सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुनविषादयोग ओवी २१६ ते २३२
अध्याय पहिला
🌳 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌈 ||अर्जुनविषादयोग
🌳 ओवी २१६ ते २३२
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌈हें मनींचि केवि धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे ।वरी घडे तरी कीजे । भले एयां॥ २१६ ॥
✏ आपण अशा स्वतःच्याच कुळाचे भले करावे. त्यांस सुखी करावे, याउलट आपले मन त्यांच्याविषयी वज्रापेक्षा कठीण करण्याचे मनात तरी कसे आणावे? ----- अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला.
🌈आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥ २१७॥
✏ देवा, आम्ही जे जे मिळवावे, त्या सगळ्यांचा आमच्याच कुळाने उपभोग घ्यावा. इतकेच नाही तर आम्ही आमचा जीवही यांच्यासाठी अर्पण करावा.
🌈आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८॥
✏ आम्ही देशोदेशीचे सर्व राजे जिंकावेत, आणि आपल्या कुळास आनंदित करावे.
🌈तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९॥
✏ पण कर्माची गती कशी विचित्र आहे पहा देवा, तेच हे आमचे गोत्रज आम्हाबरोबरच युद्ध करण्यास तयारीने उभे आहेत यास म्हणावे तरी काय?
🌈अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें। शस्त्राग्रीं जिव्हारें ।आरोपुनी॥२२०॥
✏ अहो, ते आपली मुले, बायका व धन या सर्वांवर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपला जीव ठेवून आले आहेत.
ऐसियांते कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं।निज हृदया करूं । घातु केवीं ॥ २२१ ॥
✏ तरी देवा, अशा माझ्या ह्रदयाच्या जवळ असणाऱ्या या माझ्या गोत्रजांचा घात मी कसा करू? कोणावर शस्त्र धरू?
🌼🌸🌼🌸🌹🌼🌸🌼🌸
🌹आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः । मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥ ३४॥
अर्थ 👉 माझे गुरु, आजे, पितृतुल्य स्वजन, पुत्र त्याचप्रमाणे आजे, मामे, सासरे, नातु, मेव्हणे आणि तसेच संबंधी लोक -
🌼🌸🌼🌸🌹🌼🌸🌼🌸
🌈हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण।जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत॥२२२॥
✏ देवा, हे सगळे कोण आहेत तुला माहीत नाही का ? पलिकडे पहा ते भीष्म आणि द्रोण आहेत. त्यांचे आमच्यावर अनंत असे उपकार आहेत.
🌈एथ शालक सासरे मातुळ । आणी बंधु कीं हें सकळ। पुत्र नातू केवळ । इष्टही असती॥२२३॥
✏ इथे मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू तसेच सर्व पुत्र, नातू व आप्तही आहेत.
🌈अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि॥२२४॥
✏ हे सर्व आमचे फार जवळचे नातेवाईक आहेत, तेव्हा यांना मारण्याची नुसती कल्पना केली तरी देखिल पापच आहे.
🌸🌼🌸🌼🌹🌸🌼🌸🌼
🌽एतान्न हन्तुमिछामि घ्नतोऽपि मघुसूदन ।अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं न महीकृते ॥ ३५ ॥
अर्थ 👉 हे मधुसूदना, मी मेलो तरी यांना ठार मारण्याची माझी इच्छा नाही. त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरीही (यांना मारण्याची माझी इच्छा नाही). मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा ? ॥१-३५॥
🌸🌼🌸🌼🌹🌸🌼🌸🌼
🌈हे वरी भलतें करितु । आंताचि एथें मारितु। परि आपण मनें घातु । न चिंतावा॥२२५॥
✏ उलट पक्षी हे वाटेल ते करोत; किंवा ते आत्ताच आम्हाला इथेच मारोत; तरीपण आपण त्याचा घात करण्याचे मनातही आणू नये.
🌈त्रैलोक्यींचे अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी॥२२६॥
✏ अहो ! त्रिभुवनाचे राज्य जरी प्राप्त झाले, तरी सुद्धा हे अनुचित कर्म मी करणार नाही,
🌈जरी आज एथ ऐसें कीजे । तरी कवणांचा मनीं उरिजे । सांग मुख केवीं पाहिजे । तुझे कृष्णा॥२२७॥
✏ कृष्णा ! जर या ठिकाणी आम्ही आप्तांच्या वधासारखे हे असले घोर कृत्य केले; तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील; आणि देवा, तुझे तोंड तरी आमच्या दृष्टीस पडेल का?
🌼🌸🌼🌸🌹🌼🌸🌼🌸
🌽निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन|पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः३६॥
अर्थ 👉 हे जनार्दना, धृतराष्ट्रपुत्रांना मारून आमचे काय प्रिय होणार ? ह्या आततायींना मारले असता आम्हाला (कुलनाशाचे) पाप मात्र लागेल.
🌸🌼🌸🌼🌹🌸🌼🌸🌼
🌈जरी वधु करूनी गोत्रजांचा । तरी वसौटा होऊन दोषांचा। मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी॥२२८॥
✏ जर मी गोत्रजांचा वध केला; तर मी दोषांचे वसतीस्थान होईन. आणि मग अनायासे जोडलेला तू मात्र माझ्या हातचा निसटून जाशील.
🌈कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें ।तयें वेळी तूं कवण कें । देखावासी॥२२९॥
✏ कुलघाताने घडणारी सर्व पातके अंगाशी जोडली की तू दुरावशील तेव्हा तुला कुठे पहावे आम्ही?
🌈जैसा उद्यानामाजीं अनळु।संचरला देखोनि प्रबळु।मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे॥२३०॥
✏ अहो ! जर एखाद्या बागेत अग्नीचा भडका उडाला तर कोकिळ पक्षी तिथे क्षणभर राहात नाही.
🌈सकर्दम सरोवरु।अवलोकूनि चकोरु। न सेवितु अव्हेरु।करूनि निघे॥२३१॥
✏ किंवा सरोवराचे पाणी आटले, चिखलच शिल्लक राहिला तर चकोर पक्षी सरोवराचा तिरस्कार करून निघूनच जातो.
🌈तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा।जरी पुण्याचा वोलावा। नाशिजेल॥२३२॥
✏ त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठायी असलेला पुण्याचा ओलावा या युद्धाने नाहीसा झाला; तर तू तुझ्या मायेने मला फसवून अलगद दूर होशील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा