सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2रा ||सांख्य योग|| ओवी ९१ ते १०२
ज्ञानेश्वरी अध्याय 2रा⛳
💍 c💍
🍇 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🍊 ||सांख्य योग||
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🐚श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे।गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः॥ ११ ॥
अर्थ👉 भगवान श्रीकृष्ण म्हणाले - शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक करतोस व वर पांडित्याच्या गोष्टी सांगतोस. पण विवेकी लोक मेलेल्याबद्दल व न मेलेल्याबद्दल शोक करत नाहीत
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🦀मग अर्जुनाते म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें ।जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
✏ आता देव अर्जुनास आईच्या रागात बोलले की, आम्ही एक हे आश्चर्यच पहात आहोत. कारण युद्ध समयी तू हे काय भलतेच बोलत आहेस?
🦀तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणीवेतें न संडिसी ।आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति॥ ९२ ॥
✏ तू स्वतःला तर काय मोठा ज्ञानी म्हणतोस, पण अज्ञान, मूर्खपणा तर काय सोडत नाहीस. तुला एखादी गोष्ट शिकवावी म्हटले तर तूच आम्हास नीतीच्या, शहाणपणाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस.
🦀जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें।तुझे शहाणपण तैसें । दिसतसे॥ ९३ ॥
✏ जसे एखाद्या जन्मजात आंधळ्यास वेड लागावे मग त्याने सैरावैरा धावावे. तसेच हे तुझे शहाणपण दिसत आहे.
🦀तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी।हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती॥ ९४ ॥
✏ तू अगोदर आपणास जाणत नाहीस. (शुद्ध आत्मस्वरूपास )
पण या कौरवांकरीता मात्र शोक करत आहेस, हे आश्चर्य आहे.
🦀तरी सांग पां मज अर्जुना । तुजपासोनि स्थिती या त्रिभुवना।हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी॥ ९५ ॥
✏ तर अर्जुना, हे सांग की, "सर्वज्ञ ईश्वराने या विश्वाची जी अनादि रचना केली ", हे खोटे आहे का? आणि तू या त्रैलोक्याचा पालनकर्ता आहेस की काय?
🦀एथ समर्थु एक आथीं । तयापासूनि भूतें होती ।तरी हें वायाचि काय बोलती । जगामाजीं॥ ९६ ॥
✏ अरे वेड्या! या सृष्टीत सर्वशक्तीसंपन्न असा एकच ईश्वर आहे व त्याचेपासूनच प्राणीमात्रांची उत्पत्ती होते, असे जगातील श्रेष्ठ म्हणतात, ते खोटं आहे की काय?
🦀हो कां सांप्रत ऐसें जहालें । जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले ।आणि नाशु पाविले । तुझेनि कायी॥ ९७ ॥
✏ याचा अर्थ (अर्जुनाच्या शोकाकुल बोलण्याचा अर्थ ) असा होतो की प्राणीमात्रांचे जन्ममृत्यू तूच उत्पन्न केलेस; म्हणून तूच जर यांचा नाश केलास तरच ते नाश पावतील.
🦀तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसी घातु न करिसी चितीं।तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
✏ अर्जुना जरी तू तुझ्या अहंकाराने अथवा भ्रमाने विचार करून यांचा (कौरवांचा) घात केला नाहीस; तर ते चिरंजीव होतील का सांग?
🦀कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवो देसी॥ ९९ ॥
✏ अर्जुना, तू या भ्रांतीत राहू नकोस, की तू एक मारणारा आहेस; आणि बाकीचे सगळे लोक मरणारे आहेत.
हे खरे तर नाहीच पण ही भ्रांती तुझ्या चित्तालाही होऊ देऊ नकोस.
🦀अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।तरी तुवा का शोचावे । सांग मज॥ १०० ॥
✏ अरे ! हे सर्व जन्ममृत्यू अनादि काळापासून चालत आलेले आहे. हे स्वभाव:च उत्पत्ती (जन्म ) आणि लय (नाश )पावणारे आहे. मग याबद्दल तू व्यर्थच शोक का करतोस?
🦀परी मूर्खपणे नेणसी । न चिंतावें तें चिंतसी ।आणि तूंचि नीति सांगसी । आम्हाप्रति ॥ १०१ ॥
✏ तुला मूर्खपणामूळे हे समजत तर नाहीच; पण नको त्या गोष्टी मनात ठेवून वर आम्हालाच नीतीच्या गोष्टी सांगतोस.
🦀देखें जे विवेकी जे होती ।ते दोहींतेही न शोचती।जे होय जाय हे भ्रांती| म्हणऊनियां ॥ १०२ ॥
✏ हे पहा जे विचारवंत आहेत ते, जन्म आणि मृत्यू ही एक भ्रांती आहे, असे मानून दोहोंविषयी शोक करीत नाहीत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा