सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी ११६ ते १२५
ज्ञानेश्वरी अध्याय२रा
🍒 ओवी ११६ ते १२५
🌻 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌼 ||सांख्य योग||
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
💙भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख।जें उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥११६॥
🖍️ पहा, भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात.
💙सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु।तोषु देता ॥११७॥
🖍️ सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात.
💙तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥११८॥
🖍️ त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे.
💙देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥
🖍️ पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो.
💙या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥
🖍️ पहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही.
💙हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
🖍️ हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो.
💙देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥१२२॥
🖍️ तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस,
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🔰यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषषर्भ ।समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥
अर्थ👉 हे पुरुषश्रेष्ठा, ज्या पुरुषाला हे विषयसंबंध उपद्रव देत नाहीत व म्हणून ज्याला सुख व दु:ख समान आहेत, असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो.
➖➖➖➖⛳➖➖➖➖
💙हे विषय जयाते नाकळिती ।त्याने सुखदुःखें दोन्ही न पवती ।आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥
🖍️ या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुख-दु:ख ही दोन्ही नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही.
💙तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा ।जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
🖍️ जो या इंद्रियांचे जे विषय, त्यांच्या कचाट्यात सापडत नाही, तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे.
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🔰नासंतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः।उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥ १६ ॥
अर्थ 👉 अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसते, विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो. विद्यमान व अविद्यमान या दोहोंचाही निर्णय तत्ववेत्त्यांनी जाणला आहे. (ज्ञानी👇👇)
➖➖➖➖⛳➖➖➖➖
💙आतां अर्जुना आणिक कांही एक । सांगेन मी आइक ।जें विचारें परलोक ।वोळखिती ॥ १२५ ॥
🖍️ आता अर्जुना मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा