सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी १२५ते १३६

 

 अध्याय पहिला

🌽 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🌾 ॥अर्जुनविषादयोग॥

🌽 ओवी १२५ते १३६

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

➖➖➖👁️👇👁️➖➖➖

🔔तस्य स‍नयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२॥ 

अर्थ 👉 (या दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा कुरुकुलातील वृद्ध पितामह प्रतापी भीष्माचार्य सिंहनादाप्रमाणे मोठी गर्जना करून शंख वाजवता झाला. 

 भीष्मांचे शंखवादन 

➖➖➖👁️👆👁️➖➖➖

🌽या राजाचिया बोला । सेनापति संतोषला।मग तेणे केला । सिंहनादु ॥ १२५॥

✏  राजा दुर्योधनाचे भाषण ऐकून सेनापती भीष्माचार्य  यांना आनंद झाला. त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. 

🌽तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्यांआंतु।प्रतिध्वनि न समातु । उपजत असे॥ १२६॥

✏  तो गर्जनानाद दोन्ही  सैन्यात इतका विलक्षण   दुमदुमला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात देखील  मावेना.

🌽तयाचि तुलगासवे । वीरवृत्तिचेनि थावें ।दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला॥ १२७॥

✏  या ध्वनी बरोबरच वीरवृत्तीने भीष्माचार्यांनी आपला दिव्य शंख वाजविला.

🌽ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें।जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां॥ १२८॥

✏ ते दोन्हीही प्रचंड ध्वनी एकत्र आल्याने  त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. असे वाटले  की आकाश तुटून पडते आहे. 

🌽घडघडीत अंबर । उचंबळत सागर।क्षोभलें चराचर। कांपत असे॥१२९॥

✏ आकाश गडगडू लागले. सागर उसळू लागला. आणि हे स्थावर जंगम विश्व थरथर कापू लागले. 

🌽तेणें महाघोषगजरें । दुमदुमताती गिरिकंदरें ।तंव दलामाजि रणतुरें आस्फारिलीं॥१३०॥

✏  आणि त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या रांगांमधून प्रतिध्वनी उमटू लागले. अशातच कौरव सैन्यातील  रणवाद्ये वाजू लागली.

➖➖➖👁️👇👁️➖➖➖

🔔ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखः।सहसैवाभ्यहन्यन्त स|शब्दस्तुमुलोऽभवत्॥१३॥

अर्थ 👉 त्यानंतर शंख, नगारे. ढोल, मृदंग आणि कर्णा ही सर्व वाद्ये एकदम वाजवण्यात आली. त्यांचा भयंकर आवाज झाला. 

➖➖➖👁️👆👁️➖➖➖

🌽उदंड सैंघ वाजतें।भयानकें खाखाते।महाप्रळयो जेथें । धाकडांसी॥१३१॥ 

✏ त्या नानाप्रकारच्या रणवाद्यांचा आवाज इतका कर्कश होता की धैर्यवानांना देखिल तो महाप्रळय  भासू लागला.

🌽भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ।आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे॥१३२॥

✏  नौबद, डंक, मांदळ, ढोल, शंख, झांजा व तुतारी  आणि त्यातच वीरांच्या गर्जना  सुरू झाल्या. 

(ध्यानात घ्यावे, आपण कालपासून फक्त कौरवांच्या बाजूच्या  हालचाली अनुभवत आहोत. पांडवांकडील काहीही  हालचाली  वाचनात  आल्या  नाहीत.) 

🌽आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती ।जेथ महामद भद्रजाती । आवरती ना॥१३३॥

✏ कोणी आवेशाने दंड थोपटत आहेत. कोणी चवताळून मोठ्याने हाका मारत आहेत. कोणाला  मदमस्त हत्ती आवरेनासे झालेत.

🌽तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु।जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥१३४॥

✏  तिथे भित्र्यांची काय कथा? जे कुरखेडा ते कस्पटासारखे उडाले. यमास सुद्धा दहशत बसली.

🌽एकां उभयतांचे प्राण गेले।चांगांचे दांत बैसले।बिरुदांचे दादुले । हिंवताती||१३५॥

✏  कित्येकजणांचे उभ्याउभ्या  जीव गेले. काहींची दातखीळ बसली. काहींना कापरे भरले.

🌽ऐसा अदभुत तूरबंबाळु | ऐकोनी ब्रम्हा व्याकुळू|देव म्हणती प्रळयकाळु|ओढवला आजी||१३६||

✏ असा हा भयंकर ध्वनीनाद ऐकून ब्रह्मदेव देखिल  व्याकूळ झाले. इंद्रादि देव तर "आज काय प्रलय काळ ओढवला की काय?" असे म्हणू लागले. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२