ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्ययोग||
ज्ञानेश्वरी अध्याय २रा
🕉️ ओवी २२६ पासून
🕉️ ||सांख्ययोग||
⛳⛳⛳🔔🏹🔔⛳⛳⛳
➖➖➖➖👇➖➖➖➖
🌻सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि॥ ३८ ॥
अर्थ 👉 सुख-सु:ख, लाभ-अलाभ, जय-पराजय ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो. मनाने असे झाले असता तुला पाप लागणार नाही ॥२-३८॥
(सूत्ररूपाने कर्मयोग = २२६-)
➖➖➖➖👆➖➖➖➖
🌷सुखीं संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावें ।आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥
✏ अर्जुना, सुख लाभले तरी आनंद मानू नये, दुःख प्राप्त झाले असता खेद मानू नये. आणि मनात लाभ किंवा हानी धरू नये.
🌷एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल। हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥
✏ या युद्धात आपल्याला जय मिळेल किंवा आपला देहच सर्वथैव नाहीसा होईल, या पुढील गोष्टींचे अगोदरच चिंतन करत बसू नये.
🌷आपणयां उचिता।स्वधर्मातेंचि रहाटतां।जे पावें तें निवांता । साहोनि जावें॥२२८॥
✏ विहित अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्रसंग आपल्याला प्राप्त होतील ते निमूटपणे सहन करत जावे.
🌷ऐसेया मनें होआवें ।तरी दोषु न घडे स्वभावें।म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥२२९॥
✏ अशा रितीने मनाचा निश्चय करून तू युद्ध केलेस तर तुला दोष सहजच घडणार नाहीत. म्हणून तू निःसंदिग्धपणे आता युध्दास आरंभ कर.
➖➖➖➖👇➖➖➖➖
🌻एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥३९॥
अर्थ👉 याप्रमाणे सांख्यविषयक बुद्धी तुला सांगितली. आता अर्जुना, कर्मयोगातील बुद्धी प्राप्त झाली असता तू कर्मबंध टाकून देशील अशा बुद्धीचे श्रवण कर. २-३९॥
➖➖➖➖👆➖➖➖➖
🌷हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ। आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां॥ २३० ॥
✏ अर्जुना, आत्ता पर्यंत हा ज्ञानयोग तुला संक्षिप्तपणे सांगितला, आता बुद्धीयोग म्हणजे निष्काम कर्मयोग, सांगतो तो तू ऐक.
🌷जया बुद्धियुक्ता।आहालिया पार्था ।कर्मबंधु सर्वथा ।बांधू न पावे ॥२३१॥
✏ अर्जुना! ज्यास निष्काम कर्म करण्याची हातवटी साधली म्हणजे त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही.
🌷जैसे वज्रकवच लेईजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे।परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता॥२३२॥
✏ ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच चिलखत घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करता येते. इतकेच नव्हे तर अंगाला शस्त्रस्पर्शही न करता विजय मिळवून राहता येते.
➖➖➖➖👇➖➖➖➖
🌻नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते।स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्॥४०॥
अर्थ 👉 या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, यामधे संकट येत नाही. या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान केले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते. ॥२-४०॥
➖➖➖➖👆➖➖➖➖
🌷तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत॥२३३||
✏ त्याप्रमाणे इहलोकीचे भोग्यसुख नाहीसे न होता मोक्षही अंतरत नाही. तो खात्रीने ठेवल्या सारखाच असतो आणि पूर्वीपासून चालू असलेले निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान शुद्धपणाने चालूच असते.
🌷कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे ।जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥२३४॥
✏ म्हणून निष्काम कर्मानुष्ठान करीत रहावे. परंतु कर्मफलाची इच्छा धरू नये. जसा पंचाक्षरी मंत्रवेत्ता, भूतापासून बाधा पावत नाही.
🌷तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि।हां असतांचि उपाधि । आंकळू न सके॥२३५॥
✏ कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निरभिमान बुद्धीने कर्म करावे. हा उपाधित असूनही उपाधी त्याला जन्म मरण द्वारा बाधा करू शकत नाही.
🌷जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंपनी ।गुणत्रयादि लेप । न लगती जेथ॥२३६॥
✏ हे योगी ज्या परमतत्व स्वरूप ब्रह्मस्थितीस प्राप्त होतात, अर्जुना, तेथे पाप पुण्यादि कर्मजन्य अदृष्टाचा प्रवेश होत नाही. आणि त्रिगुणादिकांचा त्यास मुळीच स्पर्श होत नाही.
🌷अर्जुना ते पुण्यवशें ।जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे।तरी अशेषही नाशे । संसारभय॥२३७॥
✏ अर्जुना! सद् बुद्धी जर अनंत जन्मीच्या पुण्याईच्या बलाने थोडीशीच अंतःकरणात प्रकाशित, प्रगट झाली तर तेवढ्यानेच संसाराची भीती नाहीशी होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा