सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी २०१ ते २१५
अध्याय पहिला
🕊️ सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🕊️ ॥अर्जुनविषादयोग॥
🕊️ ओवी २०१ ते २१५
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🍍जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजीं सापडें । कोवळियें ॥२०१॥
✏ ज्याप्रमाणे भ्रमर (भुंगा) वाळलेले कितीही कठीण लाकूड लिलया पोखरतो. त्याला छिद्रे करतो, पण तोच भ्रमर कोवळ्या कमळाच्या पाकळ्यात त्या मिटल्यावर अडकून पडतो. (आता त्याची लाकडे फोडण्याची वृत्ती पाकळ्यांपुढे चालत नाही )
🍍तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परीं ते कमळदळु चिरूं नेणे।तैसे कठीण कोवळेंपणे । स्नेह देखा॥२०२॥
✏ त्या कमळदळात तो भुंगा गुदमरून आपला प्राण सोडेल पण तो पाकळ्या चिरून बाहेर पडू असा विचारही करत नाही, त्याप्रमाणे अर्जुनास आप्तेष्टांच्या मोहाने झाले आहे.
🍍हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया। म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे॥२०३॥
✏ संजय धृतराष्ट्रास सांगतो, हे राजा ऐक, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे, ती ब्रह्मदेवासही आवरता आली नाही, तर तिने अर्जुनाला घायाळ केले, यात काय नवल !!!
🍍अवधारीं मग तो अर्जुनु ।देखोनि सकळ स्वजनु ।विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥२०४॥
✏ असो, राजन ऐका, आपल्या सर्व आप्तेष्टांच्या मोहाने अर्जुनाचा सर्व युद्धाभिमान मावळून गेला.
🍍कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता।मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥ २०५ ॥
✏ त्याच्या मनात कशी करुणा उत्पन्न झाली कोण जाणे!! त्या करुणेच्या भरात तो कृष्णास म्हणू लागला "देवा मला वाटतं, आपण इथे राहूच नये."
🍍माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।जे वधावे हे सकळ । येणें नांवे॥ २०६ ॥
✏ "या सर्वांना मारायचे ही गोष्टच मनात आल्यावर माझे मन व्याकूळ होऊन बोबडी वळल्यामुळे शब्द उमटेनासा झाला. "
🌿🌿🌿🌿🌺🌿🌿🌿🌿
🔔निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव ।न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे॥३१॥
अर्थ 👉 हे केशवा मला विपरीत लक्षणे दिसत आहेत. युद्धामधे स्वजनांना मारले असता कोणतेही श्रेय (प्राप्त होईल असे) मला दिसत नाही. ॥१-३१॥
🌿🌿🌿🌿🌺🌿🌿🌿🌿
🍍या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे। हे येर येर आघवे । गोत्रज आमुचे॥२०७॥
✏ अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, "हे केशवा, या कौरवांना जर मारायचे तर मग धर्मराजादिकांना का मारू नये ? कारण हे दोन्हीही माझे गोत्रजच आहेत. आम्ही परस्परांचे नातेवाईकच आहोत."
🍍म्हणोनि जळो हें झुंज ।प्रत्यया न ये मज ।एणें काय काज ।महापापें॥२०८॥
✏ "म्हणून देवा, आग लागो या युद्धाला ! या महापातकावाचून आमचे काय खोळंबले आहे? मला हे काही पसंत नाही. "
🕊️देवा बहुतं परीं पाहता । एथ वोखटें होईल झुंजतां । वर काहीं चुकवितां । लाभु आथी॥ २०९ ॥
✏ देवा, पुष्कळ दृष्टीने विचार करून मी पाहिले पण युद्धाचा परिणाम वाईटच होईल, पण ते जर टाळले तरच काहीतरी कल्याण होईल.
🌿🌿🌿🌿🌺🌿🌿🌿🌿
🔔न काङक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानि च ।किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा॥ ३२ ॥
अर्थ 👉 कृष्णा मला विजयाची इच्छा नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्य मिळून काय उपयोग ? सुखोपभोग मिळून काय उपयोग ? किंबहुना आम्हाला जगून तरी काय उपयोग ? ॥१-३२॥
➖➖➖➖➖➖➖➖
🔔येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च।ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च॥ ३३ ॥
अर्थ 👉 ज्यांच्याकरता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखाची इच्छा असावयाची ते हे या युद्धामधे स्वत:चे प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहेत. ॥१-३३॥
🌿🌿🌿🌿🌺🌿🌿🌿🌿
🍍तया विजयवृत्ती कांही । मज सर्वथा काज नाहीं। एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां ॥२१०॥
✏ मला असे वाटते की असे युद्ध करून विजयी होण्याची मला गरजच नाही. आणि असले राज्य मिळवून तरी काय उपयोग आहे का?
🍍यां सकळांते वधावे । मग जे भोग भोगावे ।ते जळोत आघवे । पार्थु म्हणे॥२११॥
✏ मग अर्जुन म्हणतो, "देवा, या सर्वांचा वध करून भोग भोगावयाचे त्या सर्वांस आग लागो."
🍍तेणें सुखेविण होईल । तै भलतेही साहिजेल।वरि जीवितही वेंचिजेल । याचिलागीं॥२१२||
✏ या सुखापेक्षा आम्ही वाटेल ती दुःखे सोसू किंवा त्यासाठी आम्ही आपले प्राण देखील खर्ची घालू .
🍍परीं यासी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे ।हे स्वप्नींही मन माझे । करूं न शके॥२१३॥
✏ परंतु यांचा घात करून मग राज्यसुख आपण भोगावे ही गोष्ट कधीही स्वप्नात सुद्धा माझ्या मनात येणार नाही.
🍍तरी आम्ही का जन्मावें । कवणालागीं जियावें।जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें॥२१४॥
✏ जर आम्ही आमच्या वडिलांचे अहित, वाईट चिंतित असो, तर मग आम्ही जन्माला तरी का यावे आणि जगावे तरी कोणासाठी ?
🍍पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ। जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले॥२१५॥
✏ प्रत्येकजण आपल्या कुळात पुत्रप्राप्तीची इच्छा धरतात, त्याचे हेच का फळ देवा, की पुत्राने आपल्या गोत्रजाचा वध करावा?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा