सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ३९ ते ५०
अध्याय दुसरा
🔰 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🏺 ||सांख्य योग||
🔰 ओवी३९ ते ५०
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🌼गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके।हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥
अर्थ 👉 महान योग्यतेच्या गुरूजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचे देखील सेवन करणे श्रेयस्कर आहे. गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयोपभोग भोगता येतील पण ते कसे सेवन करावेत ? ॥।२-५॥
( अर्जुनाचे पुन्हा युद्ध न करण्यावीषयी कारण सांगणे = पुढे चालू)
➖➖➖➖⛳➖➖➖➖
☀️देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे।परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये॥ ३९ ॥
✏ देवा, समुद्र गंभीर आहे असे म्हणतात पण तो ही प्रक्षुब्ध झालेला दिसतो. परंतु द्रोणाचार्य प्रक्षुब्ध झालेले कधी दिसले नाहीत.
☀️हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।परि अगाध भलें गहन । हृदय यांचे॥ ४० ॥
✏ अहो, आकाशाचा अंत नसला तरीही त्याचे मोजमाप करता येईल. परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण इतके विचारपूर्ण आणि सखोल आहे की त्याचे प्रमाण कोणालाही कळत नाही.
☀️वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे।परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥ ४१ ॥
✏ कदाचित अमृत आंबेल किंवा काळाच्या ओघात वज्रही फुटेल पण द्रोणाचार्यांच्या मनात क्रोधादि विकार उत्पन्न होणार नाही.
☀️स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये।परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ४२ ॥
✏ आईशिवाय इतरांची माया व्यर्थच ही म्हण खरी असली तरी देवा, यांचे ठिकाणी करुणा मूर्तीमंत वास करत आहे.
☀️हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि ।विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे॥ ४३ ॥
✏ द्रोणाचार्य हे जणू दयेचे उगमस्थान आहेत. सर्व सद्गुणांचा सागर आणि विद्येचे भांडार आहेत.
☀️हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु। आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल॥ ४४ ॥
✏ अशाप्रकारे ते सर्व श्रेष्ठ कृपाळू आहेत, शिवाय आमच्याविषयी तर ते पूर्ण कृपावंत आहेतच. मग त्यांचा घात करण्याचे माझ्या मनात तरी आणता येईल का? सांग बरे!
☀️ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें। तें मना न ये आघवें । जीवितेंसीं ॥ ४५ ॥
✏ अशांना रणांगणात मारून, मग आपण राज्यसुख भोगावे हे तर माझ्या अंतःकरणात येवू शकत नाही.
☀️हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर।ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
✏ इतके हे कृत्य कठीण आहे, आणि यापेक्षा राज्य भोग श्रेष्ठ आहे असे जर कोणी म्हणत असेल तर म्हणोत, मला तर त्या भोगापेक्षा भिक्षा मागणेच बरे वाटते.
☀️ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे ।परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी॥ ४७ ॥
✏ नाही पेक्षा देशत्याग करून डोंगरदर्यात जाऊन रहावे पण यांचे वर (द्रोणाचार्य आणि इतर ) शस्त्रे धरू नयेत.
☀️देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं। भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥
✏ देवा नवीन पाळलेल्या तीष्ण(जपून ठेवलेले भात्यातील बाण) बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून, यांच्या रक्तात बुडालेले ते गलिच्छ भोग आम्ही भोगीत बसावे काय ?
☀️ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती। मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥ ४९ ॥
✏ यांच्या रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे. म्हणूनच भीष्म - द्रोणाचार्य यांचेवर बाण टाकण्याचा सल्ला (युक्तिवाद) मला मुळीच पटत नाही.
☀️ऐसे अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।परि ते मना न येचि मुरारी । आइकोनियां॥ ५० ॥
✏ अर्जुन म्हणतो देवा, मी म्हणालो या गोष्टीचा आपण चांगला विचार करावा. पण अर्जुनाचे हे बोलणे श्रीकृष्णास आवडले नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा