सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ८१ ते ९०

अध्याय दुसरा

🚩  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🔱  ||सांख्य योग||

🚩  ओवी ८१ ते९०

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

🌱संजय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः।न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ॥९॥

अर्थ 👉  संजय म्हणाला राजा, जितनिद्र असा पार्थ श्रीकृष्णाला असे स्पष्ट सांगून स्तब्ध झाला.

➖➖➖🚩🔱🚩➖➖➖

🌱ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।पुनरपि शोकाकुलितु । काय बोले॥ ८१ ॥

🖍️ संजय धृतराष्ट्राला सांगतो, महाराज  पहा तो अर्जुन पुन्हा शोकाकुलित होऊन श्रीकृष्णाशी काय बोलत आहे.

🌱आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि ॥ ८२ ॥

🖍️ अर्जुन  म्हणतो, देवा आता आपण मला युद्ध  करण्या विषयी कोणत्याही प्रकारे भीड घालण्याच्या भानगडीत पडू नका. आता स्वजनांशी मी निःसंशय  युद्ध करणार नाही  हे पक्के समजा.

🌱ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरोनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयाते॥८३॥

🖍️ असे पुन्हा आलेल्या मोहाच्या लहरीत एकदम बोलून तो स्तब्ध झाला. अशी अर्जुनाची स्थिती  पाहून देवाला मोठे आश्चर्य वाटले. 

➖➖➖🚩🔱🚩➖➖➖

🌼तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत| सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः१०॥

अर्थ 👉 हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला (अर्जुनाला) श्रीकृष्ण किंचित हसल्यासारखे करून पुढील प्रमाणे बोलू लागले.

( श्रीकृष्णांचा सांख्ययोगाप्रमाणे आत्मानात्मविवेक सांगणे.

➖➖➖🚩🔱🚩➖➖➖

🌱मग आपुला चित्तीं म्हणे । एथ हें काय आदरिलें येणें ।अर्जुन सर्वथा कांही नेणे । काय कीजे ॥ ८४ ॥

🖍️ तेव्हा भगवान आपल्या मनात म्हणतात   अर्जुनाने हे काय आरंभिले आहे? त्याला काहीच कळनासे झाले आहे याला काय करावे?

🌱हा उमजे आतां कवणेपरी ।कैसेनि धीरु स्वीकारी ।जैसा ग्रहाते पंचाक्षरी । अनुमानी कां॥ ८५ ॥

🖍️ आता याची कोणत्या उपायाने समजूत निघेल?काय केले असता याला धैर्य  येईल? जसा एखादा  मांत्रिक पिशाच्चादिकाची निवृत्ती कशी होईल याची परीक्षा करतो.

🌱ना तरी असाध्य देखोनि व्याधी| अमृतासम दिव्य औषधी।वैद्यसूचिनिरवधि ।निदानींची॥८६॥

🖍️  किंवा रोग असाध्य आहे हे जाणताच क्षणी वैद्य  जसा, निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधीची तत्काळ योजना करतो.

🌱तैसा विवरितु असे श्रीअनंतु।तया दोन्हीं सैन्याआंतु। जयापरी पार्थु । भ्रांति सांडी॥ ८७ ॥

🖍️ त्याप्रमाणे त्या दोन्ही सैन्यात स्थित असलेले  भगवान कोणत्या उपायाने अर्जुन आपला मोह टाकील याचा विचार करू लागले. 

🌱तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिले।जैसें मातेच्या कोपीं थोकलें । स्नेह आथी॥ ८८ ॥

🖍️  अर्जुनाच्या भ्रांतिजन्य शोकाचे कारण यथार्थ  आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे, आणि याच अज्ञानाचा नाश केल्याशिवाय अर्जुनाच्या भ्रांतिजन्य दुःखाचा  नाश होणार नाही, हे जाणून देव आईच्या रागात  अर्जुनाशी बोलू लागले. (आईच्या रागात पुत्रप्रेम ओतप्रोत भरलेले असते.) 

🌱कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी।ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥८९॥

🖍️ जसा औषधांच्या कडूपणातच अमृताचा वर्षाव  असतो. (आईच्या रागात ) पण तो वरकरणी दिसत नाही तरीही गुणांवरून पुढे प्रगट होतो.

🌱तैसे वरिवरि पाहतां उदासें ।आंत तरी अतिसुरसें ।तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं॥ ९० ॥

🖍️  त्याप्रमाणे वरकांती ऐकण्यास कठोर, पण परिणामी सुरस व अत्यंत हितकर अशी उपदेशाची भाषा देव बोलू लागले.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२