सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी १११ते १२४


अध्याय पहिला

🔔 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🐚 ॥अर्जुनविषादयोग॥

🔔 ओवी १११ते १२४

⛳⛳⛳🌈🌞🌈⛳⛳⛳

🔔पतिव्रतेचे हृदय जैसे । पतीवांचूनि न स्पर्शे।मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी॥१११॥

✏  ज्याप्रमाणे  पतिव्रतेच्या  ह्रदयात  तिच्या पतीशिवाय इतरांना किंचितही स्थान  नाही. तसाच  ( इतर कौरवांच्या बाजूच्या वीरांसाठी दुर्योधन) मी या योद्ध्यांसाठी आहे. त्यांचे सर्वस्व माझ्याशी जोडलेले  आहे.

🔔आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त॥११२॥

✏  माझ्यासाठी (कामासाठी) हे आपल्या जीवाची पर्वा  करत नाहीत. आपले प्राण तुच्छ समजतात. म्हणून ते उत्तम असे स्वामीभक्त आहेत. 

🔔झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती।हे बहु असो क्षात्रनीती । एथोनियां॥११३॥

✏  हे युद्धकले मध्ये  निष्णात असून या कलेनेच कीर्तीला जिंकणारे आहेत. खरे तर यांच्यासारख्या  वीरांमुळेच क्षत्रियधर्म  प्रसिद्धीस आला.

🔔ऐसें सर्वापरी पुरते।वीर दळी आमुतें।आतां काय गणूं यांतें ।अपार हे॥११४॥

✏  याप्रमाणे आमच्या सैन्यातील अपार वीर  पराक्रमी आहेत त्यांची मोजदादच करणे नको. 

🔰🌼🔰🌼🔰🌼🔰🌼🔰

🌻अपर्याप्तं तदस्माकं बलं|भीष्माभिरक्षितम्।पर्याप्तं त्विदमेषां बलं|भीमाभिरक्षितम्॥ १०॥


अर्थ 👉 ते हे आमचे भीष्मांनी सर्व बाजूंनी (सेनापति होऊन) रक्षण केलेले सैन्य अजिंक्य आहे, पण त्यांचे त्या (दांडग्या) भीमाने सर्व बाजूंनी रक्षण केलेले सैन्य क्षुद्र (जिंकण्यास सोपे) आहे. ॥१-१०॥

🔰🌼🔰🌼🔰🌼🔰🌼🔰

🔔वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी गा सुभटु। तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं॥११५॥

✏  त्यातच सर्व क्षत्रियात श्रेष्ठ आणि जगातील  सर्व  योद्ध्यांत प्रतापी ज्येष्ठ असे हे भीष्माचार्य. यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व आहे.

🔔आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसे पन्नासीलें।येणे पाडे थेंकुले । लोकप्रिय ११६॥

✏  यांच्याच बळावर या सैन्याची  व्यूहरचना किल्ल्याप्रमाणे  बनविली आहे. ज्यांच्यापुढे हे त्रैलोक्य कमी आहे.

🔔आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं॥ मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा॥११७॥

✏  जसे समुद्र आधीच सर्वांना दुस्तर आणि त्यात त्यास अग्नीचे सहाय्य  लाभावे. किंवा  प्रलयकारी मोठ्या  अग्नीला सोसाट्याचा वारा साथीदार झाला तर त्यास कोण आवर घालील? 

🔔ना तरी प्रलयवह्नि महावातु । या दोघां जैसा सांघातु ।तैसा हा गंगासुतु । सेनापति॥११८॥

✏ त्याप्रमाणे  भीष्माचार्य  या प्रलयकारी सैन्याचे सेनापती  असल्याने आता कौरव सैन्याला कोण आवरणार __ दुर्योधन  

🔔आतां येणेंसि कवण भिडे । हे पांडव सैन्य कीर थोडें।ओइचलेनि पाडे । दिसत असे॥११९॥

✏ अशा माझ्या सैन्याशी हे पांडव सैन्य कसे लढणार  ? कारण त्यांचे सैन्य कमी आहे. पण त्यांची व्यूह  रचना वरपांगी मोठी दिसते.

🔔वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली असे॥१२०॥

✏  शिवाय पांडवसैन्याचे सेनापती पद भीमाकडे आहे. हे सांगून दुर्योधन स्तब्ध झाला. 

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌻अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः|भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि॥११॥ 

अर्थ 👉 युद्धाच्या प्रवेशद्वारात आपापल्या नेमलेल्या ठिकाणी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्मांचेच सर्व बाजूंनी रक्षण करा. ॥१-११॥

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🔔मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितलें।आता दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१॥

✏  मग सर्व सेनापतींना दुर्योधन  म्हणाला " अहो आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा."

🔔जिया जिया अक्षौहिणी । तिये तिये आरणी ।वरगण कवणकवणी । महारथिया॥१२२॥

✏  ज्यांच्या ताब्यात सैन्याची अक्षौहिणी आहेत, त्यांनी सैन्य वाटून घेऊन युद्धस्थानी उभे रहावे.  

🔔तेणे तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिले |द्रोणाते म्हणिजे । तुम्हीं सकळ॥१२३॥ 

✏ आपल्या अक्षौहिणी आपल्या नियंत्रणात ठेवून  आपण भीष्माचार्यांच्या आज्ञेत रहावे. आणि द्रोणाचार्य आपण सर्व  सैन्यावर देखरेख ठेवावी.

🔔हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।येणें दळभारु आघवा । साचु आमुचा१२४॥

✏ आणि (गुरू महाराज) द्रोणाचार्य आपण भीष्मांचे रक्षण  करावे. ते म्हणजे मीच आहे असे समजून  त्यांची काळजी  घ्यावी. कारण  त्यांच्यावरच आपली भिस्त आहे. 

सारांश == संजय हे युद्धभूमीवरील संवाद ऐकून  राजा धृतराष्ट्राला सांगत आहे.  त्यामूळे  दुर्योधनाच्या बाजूने बोलावे लागते.  राजाच्या विरोधात बोलायचे नाही आणि धृतराष्ट्राचे पुत्रप्रेम तो जाणत होता. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२