सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २०१ ते २१३

सार्थ ज्ञानेश्वरी

🌼 अध्याय २ रा  

🏹 ओवी २०१ ते२१३ 

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

➖➖➖➖👇➖➖➖

🌻अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते॥ ३४॥

अर्थ 👉 सर्व लोक तुझी सर्वकाल अपकीर्ती सांगत राहातील आणि संभावित पुरुषाला तर अपकीर्ती मरणापेक्षा जास्त वाईट आहे. ॥३४॥

➖➖➖➖👆➖➖➖

🌷म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील।आणि अपेश तें न वचेल ।कल्पांतावरी॥ २०१ ॥

✏ एवढ्याच करीता अर्जुना, पुन्हा ऐक, जर या प्राप्त  प्रसंगी तू आपल्या क्षत्रियधर्माचे पालन केले नाहीस; तर पाप लागेल आणि कल्पांतपर्यंत अपकीर्तीचा डाग नाहीसा होणार नाही. 

🌷जाणतेनि तंवचि जियावे ।जंव अपकीर्ति आंगा न पवे।आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां॥ २०२॥

✏  जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही, तोपर्यंतच व्यवहारी आणि सज्जनांनी जगावे; असे असताना,  मग अपकीर्ती सोबत घेऊन इथूनच (युद्ध  न करता) मागे फिरावे का?

🌷तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता। परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥२०३॥

✏ आणि जरी तू मत्सररहित दयायुक्त अंतःकरणाने माघारी फिरलास; तरी या सर्वाना ही गोष्ट अथवा तुझी ही स्थिती मुळीच पटणार नाही, 

🌷हें चहूंकडून वेढितील ।बाणवरी घेतील।तेथ पार्था न सुटिजेल।कृपाळुपणे ॥२०४॥

✏ हे कौरव तुला चोहोकडून घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. मग पार्था, तुझा हा कनवाळूपणा यातून तुझी सुटका करणार नाही. 

🌷ऐसेनिही प्राणसंकटे।जरी विपायें पां निघणें घटे।तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥२०५॥

✏ आणि जरी मोठ्या कष्टाने या प्राणसंकटातून तुझी सुटकाही झाली, तरी अर्जुना, तरी ते तसे जगणे मरणापेक्षा वाईटच आहे.

➖➖➖➖👇➖➖➖➖

🌻भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः ।येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्॥३५॥

अर्थ  👉 महारथी, भयामुळे तू रणातून परत गेलास असे तुला मानतील. ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता, त्यांच्या दृष्टीने तू कमीपणाला जाशील. 

➖➖➖➖👆➖➖➖➖

🌷तूं आणिकही एक न विचारिसी ।एथ संभ्रमे झुंजो आलासी।आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी॥२०६॥

✏ आणखीन  एक  विचार  कर की, तू  या ठिकाणी  मोठ्या उत्सुकतेने लढण्यासाठी आलास. आणि दया उत्पन्न झाल्याने परत माघारी जाण्यासाठी फिरलास.

🌷तरी तुझें तें अर्जुना।या वैरियां दुर्जनां|कां प्रत्यया येईल मना ।सांगे मज ॥२०७॥

✏ तर अर्जुना! हे दयाळूपण,  तुझे हे दूर्जन वैरी कौरव, यांच्या मनाला खरे वाटेल का?

➖➖➖➖👇➖➖➖➖

🌻अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः।निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम्॥३६॥

अर्थ 👉 तुझे शत्रू बोलण्याला अयोग्य अशी पुष्कळ भाषणे बोलतील. आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. यापेक्षा अधिक दु:खदायक ते काय आहे ? ॥२-३६॥

➖➖➖➖👆➖➖➖➖

🌷हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला।हा सांगें बोलु उरला । निका कायी॥२०८॥

✏ हे तर म्हणतील की, "गेला रे गेला ! अर्जुन  आम्हाला भिऊन पळून गेला." असा हा लोकांचा बोल तुझ्यावर येईल तो बरा आहे का.

🌷लोक सायासें करूनि बहुतें ।कां वेंचिती आपुली जीवितें।परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा॥२०९

✏ अर्जुना ! लोक आपली कीर्ती व्हावी, वाढावी  म्हणून काय काय करतात प्रसंगी आपला जीव देतात पण आपली कीर्ती वाढवतात. 

🌷ते तुज अनायसें ।अनकळित जोडिली असे।हें अद्वितीय जैसें । गगन आहे॥२१०॥

✏ आणि स्वतःची कीर्ती वाढविण्याची सुवर्णसंधी (हे युद्ध) अनायासे तुझ्याकडे चालून आली आहे. 

🌷तैसी कीर्ती निःसीम।तुझां ठायीं निरुपम।तुझे गुण उत्तम।तिहीं लोकीं ॥२११॥

✏ तशी ही अमर्याद उपमारहित कीर्ती तुझ्या  ठिकाणी आहे व तुझे गुणही उत्तम आहेत तशी तुझी त्रिलोकात ख्याती आहे.

🌷दिगंतीचे भूपति।भाट होऊनि वाखाणिती। जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥२१२॥

✏ देशदेशांतरीचे राजे रजवाडे, स्तुतीपाठक होऊन तुझीच गुणकीर्ती गातात. ती ऐकून  यमादिक देखील  तुला भितात!

🌷ऐसा महिमा घनवट ।गंगा तैसी चोखट। जयां देखी जगीं सुभट । वांठ जाहली ॥२१३॥

✏ असा हा तुझ्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे. आणि तो पाहून  व ऐकून जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ती  संपादन करण्याची प्रेरणा मिळते.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२