सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा || सांख्य योग|| ओवी १३७ ते १५० पासून
||ज्ञानेश्वरी सांख्य योग||
📚 अध्याय २ रा
🔔 ओवी१३७ते १५०पासून
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🌻 य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्।उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥
अर्थ 👉 हा आत्मा मारणारा आहे, असे जो समजतो, व हा आत्मा मरणारा आहे असे जो समजतो, त्या दोघांनाही ज्ञान नाही. हा आत्मा कोणाला मारीत नाही व कोणाकडून मारला जात नाही. ॥२-१९॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌷 तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें।मी मारिता हे मरते । म्हणत आहासी॥ १३७ ॥
✏ अरे अर्जुना! तू या देहाचा अभिमान धरून या शरीरावरच दृष्टी ठेऊन मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस.
🌷 तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्वता विचारिसी ।तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती॥ १३८ ॥
✏ तुला यातील तत्वार्थ समजत नाही, याचा विचार करशील तर लक्षात येईल की, तू मारणारा नाहीस आणि हे ही मरणारे नाहीत.
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌻 न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः ।अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥
अर्थ 👉 हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा एकदा होऊन पुन्हा होणारा नाही, असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित व अनादि आहे. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही. ॥२-२०॥
🌻 वेदाविनाशिनं नित्यं य एनमजव्ययम् ।कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्॥ २१ ॥
अर्थ 👉 या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित व क्षयरहित असा जाणतो, तो पुरुष हे पार्था, कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी कसा करणार व मारणार तरी कसा?
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌷 जैसें स्वप्नामाजिं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे। मग चेऊनियां पाहिजे । तंव कांही नाहीं ॥ १३९ ॥
✏ ज्या प्रमाणे स्वप्नात पाहिलेले विषय स्वप्नातच खरे भासतात, पण जागृत होऊन पाहिल्यास ते काही खरे नसते.
🌷 तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां ।शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे॥ १४० ॥
✏ त्याप्रमाणे हे सर्व मायिक आहे असे समज. तू व्यर्थच भ्रमात पडला आहेस, मनुष्याच्या सावलीवर शस्त्राने घाव घातला तरी तो घाव त्याला लागत नाही.
🌷 कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।परी भानु नाहीं नासला । तयासवें॥ १४१ ॥
✏ किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते; पण खरा सूर्य नाहीसा झालेला नसतो.
🌷 ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरले असे।तो भंगलिया आपैसे । स्वरूपचि॥ १४२ ॥
✏ आपले घर बांधल्यामुळे आकाशाचा काही अंश घरात बंदिस्त होतो. आणि तो अंश घराच्या आकृतीचा झालेला असतो; पण घर मोडल्यानंतर तो आकार नष्ट होत नाही तर तो आपल्या मूळ स्वरूपात सामावून जातो.
🌷 तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं।म्हणऊनि तूं हें नारोपीं । भ्रांति बापा॥ १४३॥
✏ त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी, त्यातील मूळ आत्मस्वरूपाचा कधीच नाश होत नाही. त्यामुळे आत्मा जन्माला आला आणि आत्मा मरण पावला हा आरोप करू नकोस
(शरीर जन्म घेते आणि मरते. आत्मा नाही.)
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌻 वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही॥ २२॥
अर्थ 👉 ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवी प्राप्त करतो. ॥२-२२॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌷 जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
✏ मनुष्य ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देतो आणि नवीन वस्त्रे घालतो धारण करतो, त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसर्या देहाचा स्वीकार करतो.
(तात्पर्य 💫या आत्मचैतन्याचे आश्रयावरच शरीराचे जन्माला येणे आणि मरणे अवलंबून आहे. )
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌻 नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥
अर्थ 👉 या आत्म्याला शस्त्रे तोडीत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही, वारा सुकवीत नाही. ॥२-२३॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च।नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥
अर्थ 👉 या आत्म्याचा छेद अथवा दाह होणे अशक्य असून हा आर्द्र होणे किंवा शुष्क होणे अशक्य आहे.
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌷 हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु।म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥
✏ हा आत्मा अवयवरहित असल्याने जन्म मरणरहित असून नित्य, स्वतःसिद्ध, वस्तुतः कार्यकारणात्मक उपाधिरहित व अत्यंत शुद्ध आहे म्हणून याचा शस्त्रादिकांनीही घात करता येत नाही.
➖➖➖➖🌈➖➖➖➖
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते।तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि॥ २५ ॥
अर्थ 👉 हा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल, अचिंत्य व अविकृत असल्याचे म्हटले आहे. म्हणून याला या प्रकारे जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही. ॥२-२५॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌷 हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा॥ १४६ ॥
✏ हा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही. हा शुद्ध आत्मा अग्नीने जळणारा नाही. तसेच वायूचा महाशोषण शक्ति प्रभावही येथे चालत नाही.
🌷 अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥ १४७ ॥
✏ म्हणून अर्जुना ! हा आत्मा नित्य क्रियारहित व शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा स्वयंप्रकाशित व परिपूर्ण व्यापक रूपाने भरला आहे.
🌷 हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
✏ हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा, अनुमान प्रमाणास विषय होणारा नाही. ध्यान तर या आत्म्यास भेटण्यासाठी उत्कंठित असते.
🌷 हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना।निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु॥ १४९ ॥
✏ अर्जुना हा आत्मा मनास नेहमीच दुर्लभ, साधनाने प्राप्त न होणारा अनंत म्हणजे देशकालवस्तुपरिच्छेदरहित अनुभूतीरूप उत्तम पुरुष होय.
🌷 हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु । अनादि अविकृतु । सर्वरूप ॥ १५० ॥
✏ हा आत्मा निर्गुण, निर्विशेष, उत्पत्तीरहित, विकार रहित, जगतादि किंवा रूपादि आकाररहित व वस्तुमात्राच्या स्वरूपात समव्याप्त आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा