सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ||सांख्य योग||
ज्ञानेश्वरीअध्याय २ रा
💡 ओवी २१४ पासून
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🌷ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥२१४॥
✏ असा तुझ्या अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या जीविताची आशा सोडून प्राणावर उदार झाले आहेत.
🌷जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा।तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥२१५॥
✏ ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्यावर मदोन्मत्त हत्तीला ही प्रलयकाळच ओढवला असे वाटते. त्याप्रमाणे या कौरवांसही तुझा धाकच वाटतो.
🌷जैसे पर्वत वज्रांते । ना तरी सर्प गरुडातें।तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा॥ २१६ ॥
✏ ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरूडाला भितात. तसे अर्जुना, हे कौरव सैन्य तुला भिते.
🌷ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल।जरी मागुता निघसील । न झुंजतचि॥२१७॥
✏ तेव्हा आता जर तू युद्ध न करता मागे फिरशील; तर ही तुझी अपकीर्ती तर होईलच आणि तुझी थोरवी, महतीही नाहीशी होईल मग तुझ्या अंगी हीनत्व प्राप्त होईल.
🌷आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती।न गणित कुटी बोलती । आइकतां तुज॥ २१८
✏ बरे ! पळून जाऊ लागलास तर हे तुला जाऊ देणार नाहीत. तुला धरून तुझी फजिती करतील आणि तुझ्या तोंडावर तुझी निंदा करतील.
🌷मग ते वेळी हियें फुटावें । आंता लाठेपणे कां न झुंजावे ।हें जिंतले तरी भोगावें । पृथ्वीतल ॥ २१९ ॥
✏ ते मर्मभेदक शब्द ऐकून मग अंतःकरण विदीर्ण होण्यापेक्षा आत्ताच शौर्याने युद्ध का करू नये? आणि जर तू यांना जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील.
➖➖➖➖👇➖➖➖➖
🌼हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम्।तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥
अर्थ 👉 मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील अथवा जय मिळवलास तर पृथ्वी उपभोगशील. म्हणून हे अर्जुना, निश्चय करून युद्धाला उभा रहा. ॥२-३७॥
➖➖➖➖👆➖➖➖➖
🌷ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित।तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥२२०॥
✏ अथवा ह्या रणांगणावर युद्ध करताना तुझे प्राण खर्ची पडले तर अनायासे सहजच स्वर्गसुख प्राप्त होईल.
🌷म्हणोनि ये गोठी।विचारु न करीं किरिटी।आतां धनुष्य घेऊनि उठी।झुंजें वेगीं॥२२१॥
✏ म्हणून अर्जुना, आता विचार करत बसू नकोस, तर ऊठ हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास आरंभ कर.
🌷देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नासे असता। तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥ २२२ ॥
✏ स्वधर्माचे आचरण केले असता असलेले दोष पातके नष्ट होतात; पण असे असताना ह्या युद्धामुळे मला पातक लागेल हा समज तुझ्या मनात कसा आला कोण जाणे.
🌷सांगे प्लवेंचि काय बुडिजे।कां मार्गीं जातां आडळिजे।परी विपायें चालो नेणिजे।तरी तेंही घडे॥२२३||
✏ तूच सांग अर्जुना, नावेचा आधार घेतला तर कोणी बुडेल का? किंवा चांगल्या रस्त्यावर चालताना कोणी ठेच लागून अडखळेल का? हा जर नीट चालता येत नसेल तर होईल ही तसे.
🌷अमृतें तरीचि मरीजे ।जरी विखेंसी सेवीजे।तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणे॥२२४॥
✏ दूध प्यायल्याने मरण येणार नाही पण जर दुधात विषाचेही सेवन झाले तर मरण येईल; त्याचप्रमाणे स्वधर्माचे आचरण केल्यानेही दोष मात्र लागतील, पण मनात फलकामना धरली असेल तर.
🌷म्हणोनि तुज पार्था ।हेतु सांडोनि सर्वथा।क्षात्रवृत्ती झुंजतां ।पाप नाही २२५॥
✏ म्हणून अर्जुना, फलेच्छा सर्वथा सोडून क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा