सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १६४ ते १७५
ज्ञानेश्वरी अध्याय२रा
⚔ ओवी १६४ते१७५
🗡 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🛎 ||सांख्य योग||
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖➖🌈➖➖➖➖
👑अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥२८॥
अर्थ 👉 अर्जुना हे प्राणिमात्र जन्मापूर्वी अमूर्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात व पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्तच बनतात, मग शोक कसला? ॥२-२८॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌷जें समस्तें इयें भूते । जन्मा आदि अमूर्ते।मग पातलीं व्यक्तीतें ।जन्मलेया ॥१६४॥
✏ (आता दुसर्या पद्धतीने श्रीकृष्ण अर्जुनास समजावतात ते पहा)
अर्जुना, उत्पत्तीपूर्वी हे सर्व प्राणी, निराकार होते. मग जन्म धारण केल्याने ते आकाराला प्राप्त झाले.
🌷तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती।देखें पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥
✏ आता मृत्यू झाल्याने, ते परत आपल्या मूळ ठिकाणी जातात आणि ते ही धारण केलेल्या आकाराने (देहाने) नाही तर पूर्वीच्या आपल्या निराकार स्थितीनेच.
🌷येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें।तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं॥१६६॥
✏ आता मध्यंतरी म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन अवस्थांच्या मधे जो व्यक्त, प्रत्यक्ष धारण केलेला आकार, हा निजलेल्या मनुष्याला स्वप्न दिसते, त्या प्रमाणेच होय. हा जगाचा आकार मायेच्या योगाने सत्य ब्रह्मस्वरूप अधिष्ठानावर भासतो.
🌷ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।का परापेक्षा अळकांर- । व्यक्ति कनकीं॥१६७॥
✏ जसे की, हवेच्या स्पर्शाने पाण्यावर लाटा तयार होतात, किंवा सोनाराच्या स्पर्शाने सोन्याचे ठिकाणी अलंकाराचा आकार व्यक्त होतो.
🌷तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित।जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥१६८॥
✏ तसे हे सर्व मायाकार्य असल्याने (मिथ्या अनिर्वचनीय उत्पन्न झालेले.) खोटेच भासते. जसा आकाशात मेघांचा पडदा भासतो.
🌷तैसें आदीचि जें नाही ।तयालागीं तूं रुदसि कायी ।तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥१६९॥
✏ जे मुळातच नाही, त्याबद्दल तू शोक का करतोस? त्यापेक्षा नित्य असे जे ब्रह्मचैतन्य आहे त्याकडेच पहा. त्या चैतन्याचेच आत्मियतेने ज्ञान संपादन करून घे.
🌷जयाचि आर्तीचि भोगित ।विषयी त्यजिले संत।जयालागीं विरक्त । वनवासिये॥१७०॥
✏ त्या ब्रह्मचैतन्याचेच ज्ञान होण्यासाठी संत, साधु, ऋषी हे विषयाचा त्याग करून वनवासी होतात.
🌷दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें।मुनीश्वर तयातें आचरताती॥१७१॥
✏ आणि त्या ब्रह्मप्राप्तीकडे लक्ष ठेवून श्रेष्ठ मुनी ब्रह्मचर्यादि व्रते तपे आचरतात.
➖➖➖➖🌈➖➖➖➖
💚आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः।आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति।शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित्॥२९॥
अर्थ 👉 कोणी या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पहातो व विसरून जातो, कोणी आश्चर्याप्रमाणे याविषयी बोलतो व तल्लीन होतो. आणखी कोणी आश्चर्याप्रमाणे या विषयी ऐकतो व देहाला विसरतो पण त्याप्रमाणे पाहून, वर्णन करून व ऐकूनही यापैकी कोणी याला तत्वत: जाणत नाहीत. ॥२९॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌷एक अंतरी निश्चळ । जें निहाळितां केवळ।विसरले सकळ । संसारजात ॥१७२॥
✏ कित्येकजण त्या शुद्ध ब्रह्मास एकाग्र अंतःकरणाने निरीक्षण करून पहाताच अंतर्यामी स्थिर होऊन सर्व प्रकारचा संसार विसरतात.
🌷एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता।निरवधि तल्लीनता । निरंतर॥१७३॥
✏ कित्येकांना तर त्या ब्रह्माचे गुणगान गाताना चित्तास उपरती, वैराग्य उत्पन्न होवून त्याचे ठिकाणी अखंड तन्मयता लाभली.
🌷एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले।एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥१७४॥
✏ कोणी कोणी तर त्या ब्रह्म चैतन्याचे स्वरूपाचे वर्णन ऐकूनच शांत होतात. देहाभिमानरहित होवून त्याचे ठिकाणी एकरूप होतात.
🌷जैसा सरिता ओघ समस्त ।समुद्रामाजिं मिळत।परी माघौते न समात ।परतले नाहीं॥१७५॥
✏ ज्याप्रमाणे नद्यांचे सर्व ओघ समुद्रास मिळतात; परंतु समुद्रात समावेश होण्यासाठी जागा नाही म्हणून मागे फिरले असे कधीच झाले नाही. (म्हणजे आत्मा त्या परब्रह्माचे ठिकाणी एकरूप होतोच.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा