सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ६४ते ८०
अध्याय दुसरा
🚩 सार्थ ज्ञानेश्वरी
🔱 ||सांख्य योग||
🚩 ओवी६४ते ८०
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🔔न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम्।अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्॥ ८ ॥
अर्थ 👉 भूलोकावर निष्कंटक व समृद्ध असे राज्य आणि देवाचे अधिपत्यही मिळाले तरीही इंद्रियांचे शोषण करणारा माझा शोक नाहीसा करील असे काही मला दुसरे दिसत नाही.
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🏺हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं ।तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें॥ ६४ ॥
✏ देवा, हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो मोह, शोक उत्पन्न झाला आहे तो मात्र आपल्याच उपदेशाशिवाय दूर होणार नाही.
🏺एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल।परि मोह हा न फिटेल । मानसींचा॥ ६५ ॥
✏ माझ्या मनात जो मोह उत्पन्न झाला आहे, तो पृथ्वीचे राज्य मला मिळाले किंवा इंद्रपद देऊ केले तरी हा शोक दूर होणारच नाही.
🏺जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तरी सुक्षेत्री जर्ही पेरिलीं ।तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं॥ ६६ ॥
✏ जसे पूर्ण भाजलेले बी, चांगल्या सुपीक जमिनीत पेरले आणि त्यास भरपूर पाणी घातले तरी ते उगवत नाही.
🏺ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें काही नोहे। एथ एकचि उपेगा जाये । परमामृत॥ ६७ ॥
✏ किंवा जेथे सर्व आयुष्यच संपले आहे, अशावेळी कोणत्याही रामबाण औषधाचा काहीही उपयोग होत नाही. फक्त एकच परमामृताचाच उपयोग होऊ शकतो.
🏺तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि। एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
✏ तसे मला सर्व राजभोग व संपत्ती प्राप्त झाली तरीही जीवत्वाने मोहित झालेल्या माझ्या बुध्दीला मोहांतून पार पडण्यासाठी त्याचा मुळीच उपयोग होणार नाही. हे कृपानिधी, तुझ्या कृपेचा जिव्हाळाच फक्त उपयोगी पडेल.
🏺ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला।मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥ ६९ ॥
✏ याप्रमाणे क्षणभर भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला आणि पुन्हा तो त्याच भ्रांतीत गुरफटला गेला.
🏺कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे।तो ग्रासिला महामोहें ।काळसर्पें ॥ ७० ॥
✏ या अर्जुनाच्या स्थितीवर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, त्याला ही मोहाची लहर नसून महामोहरूपी (अविद्यारूपी मोहानेच ) काळसर्पानेच अर्जुनास ग्रासले आहे.
🏺सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं ।लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना॥ ७१ ॥
✏( हे समजून घ्या ) अर्जुनाचे मर्मस्थान म्हणजे ह्रदय. या ह्रदयात कारुण्याची भरती आली ( म्हणजे ह्रदयात कारुण्यभाव उत्पन्न झाला.) अशी संधी साधून त्या मोहरूपी सर्पाने त्यालाच दंश केला. त्यामुळे त्या सर्पदंशाने अर्जुनाला कारुण्यरूपी विषाच्या लहरीवर लहरी निर्माण होवून तो पुरता गुरफटला गेला आहे.
🏺हें जाणोनि ऐसी प्रौढी ।जो दृष्टीसवें विष फेडी।तो धावया श्रीहरी गारुडी ।पातला कीं॥ ७२ ॥
✏ अशा त्या विषाची तीव्रता जाणून, ज्याच्या कृपादृष्टीने या (मोहरूपी सर्पाच्या) विषाची तीव्रता नष्ट होते, तो श्रीकृष्णरूपी गारूडी अर्जुनाच्या हाकेसरसा त्याच्याजवळ रक्षणासाठी धावून आला.
🏺तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा।तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां॥ ७३ ॥
✏ अर्जुनाच्या जवळ श्रीकृष्ण धावून आलेले आहेत. आणि ते आत्मज्ञानोपदेशाने त्याचे सहज रक्षण करतील.
🏺म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु।म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां॥७४॥
✏ माऊली म्हणतात, की मोह हाच कोणी एक सर्प आणि त्याने अर्जुनाला ग्रासले आहे, हे रूपक मी येथे कथन केले आहे.
🏺मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु।जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे॥ ७५ ॥
✏ किंवा हे दूसरे रूपक समजून घ्या की, जसा मेघांनी सूर्य आच्छादिला जावा; त्याप्रमाणेच अर्जुन मोहाने आच्छादिला गेला.
🏺तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु।जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां॥ ७६ ॥
✏ किंवा उन्हाळ्यात वणव्याने डोंगर व्यापला जावा तसा अर्जुन दुःखाने अगदी जर्जर झाला होता.
🏺म्हणोनि सहजे सुनिळु । कृपामृते सजळु।तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु॥ ७७ ॥
✏ म्हणून अशा वेळी वणवा लागलेल्या डोंगरावर जसा पाण्याने भरलेला नीलवर्ण मेघ कोसळून आग शांत करतो तसा स्वभावाने कृपामृत भरलेला असा तो महामेघरूपी गोपाळकृष्ण अर्जुनाकडे धाऊन आला.
🏺तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची॥७८॥
✏ त्या श्रीकृष्ण रूपी मेघाच्या ठिकाणी शुभ्र दातांची प्रभा हीच एक वीज चमकत होती. आणि त्याचे गंभीर भाषण हीच मेघ गर्जना होय.
🏺आतां तो उदार कैसा वर्षेल । तेथे अर्जुनाचळु निवेल।मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची॥७९॥
✏ आता तो श्रीकृष्णरूपी मेघ कसा पाण्याचा (शब्दांचा ) वर्षाव करेल आणि दुःखाने पेटलेला अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल. आणि त्यास ब्रह्मज्ञानाचा अंकुर कसा फूटेल,
🏺ते कथा आइका ।मनाचिया आराणुका।ज्ञानदेवो म्हणे देखा।निवृत्तिदासु॥ ८० ॥
✏ ती कथा शांत व सावधान चित्ताने ऐका. असे निवृत्तिदास ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा