सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ५१ ते ६३
अध्याय दुसरा
🚩 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🚩 ||सांख्य योग||
🔱 ओवी५१ ते ६३
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🔔हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला।म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना॥ ५१ ॥
✏ श्री कृष्ण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, हे ध्यानात आल्यावर अर्जुन जरा घाबरला आणि भीतभीत देवाला म्हणाला, देवा आपण का लक्ष देत नाहीत,
➖➖➖➖🌼➖➖➖➖
⛳न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः।यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः॥ ६ ॥
अर्थ 👉 या दोहोंपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे, हे समजत नाही. युद्धामधे आम्हाला जय मिळेल का ते आम्हाला जिंकतील? तेही समजत नाही. ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव लढाईकरता समोर उभे राहिले आहेत.
➖➖➖➖🌼➖➖➖➖
🔔येर्हवीं माझां चित्तीं जें होते । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा॥ ५२ ॥
✏ देवा असे करू नका, बाकी माझ्या मनात जे होते ते मी बोललो परंतु यापेक्षा खरे चांगले कोणते ते तुम्हालाच माहीत असेल.
🔔पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्राणु सांडिजे।ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती॥ ५३ ॥
✏ हे पहा ज्यांच्याशी आमचे वैर आहे, ही अक्षरे ऐकल्यावर आम्ही प्राण सोडावे, तेच भीष्म, द्रोणादि रणभूमीवर माझ्याशी युद्ध करण्यासाठी येथे उभे आहेत.
🔔आतां ऐसेयांतें वधावे । कीं अव्हेरुनिया निघावें।या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
✏ तर देवा, यांना मारावे किंवा सोडून निघून जावे; या दोहोमध्ये चांगली गोष्ट कोणती, हे आम्हाला तर मुळीच समजत नाही.
➖➖➖➖🌼➖➖➖➖
⛳कार्पण्यदोषोपहत्स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्॥ ७॥
अर्थ 👉 मोहरूपी दोषाने स्वभाव नष्ट झालेला व धर्मासंबंधाने चित्त मोहित झालेला मी तुला विचारीत आहे. जे खरोखरच श्रेयस्कर असेल ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेल्या मला उपदेश कर.
( अर्जुनाचे श्रीकृष्णांना शरण जाणे = ५५-८३)
➖➖➖➖🌼➖➖➖➖
🔔आम्हां काय उचित ।तें पाहतां न स्फुरे एथ।जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझे॥ ५५ ॥
✏ आम्हाला काय उचित आणि काय अनुचित हे विचार करूनही समजेनासे झाले आहे कारण या मोहाने माझे चित्त व्याकुळ झाले आहे.
🔔तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचे तेज भ्रंशे।मग पांसीच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
✏ जसे अंधारामुळे डोळ्याने दिसेनासे झाले की दृष्टीचे तेज लोप पावते आणि जवळची वस्तूही दिसत नाही.
🔔देवा मज तैसे जाहले । जें मन भ्रांती ग्रासिलें ।आतां काय हित आपुलें । तेंही नेणे॥ ५७ ॥
✏ देवा, माझे तसेच झाले आहे. माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे, माझे हित कशात आहे ते ही समजेनासे झाले आहे.
🔔तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसी तूं ॥ ५८ ॥
✏ म्हणून देवा, आपण विचार करून पहावे आणि जे आमच्या हिताचे असेल ते सांगावे कारण आमचा इष्ट मित्र, सखा सर्व काही तूच आहेस,
🔔तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता ।तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ५९ ॥
✏ आमचे गुरू, बंधू, बाप, कुलदैवत आणि नेहमीच संकटसमयी रक्षण करणारा ही तूच आहेस.
🔔जैसा शिष्यांते गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु ।कीं सरितांते सागरु । त्यजी केवीं॥ ६०॥
✏ ज्याप्रमाणे श्री गुरू शिष्याचा कधीही अव्हेर करत नाही, समुद्र नद्यांचा कधीही अव्हेर करत नाही, त्याप्रमाणे आपणही माझ्या बोलाचा अव्हेर करणार नाही.
🔔नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये। तरी ते कैसेनिं जिये । ऐकें कृष्णा॥६१ ॥
✏ देवा पहा की, जर आई बाळाला सोडून गेली तर ते बाळ कसे सुखी होईल.
🔔तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी।आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें॥ ६२ ॥
✏ तसे तूच आम्हाला एकमेव आधार आहेस इतका वेळपर्यंत मी जे धर्मशास्त्र आपणास सांगितले ते जर पटत नसेल तर.
🔔तरी उचित काय आम्हां । जे व्यभिचरेना धर्मा। तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
✏ हे पुरूषोत्तमा ! जी गोष्ट आम्हास करण्यासाठी उचित असून ती धर्मविरूद्ध नसेल तर ती लवकर सांगा .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा