समतोल आहार | षड् रसात्मक आहार
आपण सर्वजण अर्थाजन करतो ते मुख्यतः पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी. त्यामुळे फक्त डॉक्टरांचा नव्हे तर सगळ्यांचा सल्ला - दररोज समतोल आहार घ्यावा. आयुर्वेदाने समतोल आहार म्हणून षड् रसात्मक आहाराचा विचार मांडला आहे. षड् रसात्मक आहार म्हणजे सहा रसयुक्त आहार. रस म्हणजे चव किंवा टेस्ट. जीभेला ज्याचे ज्ञान होते ती चव किंवा रस. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, आणि तुरट अशा सहा वेगवेगळ्या चव आहेत. या प्रत्येक चवीचा किंवा रसाचा उपयोग काय? शरीरावर आणि मनावर त्या-त्या चवीचा कोणता परिणाम होतो? त्या चवीचा पदार्थ खाल्लाच नाही तर किंवा अति प्रमाणात खाल्ला तर कोणते दुष्परिणाम होतील, याची सविस्तर माहिती घेऊयात.
१) मधुर रस/ गोड चव :--->
अगदी तान्हुल्या बाळास आपण फक्त गोडसर चवीचे पदार्थ देतो. उदा. दूध+साखर. गोड चवीचे पदार्थ आपणास जन्मापासून मानवतात. त्यामुळे अगदी नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत आणि दुबळ्या, अशक्त, आजारी लोकांपासून ते निरोगी, सशक्त माणसांपर्यंत सगळ्यांनाच गोड चवीचे पदार्थ उपयोगी असतात. आपले पंचज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळे,जीभ, त्वचा आणि ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये एकत्र असलेले उभयात्मक मन यांचे पोषण मधुर रसामुळे होते. शरीरातील सात धातू - रस, रक्त, मांस, मेद(चरबी), अस्थी(हाडे), मज्जा(मेंदू, वातनाड्या, हाडांमधील मगज), आणि शुक्र(प्रत्येक पेशीचे पुनरुत्पादन करणारी शक्ती) या सातही धातूंची वाढ करून, धातूघटकांचा कस सुधारून बल प्राप्त करून देते. खडीसाखर, ज्येष्ठमध यासारख्या गोड चवीच्या पदार्थामुळे घशाचे आरोग्य चांगले राहते. शतावरी सारख्या गोडसर चवीच्या पदार्थामुळे स्तन्य म्हणजे दूध वाढण्यास मदत होते. तुपासारखे गोड पदार्थ विषाच्या विरुद्ध काम करतात. अत्यंत थकल्यानंतर, अतिश्रमानंतर, नियमितपणे काबाडकष्ट करावे लागणा-यांना मधुर रस अत्यंत उपयोगी असतो. मधुर रसामुळे शरीरास स्थिरता येते. टवटवीतपणा येतो. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच उत्साह वाटतो. विशेषतः जेव्हा रक्तामधील साखर कमी होते तेव्हा तहान-भूक लागते, कोणत्याच कामात लक्ष लागत नाही, घाम येतो, चक्कर येते, अशा वेळी गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच बरे वाटू लागते. उत्साह वाटतो. मधुर रसामुळे केसांच्या मुळांना स्थिरता व बळकटी येते.
मधुर रसामध्ये एवढे चांगले गुण असूनही याचा अतिवापर केला तर पुढील आजार होतात --
मधुमेह, स्थूलता, अंग जड वाटणे, आळस, अतिप्रमाणात झोप येणे, भूक नाहीशी होणे, पोट सतत भरल्यासारखे वाटणे, तोंडाला वारंवार पाणी सुटणे, तोंडामध्ये सतत गोडसर चव राहते, त्यामुळे इतर कोणतीही चव समजत नाही. सर्दी, घशाचे आजार, डोळ्याचे आजार, उलटी, जंत होणे, अंगावर गांध्या येणे, दमा, रक्तवाहिन्या व मूत्राशयाचे आजार.
२) अम्लरस / आंबट चव :--->
आंबट चवीच्या पदार्थांचे नाव काढतात तोंडाला पाणी सुटते, आंबट चवीचे पदार्थ तोंडात ठेवल्यावर लगेच अंगावर रोमांच उभे राहतात, डोळे आणि भुवया आकुंचित होतात, आंबट पदार्थ खाल्ल्याने दात आंबतात, तोंडातील चिकटा नाहीसा होऊन तोंड स्वच्छ होते त्यामुळे चव कळते. तोंडामध्ये लाळेचे प्रमाण वाढल्याने अन्नपचन व्यवस्थित होते. पोटातील गॅसेस निघून जाण्यास मदत होते. शरीराला आणि मनाला टवटवीतपणा, उत्साह, शक्ती प्राप्त करून देतो.
अम्लरसाचे किंवा आंबट चवीचे अतिप्रमाणात वापर झाला तर पुढील आजार/त्रास होतात:--->
दात आंबतात, सळसळतात, वारंवार तहान लागते, पित्त वाढते, रक्त-मांस दूषित होते. शरीरातील धातूंचा कस कमी होतो. अशक्तपणा येतो, आधीच अशक्त आणि किडकिडीत असलेल्या माणसाने जर अतिप्रमाणात आंबट पदार्थ खाल्ले तर त्यास सूज येते. भाजलेल्या मार लागलेल्या कापलेल्या किंवा कशानेही झालेली जखम अति आंबट पदार्थ खाल्ल्याने खाल्याने वाढते. छातीमध्ये घश्यामध्ये जळजळ होते, डोळ्यांना अंधेरी येते, डोके गरगरते, त्वचेला खाज येते, अंगावर गांध्या येतात.
आंबट चवीच्या पदार्थामुळे पित्त वाढते. असे असले तरी डाळिंब आणि आवळा हे दोन आंबट चवीचे असूनही उत्तम प्रकारे पित्त कमी करतात.
३) लवण रस / खारट चव :--->
खारट चवीचे पदार्थ खाल्ल्याने लगेचच तोंडामध्ये ओलसरपणा निर्माण होतो. तोंडास पाणी सुटते. त्यामुळे अन्नाला चव येते. पचनशक्ती वाढते. लवण रसामुळे किंवा खारट चवीच्या पदार्थामुळे शौचास साफ होते. मल म्हणजे विष्ठा कडक किंवा कठीण न होता व्यवस्थित होते. कफाचे बेडके पातळ करून बाहेर पडतात. खारट पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळ इतर रसांचे/चवींचे (गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू) ज्ञान होत नाही.
अतिप्रमाणात लवणरस म्हणजे खारट चवीचे पदार्थ खाल्ल्याने पुढील आजार होतात.....
पित्त वाढते, तहान लागते, चक्कर येते, केस लवकर पिकतात - गळतात, टक्कल पडते, शरीरास खाज सुटते, सुज येते, सुजेच्या ठिकाणीहुन पाणी पाझरू लागते, रक्तदाब वाढू लागतो, त्वचेला लवकर वळ्या पडू लागतात म्हणजे त्वचाला सुरकुत्या पडतात, त्वचेचा रंग बदलू लागतो, त्वचा फाटू लागते, मांसपेशी विकृत होतात, गळून पडतात, अंगावर गांध्या येणे, आम्लपित्त असे आजार होतात. पुरुषांमधील पौरुषशक्तीचा नाश होतो. डोळ्यांना अपायकारक आहे. विषाचे दुष्परिणाम वाढतात.
४) तिखट चव :--->
तिखट चवीचे पदार्थ तोंडात ठेवल्या ठेवल्या नाका डोळ्यातून पाणी वाहू लागते. तिखट लागते. त्यामुळे तोंडातील चिकटा नाहीसा होऊन तोंड स्वच्छ होते. तसेच तिखट चवीचे पदार्थामुळे भूक लागते. खाल्लेल्या अन्नाचे शोषण होते. अन्नाला चव येते.
स्थुलता, सूज येणे, जंत होणे, त्वचा थंड पडल्यामुळे चिकटपणा येत असेल व त्यामुळे खाज येत असेल तर अशा आजारांमध्ये तिखट चवीच्या पदार्थांचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. शौचास खडा होत असेल तर तिखट चवीच्या पदार्थांनी मुळे संडासच्या गाठी फुटतात. तसेच साकाळलेल्या रक्ताच्या गाठी देखील तिखट चवीमुळे फुटतात. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. तिखट चवीच्या पदार्थाचे कण नाकात किंवा डोळ्यात गेले तर नाकाची, डोळ्यांची आग होते, पाणी येते, शिंका येतात.
तिखट चवीचे अनेक चांगले गुणधर्म आहेत. तरीपण जर अतिप्रमाणात तिखट पदार्थ खाण्यात आले तर त्यामुळे पुढील अपाय होतात.....
चक्कर येते, अशक्तपणा येतो, घशात आग-आग होते, नाक, घसा,ओठ कोरडे पडतात. मनाचा सत्व गुण कमी होऊन तमो गुण वाढतो. त्यामुळे बेचैनी होते. सर्व शरीराची आग-आग होते. शरीरात टोचल्याप्रमाणे, फोडल्याप्रमाणे वेदना होतात. हात पाय पाठ बरगड्या इत्यादी ठिकाणी दुखू लागते. शारीरिक शक्ती कमी होते. पुरुषांमधील पौरुषशक्तीचा र्हास होऊ लागतो. एकूणच तिखट चवीमुळे वात वाढतो.
वरील सर्व आजार तिखट चवीमुळे होत असले तरी सुंठ आणि लसूण तिखट असूनही वात कमी करणारी आहेत.
५) कडू चव :--->
कडू चवीचे पदार्थ जीभेवर ठेवल्यानंतर लगेच काही वेळेसाठी जीभेची संवेदना नाहीशी होते. तोंड कोरडे पडते. कडू चव नकोशी वाटते. परंतु मुख स्वच्छ होते. चिकटा नाहीसा होतो. आणि नंतर काही वेळाने तोंडाला चव येते. कडू रस स्वतः चवदार नाही परंतु जीभेचा मुखाच्या आतील भागाचा चिकटा नाहीसा होऊन स्वच्छ झाल्याने तोंडास रुची निर्माण होते. भूक चांगली लागून अन्नपचन व्यवस्थित होते. कडू रसामुळे पित्त आणि रक्ताची दुष्टी नष्ट होते. त्यामुळे अति पित्ताने किंवा दूषित पित्ताने येणारी चक्कर, आग दूषित रक्ताने होणारे त्वचा विकार कडू रसामुळे बरे होतात. शरीरात अतिप्रमाणात कफ वाढल्याने जंत होणे, जखमा होणे, खाज येणे यासारख्या आजारात कडू रसाचा खूपच चांगल्या प्रकारे उपयोग होतो. ताप येतो तेव्हा कडू चवीचे पदार्थ खावेत. कारण तापात तोंडास चवही नसते आणि भूकही लागत नाही. सर्व रसांमध्ये/चवींमध्ये कडू रसामुळे तोंडास उत्तम प्रकारे रुची प्राप्त होते आणि पचन व्यवस्थित होऊन उत्तम प्रकारे भूक लागते. त्यामुळे सर्वच कडू चवीचे पदार्थ तापामध्ये उत्तम आहेत. परंतु या सर्व कडू चवीमध्ये देखील सर्वोत्कृष्ट म्हणून गुळवेल, काडेचिराईत, कडुनिंबाची साल, कडू पडवळ आणि इंद्रयव यांचा काढा आहे.
कडू चवीचा अतिरेक झाल्यास.....
आपल्या आसपास जसे ज्युस सेंटर आहेत तसे आजकाल कडुनिंबाचा रस विकणारे सेंटर देखील आपणास मैदानाबाहेर पहावयास मिळतात. सकाळी मैदानावरील व्यायाम संपवून अनेक ज्येष्ठ आणि तरुण नागरिक देखील प्रकृतीस उत्तम म्हणून ग्लास-ग्लास भरून कडू रसाचा कडुनिंबाचा रस कित्येक दिवस घेतात. परिणाम भरपूर प्रमाणात वात वाढतो. आणि वाताचे निरनिराळे आजार होतात. कारण 'अति तेथे माती'. आपल्या संस्कृतीत अगदी नववर्षाच्या स्वागताला ('गुढीपाडवा' बर कां, 'एक जानेवारी' नव्हे !) कडुनिंबाची पानेच खातात पण ती गुळाबरोबर खातात आणि त्या दिवशी जेवण देखील तूप गूळ पोळीचे असते. कारण तूप गूळ पुरणपोळी हे पदार्थ अतिरिक्त वात न वाढविता कडुनिंबाचे गुण शरीरास मिळवून देतात. अतिप्रमाणात कडू चवीचे सेवन केले तर शरीरातील सर्व धातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा व शुक्र यांचे पोषण बंद होऊन शोषण चालू होते. त्यामुळे शरीर सुकून जाते. बारीक-बारीक होऊ लागते. शारीरिक शक्ती कमी होते. अशक्तपणा जाणवू लागतो. शरीराची थरथर जाणवते. थकवा, चक्कर वारंवार येते, तोंड कोरडे पडते, संपूर्ण शरीरात टोचल्यासारख्या, कापल्यासारख्या, फोडल्यासारख्या वेदना जाणवतात. डोके दुखू लागते. कडू चवीचे पदार्थ वात वाढवितात.
अतिप्रमाणात कडू रसाचा वापर झाला तर वात वाढतो. परंतु याला गुळवेल ही वनस्पती अपवाद आहे. गुळवेल कडू चवीची असून देखील वात कमी करते. सर्वच धातूंचे उत्तम प्रकारे पोषण करून प्रत्येक पेशींची प्रतिकारशक्ती आणि आयुष्य वाढविते. गुळवेली मुळे यकृत किंवा लिव्हर चांगल्या प्रकारे काम करते. जर गुळवेलीचा काढा रोज घेतला तर कोणतेच आजार उद्भवणार नाहीत. कारण आयुर्वेदातील श्रेष्ठ रसायन औषधीद्रव्यांपैकी गुळवेल आहे.
६) तुरट चव :--->
तुरट चवीमुळे जीभ स्वच्छ होते. चिकटा नाहीसा होतो. उलटी जुलाब होत असता तुरट चवीच्या पदार्थामुळे आराम मिळतो. तुरट चवीमुळे शरीरातील सर्वच पेशींची, धातूंची म्हणजे अगदी रस-रक्तापासून ते हाडांपर्यंत सगळ्यांची मोडतोड झाल्यास दुरुस्ती किंवा जुळून येणे ही क्रिया चांगल्या प्रकारे होते. तुरट चवीच्या काढ्याने जर जखम स्वच्छ केली तर जखमेतील पू-घाण नाहीसे होऊन जखम स्वच्छ होते. जखमेतील रक्त वाहणे थांबते. आणि जखम लवकर भरून येते.
तुरट चवीचा जर अतिरेक झाला तर वात वाढतो आणि कडू चवीच्या अतिरेकाने होणारे आजार होतात.
एकूण मिळूनच गोड, आंबट आणि खारट चवीचे पदार्थ शरीरातील वात कमी करतात आणि कफ वाढवितात. तिखट कडू आणि तुरट चवीचे पदार्थ वात वाढवितात आणि कफ कमी करतात. गोड कडू आणि तुरट चवीचे पदार्थ पित्त कमी करतात आणि पित्त वाढविण्यात तिखट आंबट आणि खारट चवीचा सहभाग असतो.
जेवताना स्वीट डिश आधी खावी की नंतर? लोणची चटण्या कोशिंबीर रायते कधी खावेत? या सर्वांचा विशिष्ट असा क्रम ठरवला आहे. आपला भारत उष्णकटिबंधात आहे आणि उष्णकटिबंधात राहणाऱ्यांनी जेवताना सुरुवातीलाच गोड पदार्थ खावेत. वरण-भात-तूप यासारख्या गोड पदार्थांमुळे बराच वेळ रिकामे असणाऱ्या आमाशयातील वात कमी होऊन कफ स्त्रवू लागतो. या कफामुळे अन्नाला मऊपणा येतो. पाचक स्त्राव अन्नकणांमध्ये चांगल्या प्रकारे मिसळले जातात. गोड पदार्थ नंतर आंबट आणि खारट पदार्थ खावेत. उदा. लोणचे कोशिंबीर यामुळे पुढील पाचक स्त्राव चांगल्या प्रकारे स्त्रवतात. जेवणाच्या शेवटच्या टप्प्यात तिखट कडू आणि तुरट चवीचे पदार्थ खावेत. उदा. पालेभाज्या फळभाज्या उसळी वगैरे. यामुळे अन्नपचनास मदत होते. हा क्रम झाला सर्वसामान्यांसाठी. परंतु ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे, वारंवार अजीर्ण होते, चव कळत नाही अशा लोकांनी मात्र जेवणाची सुरुवात आले आणि सैंधव किंवा मिठाने करावी. आले आणि मीठ एकत्र चोखून खाल्ल्याने जीभ घसा आणि तोंडातील चिकटा नाहीसा होतो. त्यामुळे तोंडाला चव येते. पाचक स्त्राव चांगल्या प्रकारे स्त्रवू लागल्याने पचन व्यवस्थित होते.
काही कारणाने जर जेवणाच्या सुरुवातीला खारट आंबट किंवा तिखट असे चमचमीत पदार्थ खाल्ले गेले तर त्यामुळे पित्त वाढते, जळजळ जाणवते. अशा वेळी जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खावेत.
थोडक्यात जेवणाच्या शेवटी कोणताही दोष वाढणार नाही अशा पद्धतीने सहाही (गोड आंबट खारट तिखट कडू तुरट) चवीच्या पदार्थांचा युक्तीने वापर केल्यास आहार समतोल राहून सर्व दोष समस्थितीत राहतात. आणि असा हा 'षड् रसात्मक आहार' खऱ्या अर्थाने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या देखील 'समतोल आहार' आहे.
लेखन डॉ. वैशाली माने, सातारा | संपर्क 9423826921
सदरची माहिती आपणाला कशी वाटली हे जरुर सांगा, अशाच प्रकारच्या आरोग्यदायी माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. सदरची माहिती कॉपी करण्यास सक्त मनाई आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा