श्रीमद्भगवद्गीता
अध्याय ९
भक्ति योग
अनन्य भक्ति योग
तोडोनि संस्कृताचे अरण्य ।
प्रकटविले ज्ञानाचे हिरण्य ।
ज्ञानेश्वर माऊलीचे कारुण्य ।
धेनूची वत्सावरी जणू ।।
30 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी वाचली तेव्हा लिहिलेली ही स्वरचित ओवी!!!
सारांश कि गोषवारा!?
या अध्यायाचा सारांश एका एका श्लोकात सांगणं शक्य आहे किंवा खरंतर एकाच श्लोकात सांगता येईल
गोषवारा म्हटलं कि अध्यायात कोणकोणते विषय आहेत ते सांगणं, त्याची परस्पर संगती सांगणं व त्यावर स्वतःला उमगलेले आहे ते शब्दांत मांडणं
सारांश एकाच श्लोकात असा कि ,
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
अनन्य म्हणजे दुसरं कुणीही नाही, एकच. एकाग्र भावनेने.
पर्युपासना. परि म्हणजे सर्व बाजूंनी.
नित्य अभियुक्त म्हणजे always connected. कधीतरी, वेळ मिळेल तसं असं नाही. तर निरंतर , प्रत्येक क्षणी उपास्य दैवताशी एकनिष्ठ असणं
अशा भक्ताचा योगक्षेम भगवन्त चालवतात
योग म्हणजे जे नाही ते आणून देणे, ज्याची उणीव आहे, त्याची पूर्तता करणे. क्षेम म्हणजे जे दिलेले आहे, ते चिरंतन टिकवून ठेवणे maintain करणे
सोप्या मराठीत , ज्याचा सखा हरि, त्यावरी विश्व कृपा करी
असाच सारभूत श्लोक म्हणजे
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।
भगवंताला काय अर्पण केलं हे महत्त्वाचं नसून, भक्तिभावाने जे काही अर्पण करू भगवन्त स्वीकारतो
त्वदीय वस्तु गोविंद, तुभ्यमेव समर्पये
तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा
असंच अजून एक जीवनाधार असणारं भगवंताचे दिव्य वचन म्हणजे
न मे भक्तः प्रणश्यति
व्याकरण दृष्ट्या खरं नसलं , तरी बाबामहाराज सातारकर यांनी कीर्तनात सांगितलं आहे कि जो देवापासून 'विभक्त' होत नाही तो भक्त!
भक्ति हीच सर्वश्रेष्ठ आहे
म्हणूनच जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी गूढ गहन तत्त्वज्ञान लिहूनही शेवटी भज गोविंदम् मूढमते असंच सांगितलं
याबाबत राजाजी यांची या भजनाच्या आधीची इंग्रजी भाषेतील प्रस्तावना अतिशय श्रवणीय व मननीय आहे
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
माझ्या ठायी मन जडू दे, माझा भक्त हो, माझेच यजन कर, मला नमस्कार कर ; इतकं स्पष्ट शब्दात स्वतः भगवंत सांगतात
पुण्याच्या जोरावर स्वर्गाची कामना धरण्यापेक्षा भगवंताला सर्व काही समर्पण केलं तर कर्मजन्य पापपुण्य यामुळे होणाऱ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते
कोणत्याही दैवताची उपासना केली तरी ती अंततः अविधीपूर्वक का होईना पण भगवंतांचीच उपासना होय
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाऽहमहमौषधम्।
मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्।
प्रत्येक कृतीतील प्रत्येक घटक भगवंतच आहे.
कणाकणात भगवंतच भरून उरलेला आहे , याचाच सोदाहरण विस्तार पुढील अध्याय विभूतियोग यात केला आहे
पण त्याच अध्यायाच्या शेवटी भगवन्त अर्जुनाला सांगतात कि हे सगळं जाणून तुला काय करायचंय, इतकंच समज कि माझ्या केवळ एका अंशाने मी हे अवघे विश्व व्यापलेले आहे
अर्जुनाला इतकं स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,
त्यामुळे आपणही गूढ गहन तत्त्वज्ञान समजून घेण्यात स्वतःची दमछाक करण्यापेक्षा भगवंताची अनन्य भावाने निरंतर उपासना केली तर जन्म सार्थकी लागेल
आम्हा ना कळे ज्ञान, ना कळे पुराण । वेदांचे वचन ना कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझे।।
असे संतवचन आहेच.
म्हणूनच प्रारंभी लिहिलं कि
या अध्यायाचा सारांश एकाच श्लोकात असा कि ,
अनन्याश्चिन्तयन्तो
मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां
योगक्षेमं वहाम्यहम्।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा