सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १२६ ते१३६
ज्ञानेश्वरी अध्याय२रा
💜 ओवी १२६ ते१३६
💛 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
💚 ||सांख्य योग||
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
👑या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥
✏ देहादि उपाधिरुप जगामध्ये सर्वव्यापी असे एक गूढ आत्मचैतन्य आहे, त्याचाच तत्वज्ञ म्हणजेच संत सदैव स्वीकार करतात.
👑सलिलीं पय जैसें । एक होऊन मीनलें असे।परीं निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे॥ १२७ ॥
✏ जसे पाणी दूधात मिसळून एकरूप झालेले असले तरी राजहंस पक्षी मात्र फक्त दूधच पितो आणि पाणी तसेच वेगळे शिल्लक ठेवतो.
👑कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ।निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥
✏ अथवा चतुर सोनार जसा डागी सोने अग्नीत घालून त्यातील हिणकस धातू वेगळा काढतो. आणि वाईट सोन्यापासून चांगले सोने बाजूला काढतो.
👑ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें॥ १२९ ॥
✏ किंवा बुद्धीच्या जोरावर दही घुसळले असता, शेवटी जसे सारभूत लोणी निघालेले दृष्टीस पडते.
👑कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आले॥ १३० ॥
✏ किंवा एकत्र असलेले कोंडा (धान्याची रास) आणि धान्यही वार्यावर उफणली असता, धान्य खाली शिल्लक राहते व फोलकट अलगद वेगळे बाजूला पडते.
👑तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।मग तत्वता तत्व उरलें । ज्ञानियांसी॥ १३१ ॥
✏ अगदी तसेच ज्ञानी पुरूष विचारांती प्रपंच सहजच मागे टाकतात मग या ज्ञानी लोकांना विचार करण्यासाठी फक्त आणि फक्त त्रिकालाबाधित तत्व म्हणजेच ब्रह्म उरते.
👑म्हणोनि अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्ष दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥
✏ म्हणून जे अनित्य आहे, त्या ठिकाणी ज्ञानी पुरूष रमत नाही कारण त्यांनी नित्य व अनित्याचा फरक जाणलेला असतो.( शुद्ध आत्मा आणि अनित्य देहादि संसार या दोहोतील फरक जाणून विवेकपूर्ण बिनचूक असा निर्णय ज्ञानी लोकांनी निश्चित केलेला असतो. )
➖➖➖➖🍏➖➖➖➖
🕯️अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् |विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ||२-१७||
अर्थ 👉 ज्याने हे सर्व जगत व्यापले आहे, ते सत् विनाश पावणारे नाही असे समज. या क्षयरहिताचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही. ॥२-१७॥
➖➖➖➖🍏➖➖➖➖
👑देखें सारासार विचारितां । भ्रांति जे पाहीं असारता। तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें॥ १३३ ॥
✏ सारासार विचार केला असता सार (खरे) काय? आणि असार (खोटे) काय? यात जी भ्रांती निर्माण होते. त्यात जे आत्मतत्व स्वभावतः नित्य आहे. ते खरे आहे. हे अर्जुना समजून घे. (थोडक्यात शरीर आणि आत्मा यात आत्मा सार तर शरीर असार असा अर्थ घ्या. शरीराला कितीही विषयाचे हवे ते भोग दिले तरी ते अतृप्त राहते. शिवाय शरीराचा नाश कधीना कधी होणारच आहे. आत्म्याचा कधीही नाश होत नाही )
👑हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाही ॥ १३४ ॥
✏ हा त्रैलोक्याचा आकार ज्या आत्मतत्वाचा विस्तार आहे, त्याचे ठिकाणी नाम, रंग, रूप ही चिन्हे अजिबात नाहीत.
👑जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु, ।तया केलियाहि घातु । कदाचि नोहे ॥ १३५ ॥
✏ असा हा आत्मा नित्य व सर्व व्यापक असून जन्म मरणादि षडभावविकार रहित आहे, म्हणून त्याचा नाश करू म्हटले तरी सुद्धा शक्य नाही.
➖➖➖➖🍏➖➖➖➖
🕯️अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः |अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ||२-१८||
अर्थ 👉 नित्य, अविनाशी, अगम्य अशा आत्म्याचे हे देह स्वभावत: विनाशी म्हटलेले आहेत. म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. ॥२-१८॥
➖➖➖➖🍏➖➖➖➖
👑आणि शरीरजात हे आघवें । हें नाशवंत स्वभावें । म्हणोनि तुवा झुंजावें| पंडुकुमरा॥१३६
✏ आणि हे शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सर्वच्या सर्व नाशिवंत आहे. म्हणूनच अर्जुना तू युद्ध कर.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा