किडनी - रचना, कार्य आणि आजार
मानवी शरीर त्याची रचना, कार्य हे सर्व म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. मनुष्य त्याची नक्कल करून एकेक यंत्र बनू पाहत आहे. काही अंशी या प्रयत्नांना यशही आले आहे. उदा.- मेंदूची नक्कल करून संगणक तयार करणे. तरीपण या यंत्रापेक्षा मानवी शरीर आणि त्यातील अवयव यांना पर्यायच नाही. आपल्या शरीरात अद्भुत पणे काम करणाऱ्या अवयवांपैकी किडनीची रचना, कोणत्या परिस्थितीत किडनी कसे काय काम करते आणि किडनीला जर व्यवस्थितपणे योग्य प्रमाणात काम करता आले नाही तर आजार कसे काय निर्माण होतात याविषयी माहिती घेऊयात. रस्त्याने एखाद्या सार्वजनिक शौचालया समोरून जर आपण गेलो तर त्या उग्र वासामुळे नाकास झिणझिण्या येतात. डोळ्यास देखील त्या वासामुळे चुरचुरते आणि पाणी येते. काहीजणांना त्या वासामुळे ठसका लागतो. तर काही जणांना उसासे येऊन उलटी देखील होते. मनाला त्या वासाची घृणा म्हणजे तिटकारा येतो. म्हणजे एकाच वेळी आपल्या ज्ञानेंद्रिये, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि मनावर याचा परिणाम होतो. बाहेर हवेच्या संपर्कात असलेल्या, उघड्यावर पडलेल्या लघवीच्या वासामुळे आपल्यावर एवढा परिणाम होतो तर मग आपल्या शरीरात रक्तातील टाक...