सार्थ ज्ञानेश्वरी अर्जुनविषादयोग ओवी २४६ ते २६०
🌳 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌈 ||अर्जुनविषादयोग
🌳 ओवी २४६ ते २६०
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔔अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यंति कुलस्त्रियः।स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः॥ ४१ ॥
अर्थ 👉 अधर्माने कुळ व्यापल्याने, हे कृष्णा, कुलस्त्रिया बिघडतात. हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्याने वर्णसंकर होतो. ॥१-४१॥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🐚एथ सारासार विचारावें । कवणे काय आचरावें। आणि विधिनिषेध अघवे । पारुषति॥२४६॥
✏ असे झाल्यास सारासार विचार कोणीही करणार नाहीत. कर्तव्ये अकर्तव्ये कोणी कसेही आचरण करील. विधिनिषेध नष्ट होतील.
🐚असता दीपु दवडीजे । मग अंधकारीं राहाटिजे ।जे उजूंचि का आडळिजे । जयापरी॥२४७॥
✏ असलेला दिवा विझवून, अंधारात फिरू लागले की सहजच मनुष्य सरळ वाटेतही ठेचाळतो.
🐚तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळी तो आद्य धर्मु जाय।मग आन कांहीं आहे । पापांवाचुनि॥२४८॥
✏ त्याप्रमाणेच कुलाचा कुलक्षय होतो त्यावेळी सनातन कुलधर्म नाहीसा होतो; मग अशा कुलात पापावाचून दुसरे काय राहणार?
🐚जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती ।म्हणवूनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
✏ त्यावेळेस मन आणि इंद्रिये यांचे नियमन होत नाही; इंद्रिये स्वैर वर्तन करू लागतात. त्यामुळे कुलस्त्रियांकडून पापाचरण घडते.
🐚उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती।तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥२५०॥
✏ उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वर्णातील पुरूषांशी रममाण होतात; असा वर्णावर्णांचा संकर झाला म्हणजे सर्व जाती धर्म नाहीसे होतात.
🐚जैसी चोहटाचिया बळी । पाविजे सैरा काऊळीं ।तैसीं महापापें कुळीं प्रवेशती॥२५१॥
✏ जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळे चारी बाजूंनी झडप घालतात. त्याप्रमाणे श्रेष्ठ कुलात महापातके सहज संचार करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔔संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।पतंति पितरि ह्येषां लुप्तपिंडिदकक्रियाः ॥ ४२॥
अर्थ 👉 संकर झाला म्हणजे तो सर्व कुळाला आणि त्या कुळाचा क्षय करणारांना हटकून नरकाला नेतो. पिंडदान व तर्पणादि क्रिया लुप्त झालेल्यांचे पितर पतन पावतात. ॥१-४२॥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🐚मग कुळा देखा अशेखा । आणि कुळातला ।येरयेरा नरक । जाणें आथी॥२५२॥
✏ मग त्या संपूर्ण कुलास आणि कुलाचा नाश करणारे, या दोघांसही नरकात जाणे भाग पडते.
🐚देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित ।मग मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष॥ २५३ ॥
✏ सर्व वंशाची वृद्धी पतित झाल्यामुळे, त्यातील स्वर्गस्थ पूर्वज आपोआपच पतन पावतात.
🐚जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक पारुखे।तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी॥२५४॥
✏ ज्या कुलात नित्य नैमित्तिक कार्ये कर्मे घडत नाहीत; त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार?
🐚तरी पितर काय करिती । कैसेनि स्वर्गीं बसती।म्हणोनि तेही येती ।कुळापासी॥२५५॥
✏ अशावेळेस त्या पितरांनी काय करावे? स्वर्गात कसे रहावे? म्हणून तेही आपल्या कुलापाशी येतात.
🐚जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें ।तेवी आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे॥२५६
✏ ज्याप्रमाणे पायाच्या बोटास सर्प दंश झाला तरी त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग व्यापते, त्याप्रमाणे आप्तेष्टांच्या वधाचे पाप सत्यलोकी गेलेल्या सर्व पूर्वजांना बाधित करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔔दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यंते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः॥४३॥
🔔उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन| नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम॥४४॥
🔔अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयमं।यद् राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः॥४५॥
अर्थ 👉 कुलक्षय करणार्यांच्या या वर्णसंकर करणार्या दोषांनी शाश्वत अशा जाति धर्मांचा आणि कुलधर्मांचा नाश होतो ॥१-४३
अर्थ 👉 हे जनार्दना, ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत, त्यांचा निश्चयेकरून नरकामधे वास होतो, असे आम्ही ऐकले आहे. ॥१-४४॥
अर्थ 👉 अहो ज्याअर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त झालो आहोत, त्याअर्थी खरोखर मोठे थोरले पाप करण्याला तयार झालो आहोत. ॥१-४५॥
➖➖➖➖➖➖➖➖➖
🐚देवा अवधारी आणिक एक । एथ घडे महापातक।जै संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे॥२५७ ॥
✏ देवा ऐका, आणखी एक महापातक इथे घडते, ते म्हणजे स्वजनवधाच्या पातकापासून संसर्गदोषाने लोकाचार नाहीसे होतात.
🐚जैसा घरीं आपुला । वानिवसे वन्ही लागला। तो आणिकांही प्रज्वळिला । जाळुनि घाली॥२५८॥
✏ जसे आपल्या दुर्दैवाने आपल्या घरास अग्नी लागला, तर तो भडकलेला अग्नीशेजारची दुसरीही घरे जाळून टाकतो.
🐚तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती।तेही बाधु पावती । निमित्तें येणें॥२५९॥
✏ त्याप्रमाणे त्या बाधित कुलाशी जे जे संबंध ठेवून वागतात, ते ही दूषित होतात.
🐚तैसें नाना दोषें सकळ ।अर्जुन म्हणे तें कुळ।मग महाघोर केवळ ।निरय भोगी॥२६०॥
✏ अर्जुन म्हणतो देवा, त्या कुळात नाना प्रकारचे दोष घडून आले की असे कूळ महाभयंकर नरकयातना भोगते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा