किडनी - रचना, कार्य आणि आजार

 

 मानवी शरीर त्याची रचना, कार्य हे सर्व म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. मनुष्य त्याची नक्कल करून एकेक यंत्र बनू पाहत आहे. काही अंशी या प्रयत्नांना यशही आले आहे. उदा.- मेंदूची नक्कल करून संगणक तयार करणे. तरीपण या यंत्रापेक्षा मानवी शरीर आणि त्यातील अवयव यांना पर्यायच नाही. आपल्या शरीरात अद्भुत पणे काम करणाऱ्या अवयवांपैकी किडनीची रचना, कोणत्या परिस्थितीत किडनी कसे काय काम करते आणि किडनीला जर व्यवस्थितपणे योग्य प्रमाणात काम करता आले नाही तर आजार कसे काय निर्माण होतात याविषयी माहिती घेऊयात.

 रस्त्याने एखाद्या सार्वजनिक शौचालया समोरून जर आपण गेलो तर त्या उग्र वासामुळे नाकास झिणझिण्या येतात. डोळ्यास देखील त्या वासामुळे चुरचुरते आणि पाणी येते. काहीजणांना त्या वासामुळे ठसका लागतो. तर काही जणांना उसासे येऊन उलटी देखील होते. मनाला त्या वासाची घृणा म्हणजे तिटकारा येतो. म्हणजे एकाच वेळी आपल्या ज्ञानेंद्रिये, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि मनावर याचा परिणाम होतो. बाहेर हवेच्या संपर्कात असलेल्या, उघड्यावर पडलेल्या लघवीच्या वासामुळे आपल्यावर एवढा परिणाम होतो तर मग आपल्या शरीरात रक्तातील टाकाऊ घटक लघवीवाटे बाहेर काढणारी किडनी हे सर्व कसे काय सहन करीत असेल? किडनी हे सर्व कसे काय सहन करते किंबहुना किडनीवर या लघवी मधील विषाराचा परिणाम कसा काय होत नाही ते प्रथम पाहूयात.

 किडनीची रचना आणि कार्य :--->

 आपल्या किडनी बळकट, गुळगुळीत, स्निग्ध तेलकट किंवा तुकतुकीत आणि ओलसर स्वरूपात असतात. पाण्यात राहणारे मासे, हंस यांच्या अंगावर एक विशिष्ट प्रकारचे तेल असते. जलतरणपटू सुद्धा पोहताना अंगाला एक विशिष्ट प्रकारचे तेल लावूनच मग पाण्यात उतरतात. त्यामुळे पाण्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर होत नाही. पाण्यामुळे त्वचा सुरकुतत नाही किंवा किरवंजत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील विषारी द्रव्य वेगळे करून बाहेर काढताना या स्निग्धतेमुळे किंवा तेलकटपणामुळे किडनीवर जरा देखील परिणाम होत नाही. तसेच स्नेह गुणामुळे किडनी तेलकट तुकतुकीत आणि गुळगुळीत राहिल्यामुळे रक्तातील द्रव पदार्थ झटकन निघून जातात. किडनीत शोषले जाण्याचा किंवा अडकून राहण्याचा संभव कमी असतो. कोरड्या भागात ओल शोषली जाते. ओलसर भागात ओल शोषली जात नाही. किडनी मूळचीच ओलसर स्वरूपात असते. त्यामुळे रक्तातील द्रवभाग शोषला जाण्याची शक्यता नसते. जर किडनीचे स्वरूप ओलसर न राहता कोरडी राहिली असती तर रक्तातील द्रवभाग पर्यायाने त्या द्रव भागातील विषारी द्रव्य सुद्धा किडनीत शोषली गेली असती. 

आपल्या शरीरात मुठी एवढ्या आणि घेवड्याच्या आकाराच्या दोन किडन्या बरगड्यांच्या खाली मणक्याच्या दोन्ही बाजूला पाठीमागे असतात. प्रत्येक किडनीत अनेक छोट्या-छोट्या गाळण्या असतात. दर दिवशी किडन्या साधारणता ६००मिली ते २५००मिली लघवी तयार करतात. लघवी तयार करतात म्हणजे रक्त गाळून रक्तातील टाकाऊ घटक, शरीराला अपायकारक असणारे घटक लघवीमार्फत बाहेर काढतात. जर आपल्या शरीराला पाण्याची गरज असेल आणि काही कारणाने आपणास पाणी मिळत नसेल तर किडनी लघवीचे प्रमाण कमी करून किंवा गरजेप्रमाणे बंद करून शरीरात पाण्याचे नियमन करते. तसेच जर शरीरात पाण्याचे प्रमाण खूपच झाले तर लघवीचे प्रमाण वाढून रक्तातील पाण्याचे संतुलन राखले जाते. रक्तातील सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड या द्रव्यांचे प्रमाण जरा देखील कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम हृदयावर, स्नायूवर लगेचच होतो‌. या क्षारद्रव्यांचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवण्याचे महत्त्वाचे काम किडनी करते. हाडांमधील मगजापासून रक्ताच्या पेशी तयार होतात. या क्रियेस किडनी चालना देते, मदत करते. किडनीमुळे रक्तदाबाचे नियमन केले जाते. 'ड' जीवनसत्वाच्या निर्मितीमध्ये किडनीचा महत्त्वाचा वाटा आहे. 'ड' जीवनसत्वामुळे हाडांमधील व रक्तामधील कॅल्शियम योग्य प्रमाणात राखले जाते.

 किडनीचे आजार :--->

 वातावरणातील उष्णतेचा, शरीरातील उष्णतेचा, पित्ताचा, तापाचा परिणाम आपल्या रक्तावर आणि त्यामुळे लघवीवर होत असतो. उन्हातून फिरून आल्यानंतर किंवा अग्नीजवळ सतत काम करण्याने लघवीचा रंग बदलतो. ताप आला असता लघवीचा रंग बदलतो. गोवर कांजिण्यांच्या उष्णतेचा परिणाम किडनीवर होऊन लघवीचे प्रमाण कमी राहते. काविळ झाली असता लघवीचा रंग पिवळा होतो. किडनीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास उच्चरक्तदाब, रक्ताची टक्केवारी कमी राहणे, वातनाड्यांचा दाह, काही ठराविक हृदयविकार होण्याची शक्यता असते. बरेचसे किडनीचे आजार हे टप्प्याटप्प्याने होतात. हे टप्पे समजून घेतले तर आजार सहज टाळता येतात.

जर तुम्हास नेहमीपेक्षा कमी प्रमाणात लघवी होत असेल, लघवी फेसाळ असेल, लघवीतून रक्त येत असेल, लघवी करताना त्रास होत असेल किंवा प्रेशर वाटत असेल तर या स्थितीत किडनी काम व्यवस्थित करू शकत नाही.

जर शरीरात जास्त झालेले पाणी किडनी कडून बाहेर काढले गेले नाही तर डोळ्याभोवती, चेहऱ्यावर, घोट्यावर, पायावर सूज यायला लागते. रक्तातील लाल पेशी निर्माण करण्यामध्ये किडनी मदत करत असते. जेव्हा किडनीचे कामकाज मंदावते तेव्हा रक्तातील लालपेशी निर्माण होण्याची क्रिया देखील मंदावते. लालपेशीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची टक्केवारी देखील कमी राहते. त्यामुळे हिमोग्लोबिनच्या माध्यमातून शरीरातील पेशींना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी पडू लागतो. हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपण लगेचच थकतो किंवा आपल्याकडे कोणतेही काम करण्यासाठी  एनर्जींच नसते. डोकेदुखी जाणवते. कोणताही विचार योग्य दिशेने करण्यात किंवा मन एकाग्र करण्यास त्रास जाणवतो. 

झोप व्यवस्थित लागत नाही. रात्रीच्या वेळी स्नायूंना गोळे किंवा पेटके आल्याप्रमाणे वाटतात. जेव्हा किडनीचे काम कमी कमी होऊन रक्तातील विषारी किंवा टाकाऊ द्रव्ये लघवीवाटे बाहेर न जाता रक्तातच वाढू लागतात तेव्हा भूक मंदावते, वजन कोणत्याही प्रयत्न शिवाय कमी कमी होऊ लागते, मळमळते, उलट्या होतात, आजारी असल्याचे जाणवते, संध्याकाळी अंग गरम झाल्यासारखे वाटते, गळून गेल्याप्रमाणे वाटते, मांड्या व पिंड-या दुखू लागतात. आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. अंगावर गांध्या येतात. मेंदू जखडल्यासारखे होतो. काही सुचतच नाही. चालताना तोल जातो की काय असे वाटते. काहीजणांना क्षणभरासाठी चक्कर येते. तर काही जणांना फक्त चक्कर आल्याप्रमाणे वाटते. डोळे, हाता-पायांची आग-आग होते. अंगाला खाज येते. श्वासोश्वास करताना धाप लागते. खोकला येतो. घसा लाल होऊन आत काहीतरी अडकल्यासारखे वाटते. वारंवार तोंड येते. पोट गच्च वाटते. संडासला व्यवस्थित साफ होत नाही. लघवीच्या ठिकाणी मधून मधून कळा येतात. लघवीला गरम होते. दिवसभर लघवीला गेले नाही तरी चालते. संध्याकाळच्या वेळी अंग मोडकळीला आल्याप्रमाणे वाटते. कधी कधी झोप येत नाही. तळहात तळपाय पोटऱ्या गार पडतात. मनाची द्विधा अवस्था होते.  रक्तातील विषारी द्रव्यांचे प्रमाण खूपच वाढले तर फिट येते. लघवीला कमी प्रमाणात होऊन अडखळत होते. सांधे दुखू लागतात. उचक्या लागतात. मळमळण्याचे प्रमाण वाढते. भरपूर प्रमाणात तहान लागते आणि एवढे पाणी पिऊनही लघवी मात्र कमी होते. हाता-पायात संवेदना कमी जाणवतात किंवा जाणवत नाही. उलटीमधून किंवा संडासमधून रक्त पडते. सहज जरी खरचटले तरी त्यातून रक्तस्त्राव होतो. श्वासोश्वासाला दुर्गंधित वास येतो. ब्लड प्रेशर वाढू लागते. त्वचेच्या रंगामध्ये आणि नखांमध्ये देखील फरक पडतो. पेशंटच्या हालचालींमधून, वागण्यामधून किंवा आवाजातून जीवघेणी काळजी जाणवते आणि या काळजीचे कारणच माहीत नसते.

 आत्तापर्यंत आपण एकूणच किडनीच्या आजारातील अनेक लक्षणे पाहिली. सगळ्या पेशंटमध्ये सगळीच लक्षणे दिसतीलच असे नाही. किडनीच्या कामातील बिघाडानुसार किंवा ठिकाणानुसार किंवा कारणानुसार ही लक्षणे वेगवेगळी असतात. याविषयी माहिती घेऊत.

जर मूत्राशयामध्ये गाठ, खडा किंवा इन्फेक्शन असेल तर त्यामुळे मूत्राशयाच्या पिशवीला इरिटेशन होऊन लघवीला जळजळ होणे, दुखणे, वारंवार होणे, लघवीला घाई किंवा गडबड होणे आणि संपूर्ण लघवी झाली नाही असे वाटते. किडनीला काही इन्फेक्शन झाले असेल तर थंडी वाजून ताप येतो, पोटात दुखते. लघवीमधून जर रक्त येत असेल तर रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये काही बिघाड असण्याची शक्यता असते. साठी ओलांडलेल्या पुरुषांमध्ये जर पौरुषग्रंथीची वाढ झाली असेल तर त्यांना लघवीच्या सुरुवातीस त्रास होतो. तसेच लघवी थांबविताना देखील त्रास होतो म्हणजे थेंब-थेंब होते.लघवीवर नियंत्रण राहत नाही.

 काही किडनीच्या आजारांमध्ये लघवीमधून मोठ्या प्रमाणात प्रोटीन बाहेर जातात. त्यामुळे शरीरात अल्ब्युमिन कमी पडतात. अशा पेशंटच्या अंगावर भरपूर प्रमाणात सूज असते. मुतखडा असेल तर पोटात अधून-मधून प्रचंड प्रमाणात दुखणं जाणवते आणि हे दुखणे कमरेपासून पुढे पोटाकडे आणि पोटापासून खाली लघवीच्या जागेकडे जाते. जेव्हा खडा पुढे सरकतो किंवा जागेवर हालतो त्यावेळी लघवीमधून रक्तस्त्राव होतो. बऱ्याच जणांना मुतखड्यामुळे लघवीत जंतुसंसर्ग निर्माण होतो. अचानक मुतखड्यामुळे पोटदुखी सुरू होते त्यावेळी काहीजणांना उलट्या देखील होतात.

 बऱ्याच पेशंटमध्ये लघवीमार्गामध्ये वारंवार जंतुसंसर्ग निर्माण होतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. अशा जंतुसंसर्गामुळे लघवी करताना जळजळणे, दुखणे, लघवीला घाई होणे, वारंवार लघवीला होणे, लघवी संपूर्णपणे झाल्याचे समाधान न मिळणे, लघवीला उग्र दर्प येणे, लघवीचा रंग गडद होणे, पोटात दुखणे अशी लक्षणे जाणवतात. काही व्यक्तींमध्ये किंवा लहान मुलांमध्ये लघवीवर ताबा नसतो. विशेष काही मुला-मुलींमध्ये अंथरूण ओले करण्याची सवय असते. काही व्यक्तींमध्ये शारीरिक हालचाली करताना थोडी थोडी लघवी लिक होते तर काही व्यक्तींमध्ये लघवी करण्याची इच्छा झाली लगेचच लघवी लिक होते.

लेखन डॉ. वैशाली माने, सातारा | संपर्क 9423826921

सदरची माहिती आपणाला कशी वाटली हे जरुर सांगा, अशाच प्रकारच्या आरोग्यदायी माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. सदरची माहिती कॉपी करण्यास सक्त मनाई आहे.

#बहिरेपणा

#ऐकू कमी येणे

#ऐकू न येणे

#deafness

#hearing loss

#tinnitus

#deafness in child

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२