भज गोविंदम् ।

श्लोक 4


नलिनी-दलगत-जलम् अतितरलं

तद्वज्जीवितम् अतिशयचपलम् |

विद्धि व्याध्यभिमान-ग्रस्तं

लोकं शोकहतं च समस्तम् ‖ 4 ‖


कमळाच्या पानावर पडलेलं पाणी तिथंच स्थिर राहू शकत नाही, ते कोणत्याही क्षणी तिथून घरंगळून खाली पडू शकतं; अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवन हे क्षणभंगुर अशाश्वत अनिश्चित आहे. याचा विदारक अनुभव कोरोनाच्या काळात दीड दोन वर्षे जगभर सर्वांनी घेतला आहेच


जीवन जर इतकं अनपेक्षित धक्कादायक unpredictable अनिश्चिततेने भरलेले आहे तर मग अशा स्थितीत (विशेषतः जे पैलतीराच्या जवळ पोहोचलेत त्यांनी तरी) धनसंचय व भोगलालसा यांपासून परावृत्त होऊन, भगवद्भक्तिमध्ये मन रमवले पाहिजे आणि त्यासाठीच भज गोविंदम् ।


जीवन जसे चंचल आहे तसेच धन आणि विविध भोग विषय सुदधा (लालसा वासना कामना इच्छा यांचे विषयही) तितकेच चंचल आहेत, म्हणूनच त्यात गुंतून राहण्यापेक्षा भज गोविंदम् हे हितकर होय


माणूस नेहमी भविष्यासाठी / उद्यासाठी पैसे साठवून ठेवत असतो, परंतु ते भविष्य, तो उद्या ... "आता" प्रत्यक्षात येऊन उभा ठाकलाय, तेव्हा तरी 'मिळवत राहण्यापेक्षा', त्या अर्जित / संचित धनाचा उचित उपभोग विनियोग हा करायला हवा. आल्फ्रेड नोबेल,  रॉकफेलर, बिल गेट्स, टाटा यांच्यासारखे प्रचंड सामाजिक योगदान नाही देता आले तरी , ज्या समाजव्यवस्थेत social infrastructure मध्ये राहून मी हे धनार्जन करू शकलो, त्या समाजव्यवस्थेचे मी काही देणं लागतो, हे भान ठेवता आलं तर , क्षणभंगुर जीवनाला चिरंतन सार्थकता लाभू शकेल.


संभोगातून समाधी कडे असं आचार्य भगवान ओशो रजनीश म्हणाले आहेत. याचा विपरीत विवादास्पद अर्थ काढून नाहक बदनामी केली गेली. परंतु 'संभोग' याचा अर्थ ... सम्यक उचित योग्य प्रकारे / विधिने, उपभोग विनियोग उपयोग सेवन करणे, असा होतो. 


एखादी गोष्ट मिळावी म्हणून मनाला बराच काळ आस लागून राहिलेली असते, पण एकदा ती गोष्ट मिळाली कि अल्प काळातच त्यातला रस कमी होऊन जातो व आधी हवीहवीशी वाटणारी गोष्ट काही दिवसांनी बाजूला पडून जाते. तसे प्रत्येक गोष्टीचा सम्यक उपभोग घेतला कि त्याच्यापासून निवृत्ती येऊन मन समाधान पावते व सार्वत्रिक सार्वकालिक समाधान म्हणजेच समाधी होय. 


योग: चित्तवृत्ति निरोध: अशा प्रकारे बळजबरीने मनाला (निरोध) अडवून काही साध्य होणार नाही, त्यापेक्षा एकेक गोष्टीचा सम्यक उपभोग घेतल्याने त्यात काही राम/अर्थ/सुख नाही हे कळून, जो अक्षय्य आनन्द आहे, त्या आत्मा या शाश्वत तत्त्वाकडे मन हळूहळू येऊन स्थिरावते, हा खरा योग आहे 


आत्मस्थे मनसि स्थिरे अशा योग शब्दाची व्याख्या चरकसंहिता या आयुर्वेद ग्रंथात आहे, कि जी 'योग: चित्तवृत्ति निरोध:' या पेक्षा अधिक समर्पक आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे.


फुलपाखराच्या मागे जोरजोराने धावलं, तर ते अधिकाधिक दूर जाईल, पण शांतपणे डोळे मिटून बसून राहिलो, तर तेच फुलपाखरू अलगदपणे खांद्यावर येऊन विसावेलही, कदाचित!!


म्हणूनच चंचल अस्थिर अशा जीवनात दृढ स्थिर असं काही प्राप्त करायचे असेल तर शांतपणे निरंतर भज गोविंदम् हाच उपाय होय!


50-60 वय झाल्यानंतर तरी आपण संचय केलेल्या धनाचा स्वतःच्या राहून गेलेल्या postpone केलेल्या इच्छा स्वप्न हौस यासाठी विनियोग करणं हाही संभोग म्हणजे सम्यक भोग आहे , जो तुम्हाला इच्छा पूर्ती, स्वप्न साकार, हौस भागली या आनंदाच्या मार्गाने समाधानाकडे म्हणजेच समाधिकडे घेऊन जाईल.


तीच बाब स्त्रीपुत्र मोहाची , 50-60 वयात हळूहळू स्त्रीदेह आकर्षण व स्त्री/तज्जन्य संतति यांची अतिकाळजी गाढवाप्रमाणे जबाबदारी वाहत राहणं, हे हळूहळू कमी करून deligation of responsibilty करणं, हाही चंचलता अस्थिरता अधीरता हळवेपणा anxiety यातून स्वतःला वाचवून स्थिर आनंदाकडे जाण्याचा मार्ग आहे


विद्धि व्याध्यभिमान ग्रस्तं

लोकं शोकहतं च समस्तम् ‖


जसं वैयक्तिक जीवन हे चंचल क्षणभंगुर अशाश्वत आहे तसेच सम्पूर्ण विश्व हेही शारीरिक व्याधींनी त्रस्त, अहंकार व तज्जन्य क्रोध काम लोभ असूया मत्सर दंभ व तदुद्भव नैराश्य वैफल्य भय या व तत्सम अनेक इतर मानसिक दुर्भावनांनी ग्रस्त/ग्रसित/बाधित आहे


40-50वया पर्यंत अंगात रग (शरीरात सामर्थ्य) असते , मनाचा उत्साह दांडगा असतो, तोवर शरीराकडे केलेले दुर्लक्ष, केलेली शरीर मानस ओढाताण फरफट dragging हे 50-60 च्या वयात निसर्ग व्याजासहित परत देतो , ते विविध शारीरिक व्याधि व अनेक मानसिक धक्के या स्वरूपात!!


इष्टस्य अलाभात् व लाभात् च अनिष्टस्य, म्हणजे हवं ते न मिळणं, नको तेच पदरी पडणं आणि हवंहवंसं जे हाती आहे, ते अनपेक्षितपणे गमावणे... यामुळे शोक होतो. पण हे प्रत्येकाच्या जीवनात कुठल्यातरी वळणावर घडतंच. म्हणूनच 'जगी सर्वसूखी असा कोण आहे', असं समर्थ रामदास स्वामी यांचं सद्वचन आहे


पण हे शारीरिक व्याधी व मानसिक त्रास हे आपल्याच कुठल्यातरी ज्ञात अज्ञात कुकर्माचे दुष्परिणाम आहेत असं मानलं तर, शोकावर विजय मिळवता येतो आणि त्यासाठीच तर भज गोविंदम् ।


तू न जाने आसपास है खुदा

किंवा

सदा सर्वदा देव सन्निध आहे । 

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे ।।


याची अनुभूति ही 

भज गोविंदम् । 

हरि मुखे म्हणा । 

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी। 

सुमिरन कर ले मेरे मना ।

यातून लाभते


नलिनी-दलगत-जलम् अतितरलं

तद्वज्जीवितम् अतिशयचपलम् |

विद्धि व्याध्यभिमान-ग्रस्तं

लोकं शोकहतं च समस्तम् ‖ 4 ‖


As water drops on a lotus leaf are unsteady and trembling, in the same way life in this world is exceedingly unsteady and restless. Know that the whole world is full of miseries, afflicted by unhappiness and grief.


नलिनी दल nalinī-dala — on a lotus leaf;

गत gata — gone to, fallen on; 

जल jala — warter drop; 

अति तरल ati-taralaṁ — unstable, unsteady, tremling; 

तद्वत् tadvat — like that, in the same way; 

जीवितम् jīvitam — life; 

अतिशय atiśaya — extremlyl; 

चपलम् capalaṁ — unsteady, fickle, restless; 

विद्धि viddhi — know for sure; 

व्याधि vyādhi — disease, ailment;

अभिमान abhimāna — pride, conceit;

ग्रस्तम् grastaṁ — having been caught, afflicted by, seized; 

लोकम् lokaṁ — world; 

शोकहतम् śokahataṁ — attacked by grief, unhappiness; 

च ca — and; 

समस्तम् samastam — all, entire.

🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण  म्हेत्रे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२