सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १०३ते ११५
ज्ञानेश्वरी अध्याय२रा
🔔 ओवी १०३ते ११५
🐚 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
💙 ||सांख्य योग||
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖➖💙➖➖➖➖
🔰न त्वेवाहं जातुं नासं न त्वं नेमे जनाधिपाः।न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥
अर्थ 👉खरोखर मी, तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही. तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. ॥२-१२
➖➖➖➖💙➖➖➖➖
🐊अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।आणि हे भूपति अशेख| आदिकरुनी ॥ १०३ ॥
✏ अर्जुना, आणखी एक सांगतो ऐक, तुम्ही आम्ही व हे सर्व राजे, जे ह्या ठिकाणी जमले आहेत.
🐊नित्यता ऐसेचि असोनि । ना तरी निश्चित क्षया जाऊनि ।हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥
✏ हे सर्व आपण असेच निरंतर राहू किंवा खात्रीने लयाला जावू, ही भ्रांती सोडून दिली की यापैकी एक ही खरे नाही, असे कळेल.
🐊हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे।येर्हवीं तत्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि॥ १०५ ॥
✏ कारण आपला सर्वांचा आत्मा एक आहे. तो देहाच्या उपाधीने भिन्न दिसतो. देहाच्या उपाधी संबंधामुळे आत्म्याचे ठिकाणी भासणारा उत्पत्ती, नाश मायेच्या योगाने दिसतो. एरव्ही जी आत्मवस्तू आहे ती अविनाशीच आहे.
🐊जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥
✏ ज्याप्रमाणे वार्याने पाणी हलविले की ते तरंगाकारतेस प्राप्त होते. मग इथे कोण व कोठे जन्माला आले?
🐊तेंचि वायूचे स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें।तरी आता काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥
✏ बरे! पुढे तेच वार्याचे वाहणे थांबले की पाणी स्वभावतःच स्थिर होते; आता त्या तरंगाचा नाश झाला. मग इथे कशाचा नाश झाला सांग?
➖➖➖➖💙➖➖➖➖
🔰देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा ।तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति॥ १३ ॥
अर्थ 👉 देहयुक्त आत्म्याला ज्याप्रमाणे देहामध्ये बाल्य, तारुण्य व वार्धक्य या अवस्था असतात, त्याचप्रमाणे दुसर्या देहाची प्राप्ती ही होत असते. आणि असे असल्यामुळे जो, आत्मा नित्य असल्याचे जाणतो, त्याला जन्ममरणाविषयी भ्रांती होत नाही. ॥२-१३॥
➖➖➖➖💙➖➖➖➖
🐊आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक।हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥१०८
✏ हे पहा अर्जुना, शरीर तर एकच असते, पण वयपरत्वे त्यात देखिल अनेक दशा दृष्टीस पडतात. हा पुरावा पहा.
🐊एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे।परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
✏ त्याच शरीरात पहिल्यांदा बालपण दिसते. पुढे तेच बालपण तारुण्यात नाश पावते. परंतु त्या प्रत्येक अवस्थेत शरीर काही नाश पावत नाही.
🐊तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरे होति जाति पाहीं ।ऐसें जाणे जया नाहीं । व्यामोहदुःख ॥११०॥
✏ त्याचप्रमाणे पहा, एकमेवाद्वितीय आत्मचैतन्याच्या ठिकाणी ही अनंत देहदेहांतरे उत्पन्न होतात आणि नाश पावतात. हे जाणले की मग भ्रमामुळे होणारे हे दुःख अनुभवावे लागत नाही.
➖➖➖➖💙➖➖➖➖
🔰मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः| आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥ १४ ॥
अर्थ 👉 हे अर्जुना, इंद्रियांचे (विषयांशी होणारे) संयोग शीत, उष्ण, सुख, दु:ख देणारे आहेत. ते उत्पत्ति व विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत. म्हणून हे भारता, त्यांना तू सहन कर.
( विषयाभिमुखतेचा परिणाम= ओव्या १११-१२४)
➖➖➖➖💙➖➖➖➖
🐊एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियांआधीनपण ।तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे॥१११॥
✏ पण हे तत्त्व न कळण्याचे मुख्य कारण म्हणजे इंद्रियाधीनता हे होय. ही इंद्रिये अंतःकरणास आपल्या अधीन करतात, विषयोन्मुख करतात, त्यामुळे त्यास भ्रम होतो .
🐊इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें॥ ११२ ॥
✏ इंद्रिये विषयाचे सेवन करतात, त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात. त्या आसक्तीनेच विषय अंतःकरणास मोहग्रस्त करतात.
🐊जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं।तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे॥ ११३ ॥
✏ आणि त्या विषयाच्या ठिकाणीही सुखदुःख हे निश्चित असे नसते. कारण त्या विषयापासून कधी सुख मिळते तर कधी तोच विषय दुःख देतो.
🐊देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें॥ ११४ ॥
✏ आता आपण शब्द या विषयाची व्याप्ती पाहू; जर आपली कोणी निंदा केली आणि हे कानांनी ऐकले तर दुःख होईल. आणि जर कोणी स्तुती केली तर सुख होईल, समाधान मिळेल. (कान या इंद्रियाचा विषय शब्द आहे.)
🐊मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां॥ ११५ ॥
✏ मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत. हे इंद्रियांच्या संसर्गाने सुख व दुःखाला कारण होतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा