सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १७६ ते १९०

 ज्ञानेश्वरी अध्याय२रा

🕉️  ओवी १७६ते१९०

🕉️  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🕉️  ||सांख्य योग||

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

🌷तैसिया योगीश्वरांचिया मती।मिळणीसवें एकवटती।परी जे विचारूनि पुनरावृत्ति।भजतीचिना॥ १७६॥

✏याप्रमाणे  या योग्याच्या बुद्धी  ब्रह्मसाक्षात्काराबरोबरच तद्रूप  होतात. मग ते योगी संसाराला किंवा देहादि मायाजालात अडकत नाहीत. 

➖➖➖➖👇➖➖➖➖

🌸देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥

अर्थ 👉 अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये (असलेला हा आत्मा सर्वकाळ अवध्य आहे. म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करण्यास तू योग्य नाहीस. ॥३०॥

➖➖➖➖👆➖➖➖➖

🌷जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक॥ १७७ ॥

✏ अर्जुना ! जे सर्वत्र, सर्वच  देहात अंतर्यामी रूपाने व्यापले आहे व ज्याचा घात (नाश) ही होत नाही, असे  एक  विश्वव्यापी अधिष्ठान चैतन्यच आहे. 

🌷याचेनिचि स्वभावें।हें होत जात आघवें।तरी सांग काय शोचावें।एथ तुवां ॥१७८॥

✏ या अधिष्ठान चैतन्याच्या आश्रयावरच हे सर्व जग उत्पन्न  होते आणि नाशही पावते, तर मग यातील कोणाविषयी शोक करावा? सांग. 

🌷एर्‍हवीं तरी पार्था।तुज कां नेणों न मनें चित्ता।परी किडाळ हें शोचितां।बहुतीं परीं॥१७९॥

✏  अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या मनाला हे का पटत नाही, ते मलाही समजत नाही, परंतु एकंदरित हा शोक करणे अनेक प्रकारे बरोबर नाही. 

➖➖➖➖👇➖➖➖➖

स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते॥३१॥

अर्थ👉 स्वधर्माकडे पाहून देखील तुला व्याकुळ होणे योग्य नाही. कर्तव्यप्राप्त युद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरे हितकर काही नाही.

 (स्वधर्माने वागणे इष्ट,नाहीतर अपकीर्ती होईल१८०-२२५)

➖➖➖➖👆➖➖➖➖

🌷तूं अझुनि कां न विचारिसी।काय हें चिंतितु आहासी ।स्वधर्मु तो विसरलासी।तरावें जेणें॥१८०॥

✏ अरे वेड्या, अजून असा का विचार करत नाहीस, की स्वधर्माचे आचरण केल्यास  मनुष्य तरतो. त्या स्वधर्माला तू अगदीच विसरलास.

🌷या कौरवां भलतें जाहलें।अथवा तुजचि कांही पातलें।कीं युगचि हें बुडालें । जर्‍हीं एथ॥१८१॥

✏ या ठिकाणी जरी सर्व मेले किंवा तूझेच काही  बरे वाईट  झाले  किंवा या जगाचाच नाश झाला  तरी  अर्जुना!

🌷तरी स्वधर्मु एक आहे।तो सर्वथा त्याज्य नोहे।मग तरिजेल काय पाहे।कृपाळुपणें॥ १८२ ॥

✏ स्वधर्म म्हणून जो एक आहे, तो केव्हाही टाकता येणार नाही. मग असे असताना (लक्षात घ्या  क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध करणे आहे आणि अर्जुनाने त्यास आपल्या कुळाविषयी माया उत्पन्न झाल्याने कौरवांच्या विरूद्ध  युद्ध  करण्यास नकार दिला होता.)  तुझ्या या कृपाळुपणामुळे तू तरला जाशील  का? याचा विचार  कर.

🌷अर्जुना तुझें चित्त ।जर्‍ही जाहलें द्रवीभूत।तर्‍ही हें अनुचित।संग्रामसमयीं १८३॥

✏ तुझे चित्त जरी दया उत्पन्न झाल्याने विरघळून गेले आहे; तरी तसे होणे या युद्धप्रसंगी अयोग्य आहे. 

🌷अगा गोक्षीर जरी जाहलें ।तरी पथ्यासि नाही म्हणितलें।ऐसेनिहि विष होय सुदलें।नवज्वरीं देतां॥ १८४॥

✏ जसे गायीचे दूध हे पवित्रच आहे. (आपल्या  कुळावरील तुझी दया उत्पन्न  होणे हे ही ठीक आहे पण, ) पण वैद्याने पथ्य सांगितल्यावरही हेच दूध नवज्वरातील रोग्याला दिले तर ते त्याला विषवत (बाधक) होते. 

🌷तैसे आनीं आन करितां।नाशु होईल हिता।म्हणऊनि तूं आतां।सावध होई॥१८५॥

✏ त्याप्रमाणे भलत्या वेळी भलत्या ठिकाणी भलत्याने भलतेच कर्माचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो. 

🌷वायांचि व्याकुळ कायी ।आपुला निजधर्मु पाहीं ।जो आचरिता बाधु नाहीं । कवणे काळीं॥ १८६ ॥

✏ तू व्यर्थच शोकाकुल होऊ नकोस आणि ज्याचे आचरण केल्याने कोणत्याही  काळी कोणताही  दोष लागत नाही; अशा आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. 

🌷जैसें मार्गेंचि चालतां ।अपावो न पवे सर्वथा ।कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे॥१८७॥

✏ ज्याप्रमाणे सरळमार्गी  चालले असता; कधीही  अपाय पोहोचत नाही किंवा दिव्याच्या उजेडात  चालले असता आपण अडखळत नाही. 

🌷तयापरी पार्था|स्वधर्मे राहाटतां|सकळ कामपूर्णता|सहजे होय||१८८|

✏ त्याप्रमाणे अर्जुना, स्वधर्माने वागले असता त्याच्या सर्व इच्छा  सहजच पूर्ण होतात. 

🌷म्हणोनि यालागीं पाहीं ।तुम्हां क्षत्रियां आणीक कांही।संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें॥ १८९ ॥

✏ म्हणून हे पक्के जाण की संग्रामावाचून तुम्हा क्षत्रियांना दुसरे काहीही योग्य नाही.

निष्कपटा होआवें ।उसिणा घाई जुंझावें ।हें असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी ॥१९०॥

✏  मनात कपट न धरता, समोरासमोर उभे राहून  एकमेकांवर प्रहाराला प्रतिप्रहार करून युद्ध करावे हे सर्व तूही जाणतोस. मग या विषयावर मी ही जास्त  काही सांगत नाही. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२