देखील

बिभ्यति = घाबरते

तस्मिन् = त्या 

काये = मृत शरीराला


जोपर्यंत शरीरात श्वासोच्छ्वास सुरू आहे म्हणजे मनुष्य जिवन्त आहे (भले मग icu मध्ये व्हेंटिलेटरवर बेशुद्ध स्थितीत का असेना?!), तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या स्वास्थ्याबद्दल प्रेमळपणे विचारपूस करतात. पण जेव्हा जीवन-श्वास थांबतो आणि शरीर हे गतप्राण अवस्थेत प्रेतरूप होऊन अचेतन अवस्थेत पडते, तेव्हा त्याची स्वतःची पत्नी जिने जीवनभर साथ सोबत दिली आहे, ती सुद्धा त्या प्रेताला भीत असते.


भज गोविंदम् हे भजन सूक्त निर्वाणसमय समीप आला असताना करून अतिशय स्पष्ट कठोर शब्दात करून दिलेली सत्याची जाणीव आहे


विशेषतः जे 50-60-70 च्या वयात आहेत त्यांना जीवनाची अशाश्वतता व देहाची क्षणभंगुरता याची स्पष्ट जाणीव करून देण्यासाठी हा श्लोक आहे कि ज्यामध्ये हे सांगितले आहे कि जिच्या भोवती तुमचं सगळं आयुष्य गुंफलेलं असतं, जी सर्व प्रसंगात प्रत्येक क्षणांत तुमची भागीदार असते, अनेक जोडप्यांबाबत तुमचं व तिचं एकमेकांवर निरतिशय प्रेम असतं, वयाच्या या वळणावर शारीरिक पेक्षा मानसिक अद्वैत साधलेलं असतं, दो जिस्म मगर एक जान है हम असं परस्परावलंबित्व आलेलं असतं अशाही स्थितीत दोघांपैकी एकजण जेव्हा आधी हे जग सोडून जातो तेव्हा पुढच्या काही क्षणात मिनिटात तासातच अचेतन अशा त्या देहाबाबत ममत्व नाहीसे होते. उलट त्या अचेतन देहाची भीती वाटू लागते. ही जर स्थिती या देहाची व तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हाला हवं नको ते पाहणाऱ्या कुटुंबियांची होत असेल तर मग शक्य तितक्या लवकर भगवद्भक्तिमध्ये आपले मन समर्पित करणे हे श्रेयस्कर होय


चरकसंहिता म्हणते 

सर्वमन्यत् परित्यज्य शरीरमनुपालयेत् ।

तदभावे हि भावानां सर्वाभावः शरीरिणाम् ॥

म्हणजे बाकी सर्व बाबी बाजूला ठेवून आधी स्वतःच्या शरीराचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे हे करावे. कारण शरीरच नसेल तर हे सर्व जग तुमच्यासाठी अस्तित्वात नसतेच. जान है तो जहाँ है

आणि

धर्मार्थकाममोक्षाणामारोग्यं मूलमुत्तमम् ॥

शरीर फक्त जिवन्त असून उपयोग नाही तर धर्म(प्राप्त किंवा स्वीकृत कर्तव्ये, duties), अर्थ (धन, सुविधा साधने) , काम (स्त्री सौख्य आणि खरंतर सर्वच कामना इच्छा स्वप्न आकांक्षा आशा मनीषा तृष्णा लालसा वासना ध्येय साध्य लक्ष्य) हे साधायचं असेल तर अस्तित्वात असलेलं शरीर हे सक्षम समर्थ। कार्यक्षम म्हणजेच निरोगी स्वस्थ आरोग्यसंपन्न सबळ असलं पाहिजे


मला आजपर्यंत काहीही झालं नाही, एक गोळी घ्यायची गरज पडली नाही ... हे म्हणणाऱ्या माणसांनी हे लक्षात घ्यावे कि त्यात तुमचं कौतुक करावे असे काहीही नाही. उलट तुम्ही इतके अनाचार बेशिस्त अपथ्य व्यसनं करूनही आजपर्यंत शरीर सुदृढ आहे याचा अर्थ तुमच्या आईवडिलांनी व देवाने तुम्हाला इतका चांगला देह दिला याबद्दल तुम्ही त्यांचे आभारी ऋणी असलं पाहिजे


थोडक्यात देह नश्वर आहे हे किमान 50-60-70 नन्तर तरी स्वीकारून त्याच्या आरोग्याची योग्य ती काळजी ही आहार विहार/वागणूक मनःस्थिती व्यायाम औषधे रिपोर्ट याबाबतीत शिस्तबद्ध राहून घेणे हेच श्रेयस्कर होय


आपली काळजी दुसऱ्याला घ्यावी लागणार नाही इतपत आपण स्वतःची काळजी घेणं, हे आपलं प्राथमिक कर्तव्य 50-60-70 या वयात निश्चितच असतं


आपण बेशिस्त निष्काळजी वागून icu मध्ये परावलंबी होऊन आडवं पडायचं आणि आपल्या कुटुंबियांचा वेळ पैसा ऊर्जा संसाधने (time money energy resources) हे व्यर्थ दवडायचे हा शुद्ध बेजबाबदार मूर्खपणा आहे


सेवा करणे हे जरी माणुसकी भूतदया परिजनांचे समाजाचे कर्तव्य असले तरी आपली सेवा दुसऱ्याला करावी लागेल इतक्या हीनदीन अवस्थेत जाण्यापासून स्वतःला वाचवणे हेही प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे


जीवनभर मरमर कष्ट केल्यानन्तर समाधानाचे आनंदाचे कृतकृत्येचे क्षण अनुभवायचे असतील तर आरोग्य अंतिम श्वासापर्यंत उत्तम ठेवणे हे प्रत्येक माणसाचे प्राधान्य व अग्रक्रम असलेले महत्कर्तव्य आहे


आणि अशा आरोग्यसंपन्न स्थितीतच भगवद्भक्ती ही सार्थक होणे संभवते


When one is alive, his family members enquire kindly about his welfare. But when the life-air stops and the soul departs from the body, even his wife runs away in fear of the corpse


यावत् yāvat — so long as; 


पवनो pavano — air, breath; 


निवसति nivasati — lives dwells; 


देहे dehe — in the body; 


तावत् tāvat — till then; 


पृच्छति pṛcchati — asks, inquires; 


कुशल kuśalaṁ — welfare, wellness; 


गेहे gehe — in the house, at home; 


गतवति gatavati — while gone, departing;


वायौ vāyau — air, life-breath; 

 

देहापाये dehāpāye — when life departs the body, loss; 


भार्या bhāryā — wife; 


बिभ्यति bibhyati — is afraid, fears; 


तस्मिन् काये tasmin kāye — that body.


वरील श्लोकात असलेल्या गेहे वायौ भार्या बिभ्यति या व प्रत्येक शब्दाचे विभक्ती कारक संधि असे संस्कृत दृष्ट्या व pṛcchati kuśalaṁ असे diacritic mark (डायक्रिटिक मार्क) देऊन केलेली विलक्षण स्पेलिंग काय आहेत हे सविस्तर सांगणे शक्य असले तरी आवश्यक नाही


श्रीकृष्ण या शब्दाचे स्पेलिंग shrikrishna shrikrushna न होता śrīkr̥ṣṇa होते 


हृषीकेश याचं स्पेलिंग hrishikesh किंवा hrushikesh न होता hr̥ṣīkēśa असं होतं


त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु  ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२