exess eating
जीभ या इंद्रियाचे अति लालन, या विषयाला, तपशीलवार मुद्देसूद प्रारंभ करण्यापूर्वीच, आपण चार भागांची लांबलचक प्रस्तावनाच फक्त पाहत आहोत. म्हणजे हे नमनाला घडाभर नसून तर पिंप भरून तेल झालेलं आहे!!😆😬 ... असो या निमित्ताने या विषयाचा आवाका किती मोठा आहे आणि हा विषय आपल्या जीवनाला कसा कणाकणाने क्षणाक्षणाने व्यापून उरलेला आहे, हे लक्षात येईल.
फाजील लाड किंवा अति लालन असे म्हणताना, त्याच्या विरुद्ध योग्य शिस्त पालन, असा शब्द येईल. योग्य ती शिस्त पालन करताना , काय खावे हा "पदार्थांचा (menu / items)" विचार आणि किती खावे हा "प्रमाणाचा (quantity / proportion)" विचार केला गेला पाहिजे, तसेच कधी खावे हा "काळाचाही (frequency duration / occasion)" विचार त्यात यायला पाहिजे.
जसे आपण लंघन बृंहण अपतर्पण संतर्पण हे शब्द पाहिले, तसाच एक अति संपूरण असा शब्द असतो , हिंदीत त्याला ठूंसना; मराठीत त्याला कोंबणे, हादडणे, तोबरा भरणे असे म्हणतात!!😇🙃
गरजेपेक्षा कितीतरी अधिक खाणं, हे प्रायः चालूच असतं!!! एक उदाहरणादाखल म्हणून पाहूया ... सकाळी उठल्यानंतर मी तांब्याभर गरम पाणी पितो किंवा लिंबू पाणी पितो.
नंतर मग भिजवून ठेवलेले बदाम (पिस्ते काजू मनुके अंजीर) असे ड्रायफ्रूट खातो.
मग मी चालायला जातो आणि चालून आल्यानंतर स्मूदी पितो किंवा ग्रीन टी घेतो किंवा चहा कॉफी दूध याच्याबरोबर दोन चार सहा बिस्किटे खातो.
मग आंघोळ करून झाली की, थोड्या वेळाने नाष्टा करतो त्यात उपमा पोहे इडली डोसे शिरा असे खातो आणि मग काही फ्रुट्स/फळे खातो.
मग दुपारच्या जेवणात मी पोळी भाजी वरण भात असं "सगळं" खातो.
मग दुपारी वेळ मिळाल्यास अर्धा तास ते दीड दोन तास झोप काढतो.
मग चार वाजता उठून पुन्हा चहा कॉफी त्याच्याबरोबर दोन बिस्किटे किंवा खाकरा असे खातो.
संध्याकाळी साडेसहा सात ला फिरायला गेल्यानंतर चाट स्वरूपात पाणीपुरी भेळ असे खातो.
मग रात्रीचे जेवण म्हणून पुन्हा चारीठाव पोळी भाजी वरण भात खातो.
रात्री उशिरा सोसायटीच्या बाहेर चौकापर्यंत फिरायला गेल्यानंतर आईस्क्रीम किंवा मिल्क शेक किंवा कोल्ड कॉफी असे पितो.
... आणि मग घरी आल्यानंतर इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीचे दूध पितो.
शिवाय वीकेंडला मी जवळच्या पिकनिक स्पॉटला रिसॉर्टला जातो... तिथे सकाळी मिसळ वडापाव भजी असे खातो.
दुपारी चिकनचा बेत असतो.
संध्याकाळी बिर्याणी किंवा चकणा याच्याबरोबर आठवड्यातून एखाद्या वेळेस थोडेसेच मद्यपान करतो.
वीकेंडला रिसाॅर्ट पिकनिक नाही जमलं तर मग आमचं फेवरेट हॉटेल ठरलेलेच आहे. वीकेंडला कुठे घरात खायचं असतं का कधी?! ... काहीतरीच 😉
आणि अगदी हॉटेलला बाहेर जाणं जमलं नाहीच तर काहीतरी आम्ही ऑनलाईन मागून पिझ्झा पास्ता असे एन्जॉय करतोच करतो!!🤪
प्रत्येक जण हे सगळंच करत असेल असं नाही, परंतु यातल्या अनेक गोष्टी ह्या वयानुसार व ऋतूनुसार अनावश्यक असतात आणि त्याच रोगाला निमंत्रण देतात!!!
आपण पूर्वी जसे पाहिले तसे , साधारणतः 20 किंवा उशिरात उशिरा 25 या वयापर्यंत शरीर हे वाढीच्या वयात असते. तोपर्यंत सर्व प्रकारचे पदार्थ, मोठ्या प्रमाणात, वारंवार खाल्ले तरी शरीराची वेगाने होणारी वाढ आणि त्या काळात असणारे शारीरिक हालचालीचे प्रमाण, यामुळे ते सगळं खाणं , ते सगळे पदार्थ आणि ते सगळं प्रमाण आणि ती सगळी वारंवारिता (frequency) ही शरीराला सहन होऊ शकते, पचू शकते, जिरू शकते, उपयोगीही पडू शकते .
परंतु आज या ग्रुपमध्ये ज्या वयातले सरासरी लोक आहेत, ते प्राय हा तेच 35 40 45 च्या पुढची आहेत, असा माझा समज आहे ... तर हे जे वय असतं 25 30 च्या पुढचं, यात शरीरात आता कोणतीही नवीन वाढ होणार नसते . शारीरिक वाढ ही पूर्ण झालेली असते . आपले शरीर हे पूर्ण प्रौढ पोक्त असते. त्या अशा परिस्थितीत तिन्ही त्रिकाळ चारीठाव खाणं हे योग्य नसतं. जे खाणं आणि जितकं खाणं, आपण ऊर्जेच्या स्वरूपात शक्तीच्या स्वरूपात हालचालीच्या स्वरूपात वापरून काढू शकणार नाही , ते खाणं आणि तितकं खाणं हे शरीरात अनावश्यक स्वरूपात साठत जातं ... मग ते उष्णता अम्लपित्त ॲक्ने ॲसिडिटी गॅसेस अपचन कफ सर्दी ॲलर्जी वजन मेद फॅट तोंद चरबी ढेरी टमी कोलेस्टेरॉल युरिया क्रिएटिनिन शुगर गळवं ॲब्सेस गाठी फायब्राॅइड ग्रंथी सिस्ट पीसीओडी अशा कुठल्याही स्वरूपात ते शरीरात विकृत म्हणजे नको त्या म्हणजे बिघडलेल्या अशा स्वरूपात साठत राहते. कधी ते किरकोळ स्वरूपाचे असते तर कधी ते अतिशय गंभीर स्वरूप धारण करू शकते म्हणून आपल्या वाढत्या वयामध्ये, आपले शरीर वाढते राहणार नाही याची जागरूकपणे सावधपणे काळजी घेणे आणि त्यासाठी तोंडावर आणि मनावर संयम ठेवणे हे शहाणपणाचं होय. "रूप तेरा ऐसा, दर्पण में ना समाये", अशी आरशाच्या रुंदीत मावणार नाही, इतकी अवाढव्य परिस्थिती, आपल्या शरीराची होऊ देऊ नये. अ-वाढव्य म्हणजे वाढण्यासाठी जागा आता शिल्लक नसणे!! जणू काही, टू व्हीलर वर बसल्यानंतर, दोन्ही बाजूंनी आता लोंबकळणारा मेद सांडेल, अशी परिस्थिती अनेकांच्या शरीराची होऊन जाते !!
जसे वाढत्या वयानुसार खाण्यात बदल व्हायला पाहिजेत, तसेच ते प्रौढ स्त्रियांच्या बाबतीत, त्यांच्या शरीरात होणाऱ्या, पाळी जाण्याच्या वयातल्या बदलानुसार / अवस्थेनुसारही व्हायला हवेत. त्यासाठी योग्य ते वैयक्तिक मार्गदर्शन आपल्या विश्वासाच्या डॉक्टरांकडून घ्यावे, हे इष्ट!!!
कधी खावे हा काळाचा विचार, जसा आपण सकाळ दुपार संध्याकाळ रात्री किंवा बालपण तारुण्य परिपक्व अवस्था वार्धक्य यानुसार करतो ... तसाच तो उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूनुसारही करायला हवा!! खरं तर ऋतू हे तीनच नसून, ते सहा असतात !! प्रत्येक दोन महिन्यांचा एक ऋतू होतो. म्हणून बारा महिन्यांमध्ये सहा ऋतू असतात. मंगेश पाडगावकरांचं "या जन्मावर या जगण्यावर" या गाण्यांमध्ये "सहा ऋतूंचे सहा सोहळे" असे वाक्य आहे. हे सहा ऋतू म्हणजे आत्ता सुरू असलेला शिशिर, नंतर येणारा वसंत, मग ग्रीष्म , मग वर्षा , मग शरद् आणि आत्ताच गुलाबी थंडी संपलेला हेमंत आणि आत्ता सुरू असलेल्या बोचऱ्या थंडीचा शिशिर असे हे सहा ऋतू आहेत.
या प्रत्येक ऋतूमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये दर महिन्याला एक वेगळा सण येतो ... दर दोन महिन्यांनी तर नक्कीच येतो.
ऋतू बदलला की नवीन सण येतो, त्याला नवीन प्रकारचे खाणे पिणे, हे त्या सणाच्या निमित्ताने होत असते.
आपण थंडीच्या सुरुवातीला दिवाळी साजरी केली आणि तळायला तेलकट दुप्पट पचायला जड असे फराळाचे लाडू करंजी अनारसे शंकरपाळ्या हे पदार्थ खाल्ले ...
आणि उद्या बोचऱ्या थंडीमध्ये संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळगुळ खाणार आहोत
पुढे येणाऱ्या पाडव्याला आपण हरभऱ्याची डाळ आणि कडुनिंब खाणार आहोत
होळीला आपण मोठी गोवऱ्यांची राशी पेटवणार आहोत
अक्षय तृतीयेला पाण्याचा घडा आणि आम्रफल पूजन
वटपौर्णिमेला वडाची पूजा
आषाढात आखाड तळणार
नागपंचमीला आपण लाह्या खाणार आहोत श्रावणात आपण उपास करणार आहोत
गणपतीत 21 पत्री
पितृ पंधरवड्याला मध्ये 21 भाज्या
शरद ऋतूमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेला रात्री चांदण्या मध्ये बसून दूध पितो
या रूढी हे आहारीय पदार्थ, त्या त्या ऋतूमध्ये का आले??? या सणांचा आणि ह्या आहारीय पदार्थांचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे ??? याविषयी काही लेख आणि काही व्याख्याने ही वीस वर्षांपूर्वी तयार करून ठेवलेली आहेत. त्याच्या लिंक यानंतर देत आहे. कुतूहल उत्सुकता स्वारस्य इंटरेस्ट असल्यास जिज्ञासू व्यक्तींनी ते पाहावे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा