सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी १६४ ते १७४

अध्याय पहिला

🏏  सार्थ ज्ञानेश्वरीओव्या

💈  ॥अर्जुनविषादयोग॥

🎖️  ओवी१६४ ते१७४

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

➖➖➖👁️🌸👁️➖➖➖

💙अथ व्यवस्थितान् दृष्टवा धार्तराष्ट्रानं कपिध्वजः ।प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः॥ २०॥

अर्थ 👉 कौरवपक्षीय सैनिक (पुन्हा) व्यवस्थित उभे राहिलेले पाहून शस्त्रसंपाताच्यावेळी आपले धनुष्य उचलून पांडुपुत्र अर्जुन -

➖➖➖👁️🌸👁️➖➖➖

💚तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते।तिहीं पुनरपि दळातें । आवडलें ॥१६४॥

✏ कौरव सैन्यातील भीतीयुक्त वातावरण  घालवण्यासाठी त्या सैन्यातील शूर वीरांनी त्यांना  शांत केले.

💚मग सरिसपणें उठावले । दुणावटोनि उचलले ।तया दंडी क्षोभलें ।लोकत्रय॥१६५॥

✏ मग ते मोठ्या तयारीने सरसावले.  तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन त्रस्त होऊन गेले. 

💚तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।जैसे प्रलयांत जलधर । अनिवार का॥१६६॥

✏  ज्याप्रकारे प्रलयंकारी मेघ एकसारखी वृष्टी  करतात,  तसेच  तेथे  धनुर्धर वीरांनी तीक्ष्ण बाणांची वृष्टी केली.

💚तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मने। मग संभ्रमे दिठी सेने । घालितसे॥१६७॥

✏  ते पाहून अर्जुनाला फार आनंद झाला. त्याने आवेशयुक्त नजर आपल्या सैन्यावर टाकली.

💚तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले।मग लीला धनुष्य उचलिले । पंडुकुमरें॥१६८॥

✏ तेव्हा सर्व कौरव सैन्य युद्धास सज्ज झालेले पाहून अर्जुनानेही आपले धनुष्य सहज उचलले.

➖➖➖👁️👇👁️➖➖➖

💙हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते।अर्जुन उवाच|सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत॥ २१।

अर्थ 👉 हे धृतराष्ट्रा, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना पुढील वाक्य बोलला, “हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. 

➖➖➖👁️👆👁️➖➖➖

💚ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा ।आतां झडकरी रथु पेलावा ।नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां॥ १६९॥

✏ तेव्हा अर्जुन श्रीकृष्णास म्हणाले, "देवा, आपला रथ दोन्हीही सैन्याच्या मध्ये नेउन उभा करा.

➖➖➖👁️👇👁️➖➖➖

💙यावदेतान् निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्।कैर्मया सह योद्धव्यस्मिन् रणसमुद्यमे॥ २२॥

अर्थ 👉 म्हणजे युद्धाची इच्छा करून त्यासाठी तयार असलेले हे सर्व योद्धे मी अवलोकन करीन व या रणसंग्रामामधे मला कोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे ते मी पाहून घेईन.

💙योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः ।धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकिर्षवः॥ २३॥

अर्थ 👉 दुर्बुद्धि धृतराष्ट्रापुत्राचे (दुर्योधनाचे) युद्धामधे प्रिय करण्याची इच्छा असलेले जे हे योद्धे येथे गोळा झालेले आहेत त्यांना मी अवलोकन करीन. ॥१-२३॥ 

➖➖➖👁️👆👁️➖➖➖

💚जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।न्याहळीन अशेख । झुंजते जे॥ १७०॥

✏  म्हणजे येथे युद्ध करण्यासाठी आलेल्या सर्व  वीरांना मी क्षणभर न्याहाळून पाहीन.

💚एथ आले असती आघवे । परी कवणेंसी म्यां झुंजावे।हे रणीं लागे पहावें । म्हणऊनियां॥ १७१॥

✏  येथे सर्वच युद्धासाठी आलेले असले तरी मला कोणाशी लढावे लागणार हे पहावे लागेल. 

💚बहुतकरुनि कौरव ।हे आतुर दुःस्वभाव | वाटिवांवीण हांव । बांधिती झुंजीं॥१७२

✏ हे बहुतेक उतावीळ व दुष्टबुद्धी कौरव अंगात  पराक्रम नसताना युद्धाची हाव धरतात. 

💚झुंजाची आवडी धरती ।परी संग्रामी वीर नव्हती।हे सांगेन रायाप्रती । काय संजयो म्हणे।१७३॥

✏ यांना युद्धाची हौस आहे खरी पण यांच्याने रणभूमीवर धीर धरवत नाही.

➖➖➖👁️👇👁️➖➖➖

💙संजय उवाच: एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत।सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्॥२४॥

अर्थ 👉 संजय म्हणाला, “हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी (तो) श्रेष्ठ रथ थांबवून१-२४॥

➖➖➖👁️👆👁️➖➖➖

💚आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला।दोहीं सैन्यामाजि केला।उभा तेणें॥१७४॥

✏  संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की, अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाने रथ पुढे घेऊन दोन्ही  सैन्याच्या मध्ये उभा केला. 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२