सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुनविषादयोग ओवी २३३ ते २४५
अध्याय पहिला
🌳 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌈 ||अर्जुनविषादयोग
🌳 ओवी २३३ ते २४५
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान्स्वबांधवान्।स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव॥३७॥
अर्थ 👉 म्हणून आमचे जे बांधव कौरव, त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही. कारण हे माधवा, स्वजनांना ठार मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ ? ॥१-३७॥
🌿🌿🌿🌿🍉🌿🌿🌿🌿
🌸म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं । परीं दिसतसे॥२३३॥
✏ म्हणून देवा, मी या युद्धात सहभाग घेणार नाही की शस्त्रही हातात धरणार नाही. कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे.
🌸तुझा अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल। तेणें दुःखे हियें फुटेल । तुजवीण कृष्णा॥ २३४ ॥
✏ कृष्णा, तुझ्याशी आमचा वियोग होईल; मग जगात आमचे महत्त्व ते काय राहणार? तुझ्यावाचून देवा, आमचे ह्रदय दुःखाने विदीर्णच होईल.
🌸म्हणावूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती। हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे॥ २३५॥
✏ म्हणून देवा, कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा ही गोष्टच माझ्या हातून कधीही घडणार नाही.
🌿🍉🌿🍉🌿🍉🌿🍉🌿
🌹यद्यप्यते न पश्यंति लोभोपहृतचेतसः| कुलक्षयकृतंदोषं मित्रद्रोहे च पातकम्३८॥
अर्थ 👉 लोभाच्या योगाने अंत:करण भ्रष्ट झालेल्या यांना (कौरवांना) जरी कुलक्षय केल्याने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक दिसत नाही ॥१-३८॥
🌹कथं ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।कुलक्षयकृतम् दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन३९॥
अर्थ 👉 तरी कुलक्षय केल्याने होणारा दोष जाणणार्या आम्हाला देखील हे जनार्दना, या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव असू नये काय ? ॥१-३९॥
🌿🍉🌿🍉🌿🍉🌿🍉🌿
🌸हे अभिमानपदे भुलले । जरी पां संग्रामा आले। तर्ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे॥२३६॥
✏ अर्जुन म्हणतो, "देवा, हे कौरव अभिमानाने उन्मत्त होवून जरी युद्ध करण्यासाठी आले असले तरी आम्ही आपले हित कशात आहे हे लक्षात घेतले पाहिजे."
🌸हें ऐसें कैसें करावें।जे आपुले आपण मारावे। जाणत जाणतांचि सेवावें।कालकूट॥२३७॥
✏ आपले आप्तेष्ट, गोत्रज आपण कसे मारावेत; जाणूनबुजून कालकूट विष कसे घ्यावे?
🌸हां जी मार्गीं चालतां।पुढां सिंह जाहला अवचितां।तो तंव चुकवितां । लाभु आथी॥२३८॥
✏ अहो, वाट चालत असताना समोरून जर अकस्मात सिंह आला; तर त्याला चुकविण्यातच फायदा (लाभ) आहे.
🌸असता प्रकाशु सांडावा।मग अंधकूप आश्रावा। तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे॥२३९॥
✏ देवा, सांग ना,असलेला प्रकाश सोडून, मुद्दाम अंधारकोठडीत जाऊन बसावे,यात कोणता लाभ आहे?
🌸का समोर अग्नि देखोनी।जरी न वचिजे वोसंडोनी।तरी क्षणा एका कवळूनि ।जांळू सके॥२४०॥
✏ किंवा समोरच अग्नी पेटला आहे, असे पाहूनही आपण दूर झालो नाही तर तो अग्नीक्षणार्धात आपल्याला भस्म करेल ना.
🌸तैसे दोष हे मूर्त ।अंगी वाजों असती पहात। हें जाणतांही केवीं एथ ।प्रवर्तावें॥२४१॥
✏ तसेच हे आप्तेष्ट; स्वजनवधाचे पाप प्रत्यक्ष आम्हाला लावू पहात आहेत. आणि कळल्यावरही आम्ही स्वजनवधास कसे तयार होऊ?
🌸ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं। या कल्मषाची थोरी । सांगेन तुज॥२४२॥
✏ एवढे सर्व बोलून अर्जुन म्हणतो, "कृष्णसख्या, हे पातक (स्वजनास मारून मिळणारे पाप) किती भयंकर आहे, ते मी तुला सांगतो ऐक."
🌿🍉🌿🍉🌿🍉🌿🍉🌿
🌹कुलक्षये प्रणश्यंति कुलधर्माः सनातनः ।धर्मे नष्टे केलं कृत्सनमधर्मोऽभिभवत्युत॥४०॥
अर्थ 👉 कुलक्षय झाला असता सनातन असे कुलधर्म नाश पावतात आणि धर्माचा नाश झाला असता अधर्म सर्व कुळ व्यापून टाकतो.॥१-४०॥
🌿🍉🌿🍉🌿🍉🌿🍉🌿
🌸जैसें काष्ठें काष्ठ मथिजे ।येथ वन्हि एक उपजे। तेणें काष्ठजात जाळिजे ।प्रज्वळलेनि ॥२४३॥
✏ ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की अग्नी तयार होतो. आणि त्याचा भडका उडाला की सर्व लाकडे (आजूबाजूला असलेलीही, की ज्यांचा काहीही घर्षणात सहभाग नसतो तरीही) जळून खाक होतात.
🌸तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें। तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे॥ २४४॥
✏ त्याप्रमाणेच जर कुळातील लोकांनी मत्सराने एकमेकाचा जर वध केला तर त्या भयंकर महादोषाने सर्व कुळाचा क्षय होतो.
🌸म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजि॥२४५॥
✏ म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून कुळधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचा प्रवेश होतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा