सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी २१ ते ३८
अध्याय दुसरा
🌼 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌸 ||सांख्य योग||
🌼 ओवी२१ ते ३८
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🔔क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते ।क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥३॥
अर्थ 👉 हे पार्था, दुबळेपणाचा त्याग कर. हा तुला शोभत नाही. असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन हे अर्जुना, युद्धाला उठ.॥२-३॥
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🌹म्हणोनि शोक न करीं।तूं पुरता धीरु धरीं।हे शोच्यता अव्हेरीं। पंडुकुमरा ॥२१॥
✏ म्हणून अर्जुना! तू शोक करू नकोस. पूर्ण धीर धर आणि आप्तपरिवाराबद्दलचा हा विषाद सोडून दे.
🌹तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडले बहुत ।तूं अझुनिवरी हित । विचारी पां॥२२॥
✏ तुला असा खेद करणे शोभा देत नाही. आजपर्यंत जे यश कीर्ती तू संपादित केलीस, या योगाने तिचा नाश होईल. म्हणून अजून तरी आपले हित कशात आहे याचाच विचार कर.
🌹येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे ।हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥२३॥
✏ अर्जूना अरे, क्षत्रियाला ऐन युद्धप्रसंगी असा कृपाळूपणा उपयोगी नाहीच. आणि हे कौरव आणि सर्व योद्धे काय आजच तुझे नातलग झाले आहेत काय? सांग बरे !
🌹तूं आधींचि काय नेणसी । कीं गोत्र नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥२४॥
✏ हे नातलग तू आज ओळखतोस का? की हा गोतावळा तुला माहीत नव्हता? मग हा व्यर्थच शोक का करतोस, अर्जूना!
🌹आजिंचे हें काय झुंज । काय जन्मा नवल तुज । हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथि ॥२५॥
✏ हा युद्धप्रसंग तुला नवीनच आहे की काय? तुमचे परस्परातील कलहाचे कारण नेहमीचेच आहे.
🌹तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनले।हें नेणिजे परि कुडे केले । अर्जुना तुवा ॥२६॥
✏ मग आताच काय विशेष झाले ! हा मोह तुझे ठिकाणी उत्पन्न झाला आणि तेही यावेळी अर्जुना हे फारच वाईट आहे.
🌹मोह धरिलिया ऐसें होईल।जेअसती प्रतिष्ठा जाईल।आणि परलोकही अंतरेल ।ऐहिकेंसी॥२७॥
✏ जर तू हा मोह असाच धरून बसलास तर तू मोह भ्रांतीत पडशील आणि त्याचा परिणाम असा होईल की, तुझी कीर्ती, विख्याती लौकिक सर्व जाईलच पण तू इहलोकासह परलोकीही अंतरशील.
🌹हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रीयांसी ॥२८॥
✏ युद्धप्रसंगी हा नेभळटपणा क्षत्रियाला भूषणावह नाहीच तर तुझे अधःपतन होईल, हे समजून घे.
🌹ऐसें तो कृपावंतु।नानापरी असे शिकवितु।हे ऐकोनि पंडुसुतु।काय बोले॥२९॥
✏ अशाप्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला नानाप्रकारे समजावले.मग ते सर्व ऐकूनअर्जुन काय विचारतो ते ऐका.
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🔔अर्जुन उवाचः कथं च भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन।इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥४॥
अर्थ 👉 अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, पूजनीय अशा भीष्मांवर आणि द्रोणाचार्यांवर युद्धामधे मी उलट बांण टाकून मी कसे बरे युद्ध करू?॥२-४॥(अर्जुनाचे पुन्हा युद्ध न करण्यावीषयी कारण सांगणे)
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🌹देवा हें येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारीं।आधीं तूंचि चित्ती विचारीं । संग्रामु हा॥३०॥
✏ देवा, मला इतके काही समजावयास नको. आपण पहिले माझे या युद्धाविषयीचे म्हणणे समजून घ्या.
🌹हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥३१॥
✏ देवा, हे युद्ध नाहीच तर आमच्या हातून एक मोठा दोष घडणार आहे, आमच्या पूर्वजांचा उघड उघड उच्छेद ओढवला आहे.
🌹देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती ।तियें पाठीं केवीं वधिजती । आपुला हातीं ॥३२॥
✏ देवा मला हे कळते की मातापितरांची सेवा करावी, त्यांना संतुष्ट ठेवावे हा पुत्राचा धर्म आहे. या उलट आपणच आपल्या हाताने त्यांचा वध कसा करावा सांग बरे.
🌹देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा॥३३॥
✏ देवा, साधूसंतांना नमस्कार करावा, त्यांची पूजा करावी. पण हे न करता आपण त्यांची निंदा का करावी.
🌹तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमांचे । मज बहुत भीष्मद्रोणांचे । वर्ततसे॥३४॥
✏ त्याचप्रमाणे हे आमचे गोत्रज व कुलगुरू आम्हास पूजनीय आहेत, त्यातच भीष्म आणि द्रोणाचार्य यांचेविषयी तर माझे मनात सदैव आदरच आहे. त्यांनी आम्हास सदाचरण शिकविले आहे.
🌹जयालागीं मनें विरु। आम्ही स्वप्नींही न शको धरूं। तया प्रत्यक्ष केवीं । घातु देवा ॥३५॥
✏ यांच्याविषयी मी स्वप्नातही वैर धरू शकत नाही, मग त्यांचाच प्रत्यक्ष आपल्या हाताने घात कसा करू?
🌹वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले। जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं॥३६
✏ देवा, आग लागो अशा जगण्याला ! पहा जी शस्त्रविद्या आम्ही यांच्याकडेच अभ्यास करून मिळविली आहे, पण त्याच विद्येचा उपयोग त्यांचेवरच करावा? काय झाले काय सर्वांना?
🌹मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें॥३७॥
✏ मी अर्जुन, पण द्रोणाचार्यांनी मला पार्थ म्हणजेच धनुर्विद्येत निपुण बनविले. या त्यांच्या उपकाराने आभारी झालेला मी, आणि मीच त्यांना मारावे?
🌹जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मने व्यभिचारु ।तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे॥३८॥
✏ भस्मासुराने श्रीशंकराकडून वर घेतला आणि त्यांच्याशीच कृतघ्नपणा केला (भस्मासुर शंकराचेच भस्म करण्यासाठी तयार झाला होता ही गोष्ट आपणास माहीत असेलच.) तसा कृतघ्नपणा करण्यास मी काय भस्मासुर आहे का देवा?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा