Fungal Infections Information in Marathi

 Fungal Infections फंगल इन्फेक्शन

व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन हे शब्द आपल्या नेहमी कानावर पडतात. व्हायरल इन्फेक्शन हे व्हायरसमूळे होते तर फंगल इन्फेक्शन हे फंगसमूळे होते. फंगस हे एक प्रकारचे परोपजीवी आहेत. त्यांचेमध्ये स्वत:चे अन्न तयार करण्याचे सामर्थ्य नसते. त्यामूळे फंगस हे दुस-या एखाद्या सजीव किंवा मृत शरीराच्या आश्रयाने वाढते. दलदलीच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी किंवा शरीरात ओलावा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी फंगस वाढते.

फंगल इन्फेक्शन हे साधारणत: पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात दिसून येते. काही विशिष्ट स्थितीमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते. उदा. 

१) मधुमेह

२) पोषक आाहाराची कमतरता

३) प्रतिकारशक्ती खालावणे

४) रक्तातील पांढ-या पेशींची संख्या कमी होणे

५) दिर्घकालीन एन्टीबायोटीक्सचे सेवन करणे

६) आय. व्ही कॅथेटर किंवा सलाईन इंजेक्शन देण्यासाठी लावलेली सूई बरेच दिवस असणे. 

७) रेडीओथेरपी किंवा प्रतिकारशक्ती दाबून टाकणारी औषधे किंवा पेशींसाठीचे घातक औषधे यांच्यामूळे पेशींची प्रतिकार शक्ती कमी होणे. 

८) काही वेळा स्टिरॉईडस् मुळे पेशींची बचाव करण्याची शक्तीच दाबली जाते. 

९) काही प्रकारचे कॅन्सर. 

१०) फुफ्फुसांचे काही विशिष्ठ आजार.

फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता कोणकोणत्या स्थितीमध्ये जास्त असते हे आपण पाहिले. आता फंगल इन्फेक्शन शरीरात कोठे-कोठे होते. 

लक्षणे कोणकोणती दिसतात याविषयी माहिती पुढीलप्रमाणे...

तोंडातील आतील त्वचेवर टाळूला, गालाला आतून, घश्यामध्ये अगदी आत म्हणजे अन्ननलिकेवर पांढरट थर आल्यास गिळण्यास प्रचंड त्रास होतो. काखेत, जांघेत, स्तनाच्या खालील भागात जर फंगल इन्फेक्शन झाले तर त्याठिकाणी लालसर दुखणारी जखम होते. या जखमेभोवती बारीक पुरळ येतात. काही महिलांच्या योनीमार्गात फंगल इन्फेक्शन होते. अशावेळी अंगावरुन पांढरे जाणे, त्याजागी खाज येणे, कंबर दुखी असे त्रास उद्भवतात. डोक्यात केसांच्या मूळाशी जर फंगल इन्फेक्शन झाले तर एक किंवा अनेक गोल चट्टे तयार होतात. 

या गोल चट्ट्यात काही प्रमाणात केस जातात. त्या चट्ट्यात जे केस असतात ते तुटलेले असतात. काही रुग्णांमध्ये लालसर सूज आल्याप्रमाणे चट्टा तयार होतो. या लालसर भागातील केसांची मूळे अतिशय कमकूवत होतात. काही वेळा अनेक चट्ट्यांमध्ये केस गेलेले असतात. त्या चट्ट्यावरचे केस हे डोक्यावरच्या त्वचेच्या पातळीवर तुटलेले असतात. त्यामूळे लांबून पाहताना डोक्यावर अनेक बारीक-बारीक काळे ठिपके असल्याप्रमाणे भासतात. काही वेळा केसांच्या मुळातून पिवळसर रंगाचा कोंडा निघतो. 


काही पुरुषांच्या दाढी-मिश्यांच्या ठिकाणी हे फंगल इन्फेक्शन होते. अशा वेळी दाढी-मिश्यांच्या ठिकाणी गोलचट्टा निमार्ण होतो. त्या ठिकाणचे केस गळून पडतात किंवा सहजपणे उपटले जातात. त्याठिकाणी बारीक पुरळ येवू शकते. लालसर चट्टा तयार होतो. त्यातून स्त्राव निघतो तसेच कोंड्याप्रमाणे बारीक खपल्या देखील निघतात. यालाच टिनीआ इन्फेक्शन असे देखील म्हणतात. लालसर चट्टा येणे, पुरळ येणे त्यातून स्त्राव येणे, कोंड्याप्रमाणे निघणे अशी लक्षणे कंबरेच्या ठिकाणी, जांघेत, तळहात, तळपाय, बोटांच्या मधील जागा इत्यादी ठिकाणी देखील दिसू शकते.

दोन बोटांच्यामध्ये म्हणजे बेचक्यात होणा-या फंगल इन्फेक्शनला बोलीभाषेत "चिखल्या" असे देखील म्हणतात. पावसाळ्यात याचे प्रमाण सर्वात जास्त असते. काही लोकांच्या विशेषत: शेतक-यांच्या नखांना फंगल इन्फेक्शन होते. अशावेळी नखे जाड होतात. नखांचा रंग बदलून काळसर होतो. नखे खडबडीत होतात. शरीरावर इतर ठिकाणी फंगल इन्फेक्शन पसरण्याचे किंवा पुन्हा - पुन्हा फंगल इन्फेक्शन होण्याचे किंवा ते बरे न होण्याच कारण हे अशा प्रकारची नखेच असतात.



काही वेळेला छातीवर, पोटावर, पाठीवर, कंबरेवर, दंडावर, मांड्यावर आणि चेह-यावर देखील विशिष्ठ प्रकारचे डाग दिसतात. हे डाग आपल्या त्वचेच्या रंगापेक्षा गडद किंवा अगदी फिक्कट किंवा पांढरसर रंगाचे असतात. विशेषत: पांढरटसर असणारे डाग हे कोडाचे आहेत की काय अशी शंका येते. काही ठराविक विशिष्ठ स्थितीत फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावते. अशा विशिष्ट स्थिती कोणत्या याची माहिती आपण सुरुवातीला घेतली, दीर्घकाळापासून अस्थमा असणारे तसेच चहाच्या मळ्यात काम करणारे आणि सुरुवातीला माहिती घेतलेल्या विशिष्ठ स्थिती ह्या जर एकत्र आल्यातर ह्या लोकांमध्ये विशिष्ठ प्रकारचे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांच्या वायूकोषामध्ये फंगसची वाढ होते. त्यामूळे प्रचंड काळजी लावणारा खोकला येतो. खोकल्यातून चिकट, घट्ट, दुधाळ असा बडका पडतो. कधी कधी खोकल्यातून रक्त देखील पडते. खोकल्यासह ताप, धाप, छातीत दुखणे अशी लक्षणे देखील असतात.

लेखन डॉ. वैशाली माने, सातारासंपर्क 9423826921

सदरची माहिती आपणाला कशी वाटली हे जरुर सांगा, अशाच प्रकारच्या आरोग्यदायी माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. सदरची माहिती कॉपी करण्यास सक्त मनाई आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२