सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी १ ते २०

अध्याय दुसरा

🌼  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🌸  ||सांख्य योग||

🌼  ओवी १ ते २०

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

🔔संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम्। विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥

अर्थ 👉  संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले. ॥२-१॥

➖➖➖➖⛳➖➖➖➖

🐚मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें। शोकाकुल रुदनातें । करितुसे॥ १॥

✏ मग संजय धृतराष्ट्र रायास म्हणतो, महाराज  अर्जुन त्याठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रडू लागला. 

🐚तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।तेणें द्रवले असे चित्त ।कवणेपरी ॥ २ ॥

✏ आपले सर्व कूळ पाहून; त्याच्या मनात  विलक्षण  मोह उत्पन्न झाला. आणि त्यायोगे त्याचे चित्त द्रवले.

🐚जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें॥ ३॥

✏ जसे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्‍याने ढग नाहीसे होतात  त्याप्रमाणे  अर्जुन धैर्यशील असूनही  त्याचे ह्रदय द्रवीभूत झाले. 

🐚म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥

✏ जसा राजहंस पक्षी चिखलात गुंतला की म्लान होतो तसा अर्जुन ममतेने व्याकुळ होऊन अगदी  कोमेजून गेला आहे. 

🐚तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरू |देखोनि शार्गङधरु । काय बोले॥ ५ ॥

✏ अर्जुन मोहाने असा ग्रस्त झालेला पाहून भगवान  श्रीकृष्ण त्यास काय म्हणतात. .........

➖➖➖➖⛳➖➖➖➖

🔔श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन॥२॥

अर्थ 👉  भगवान म्हणाले हे अर्जुना, आर्यांनी सेवन करण्यास अयोग्य, स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालवणारा हा मूर्खपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून उद्भवला ?॥२-२॥ 

➖➖➖➖⛳➖➖➖➖

🐚म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं। तूं कवण हें कायी । करीत आहासी॥ ६ ॥

✏ अरे  अर्जुना, तू हे पहा की तू कोण आहेस? तू काय करतो आहेस? याचा आधी विचार करावा; या युद्धप्रसंगी तुला युद्ध सोडून जाणे शोभते का ?

🐚तुज सांगे काय जाहलें । कवण उणे आलें। करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥

✏ तुला काय झालं? काय कमी पडले? तुझे काय  करायचे राहिले?  म्हणून तू दुःख करीत आहेस ?

🐚तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी।तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे॥ ८ ॥

✏ तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. धीर सोडू नकोस. अर्जुना तुझ्या फक्त नावालाच अपयश भीत आहे. अपयश भिऊन पळून जाते .

🐚तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं॥ ९ ॥

✏ तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा तू राजा आहेस. आणि तुझ्या शौर्याचा तर तिन्ही लोकांत डंका वाजत आहे.

🐚तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला।पवाडा तुवां केला । गंधर्वासी॥ १० ॥

✏ तू युद्धात श्रीशंकराला जिंकले आहेस. निवांत कवचाचा उच्छेद केलास. आणि गण गंधर्व तुझ्या  पराक्रमाचे पवाडे गात आहेत. 

🐚हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें।ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे ॥ ११ ॥

✏ तुझ्या पराक्रमाची तुलना त्रैलोक्यात कुणाशीही  होऊ शकत नाही. असे तुझे पौरूषत्व असताना;

🐚तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें।अधोमुख रुदनातें । करितु आहासी॥ १२ ॥

✏ असा तू आज रणांगणात वीरवृत्ती सोडून खाली तोंड करून  रडतो आहेस. 

🐚विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु।सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी॥ १३ ॥

✏ अर्जुना, तुला करूणेने इतके ग्रासावे??? इतके दीन करावे? अरे, अंधाराने सूर्याला कधी गिळले आहे का?

🐚ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें॥ १४ ॥

✏ अर्जुना, वारा कधी मेघाला भितो का? अमृताला कधी मरण आहे का ? किंवा लाकडाने कधी अग्नी  गिळला आहे का? सांग बरे. 

🐚की लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे। सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी॥ १५ ॥

✏ मिठाने पाणी कधी विरले आहे का? अथवा काळकूट वीष दूसर्‍याच्या संसर्गाने मेले आहे का? किंवा  मोठ्या सापास बेडकाने कधी गिळले आहे का?

🐚सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला।परी तो त्वां साच केला । आजि एथ॥१६॥

✏ सिंहासी कधी कोल्ह्यांनी झोंबी केली आहे का? अशा अशक्य गोष्टी कधी घडतात का? अर्जुना, पण तू हे सर्व इथे शक्य होतात हे दाखवून दिलेस.

🐚म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥ १७ ॥

✏ म्हणून अर्जुना तू या मोहास तुझ्या चित्तात  अजिबात थारा देऊ नकोस, मनाला धीर दे आणि सावध हो.

🐚सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण। संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे॥१८॥

✏ आता हा वेडेपणा सोड, हातात धनुष्यबाण घे, कारण या रणभूमीवर तुझ्या करुणेचा काहीही उपयोग नाही. 

🐚हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता ।सांगे झुंजावेळें सदयता ।उचित कायी॥ १९ ॥

✏ अर्जूना, तू जाणकार आहेस. युद्धप्रसंगी क्षत्रिया कारुण्य (दया करणे हा गुण) योग्य आहे का? 

🐚हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २०॥

✏ श्रीकृष्ण अर्जुनास समजावितात की अर्जुना, हे तुझे वागणे आजपर्यंत संपादित केलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोक प्राप्तीस अडथळा आणणारे असे आहे .

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२